व्हॅलेंटाईन!

Submitted by उमेश कोठीकर on 14 February, 2013 - 02:38

मला माहित आहे
तुझं फ़क्त माझ्यावर आणि माझ्यावर
प्रेम आहे
खरंच,
काय झालं, जरी तुला नाही लावता आलं
तुझ्या नावासमोर माझं नाव, जगासमोर
काय झालं, जरी तुला नाही करता आलं सात फ़े-यांचं ते नाटक
माझ्यासोबत
काय झालं, जरी तू प्रयत्न केला असशील पुसून टाकण्याचा
माझ्या तुझ्यावरच्या खोल खुणा
काय झालं, जरी तू रात्री प्रणयाच्या वेळी केला असशील प्रयत्न
मला विसरण्याचा (की आठवण्याचा) डोळे बंद करून
काय झालं, जरी तुला नाही थबकता आलं
माझ्या वास्तवाच्या खडबडीत पाय-यांवरच
तुझ्या स्वप्नांच्या झळाळत्या महालासाठी
पण...
मला ठाउक आहे, अजूनही
तुझ्या ओठांवर येत असेल माझेच नाव
अस्फ़ुट; आधी, ’नाव’ घेण्याआधी
तुझ्या बोटांना अजूनही जाणवत असेल
माझाच स्पर्श, मंगळसूत्रासोबत चाळा करतांना
आणि शोधत असशील तू..कुठेतरी
मलाच,माझाच अंश, तुझ्या छोटुशा बाळामधे
त्याचा गोड मुका घेतांना
आणि, अजूनही घेत असेल माझेच रूप
तुझा ओसाड, भव्य पण आसुसलेला एकांत
पण मला माहित आहे
ही प्रतारणा नाही, नव्हती कधीच
तुझी,
तुझ्या प्रत्येक कृतीतून आपल्या दुराव्यातल्या
तू पोहोचत होतीस, माझ्याचपाशी
आपसूक..तशीच जशी आहेस; माझी
बस, आता काही क्षण वाटावेत अशा काही काळाची वाट
आणि तुझ्या थरथरत्या हातांतून, खाचा झालेल्या डोळ्यांतून
आणि अनासक्त झालेल्या कोसळणारर्‍या देहातून तू
जाशील भेदून; येथील धर्मभ्रष्ट बंधनांना
पुसून, आपल्या निर्व्याज अमर प्रेमाने
अन पुन्हा, घेऊन तसेच चिमणे डोळे,तशीच निरागस स्वप्न
आणि तशीच अबोध, मुग्धा होउन
माझ्या नि:श्वासातले श्वास घेउन
येशील
माझ्यासाठी, माझ्यासाठी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान ................
अर्ध्यानंतर कवितेने घेतलेलं वळण आणि शेवट ..... मनाला स्पर्शून गेले.

आणि, अजूनही घेत असेल माझेच रूप
तुझा ओसाड, भव्य पण आसुसलेला एकांत
पण मला माहित आहे
ही प्रतारणा नाही, नव्हती कधीच.

खूप नेमके शब्द एका उत्कट अधुर्‍या (की अधुर्‍या म्हणून उत्कट ) प्रेमबंधासाठी.
मध्यंतरानंतरचं वळणही नाट्यपूर्ण, उल्हासजींनी म्हटलं तसं, आणि एक वेगळी देहातीत परिमिती त्या प्रेमाला देणारं.