''बाबा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 February, 2013 - 01:57

तुझ्याविना मी एकाकी मज मिठीत घे ना बाबा
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा II धृ II

आठ जणांचे कुटुंब होते,संकट थोडे नव्हते
सौख्याने पण तुडुंब होते,कसले कोडे नव्हते
दु:खाग्नीला शमवायाचे धाडस दे ना बाबा II 1 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

गुरुजी होते गावासाठी,पण सा-यांचा बाबा
ताई,माई,तरुण आणिक म्हाता-यांचा बाबा
कुणास बाबा बोलायाला जीभ धजेना बाबा II 2 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

तुझ्याविना ही धुरा घराची,कशी वहावी बाबा
अगतिक झालेल्या आईला,कशी पहावी बाबा
वठवू कैसी तुझी भूमिका, काहि कळे ना बाबा II 3 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

संकट ,चणचण ,निकडीचा अंधार जेवढा होता
थरथरणार्‍या हातांचा आधार केवढा होता
तुझ्यासारखे संकटसमयी हसू जमे ना बाबा II 4 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

अनील,नंदू,विलास,संदेशाचे उज्वल व्हावे
पिल्लू आणिक स्मितचे तू हसणे निर्व्याज पहावे
घाव तुझ्या जाण्याने झाला,अजुन भरे ना बाबा II 5 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंक वगैरेची गरज नाही.>>>>>>>>>>

मी समजलो नाही शाम.

वैभव,वर्षू... धन्यवाद.

वैवकुंच्या वाक्यात थोडा बदल करून :
कवीने अनुभवलेली कविता..... हृदयस्पर्शी आणि प्रभावी.
--------------------------------------------------------------------------------------
अंक वगैरेची गरज नाही >>> आठ जणांचे कुटुंब याबद्दल हे असावसं वाटतंय.
डॉ. तुमच्या कवितेचा आणि भावनांचा आदर राखून एक सांगू का ?
कवितेतले काही डिटेल्स बदलले तर कविता जनरलाइज होऊन
आणखी उंची गाठेल असे वाटते.
वैम. कृगैन.

आठ जणांचे कुटुंब याबद्दल हे असावसं वाटतंय.>>>> नाही उकाका !!शामजी कड्व्यापुढे दिलेल्या १ ,२, ३ ...बद्दल बोलताय्त

हे "गीत" आहे .....!!!! छापतात तेव्हा त्यात असे आकडे असतात (अंतरा दाखवायला मुखड्याला. ...॥ धॄ ॥ .)असे अनेक पुस्तकात मी पाहिलेले आहे मला तरी वावगे वाट्ले नाही तरी इथे नसते तरी चाललेच असते असेही मला वाट्ते

असो
Happy

काव्य आवडले पण
>> शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा >> हे काही झेपले नाही. Uhoh
शिवी?

दक्स,

बाबा फार रागीट होते..... मूर्ख्,नालायक्,हारामखोर अश्या शिव्या सतत आम्हाला पडत ..यास्तव...

Happy

भावना पोहोचल्या...

तुम्ही त्या इतक्या उत्कटपणे मांडू शकलात हेच या कवितेचे यश !

-सुप्रिया.

वाचताना आत काही तरी सतत तुटतच होते..
मध्ये तर असं वाटलं की ही कविता मी वाचूच शकणार नाही... पण मन घट्ट करून वाचली.

जाम अंगावर आली.

>>>मी समजलो नाही >>> ही कविता माझ्या दृष्टीने फक्त कविता नाही...व्यक्ती गेल्यानंतर आधाराचा खांदा शोधून त्या व्यक्तीच्या आठवणी सांगत .. निर्माण झालेल्या पोकळीने पडलेले प्रश्न मांडत.. हमसून हमसून मोकळे होतानाचे ते उत्कट भाव आहेत जे अगदी नैसर्गीक आहेत.. तिथे कुठलीही काव्य वा सांगीतिक जाणीव असण्याचे कारण नाही. जे काळजातातून लेखणीत आलंय त्याला कुठलेही अनैसर्गीक आकृतीबंध असण्याची गरज नाही.... म्हणून मी तसे म्हटले आहे.

........धन्यवाद.

हृदयस्पर्शी आणि प्रभावी कविता.
वडिलांचे छत हरवलेल्या माझ्यासारख्या अभाग्याच्या डोळ्यात पाणी आणणारी कविता.
.
पण ही तुमची कविता मी यापूर्वीच वाचल्याचे स्मरते आहे.

तुझ्याविना ही धुरा घराची,कशी वहावी बाबा
अगतिक झालेल्या आईला,कशी पहावी बाबा
वठवू कैसी तुझी भूमिका, काहि कळे ना बाबा II 3 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

संकट ,चणचण ,निकडीचा अंधार जेवढा होता
थरथरणार्‍या हातांचा आधार केवढा होता
तुझ्यासारखे संकटसमयी हसू जमे ना बाबा II 4 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा<<<

प्रभावी. प्रवाही. हळवे करणार्‍या ओळी.

कवितेला 'अप्रतिम' म्हणवत नाहीये. भावना डचमळवून गेल्या एवढेच लिहितो.

मनापासुन आवडली.

असा कसा हा गहिवर तुझा आज दाटला बाबा..
पुर्वीसारखे पुन्हा छातीशी कवटाळन्यास ये बाबा...