हे कोणत्या दिशांनी वाहतात वारे?

Submitted by सतीश देवपूरकर on 9 February, 2013 - 10:52

गझल
हे कोणत्या दिशांनी वाहतात वारे?
हृदयात आज धुमसू लागले निखारे!

स्वप्नात काल तुझिया यायला न जमले;
होती फुले तिथेही द्यायला पहारे!

आपापसात चर्चा जाहली फुलांची;
कळले मला न त्यांचे बेरकी इशारे!

कानात काय वारे गुणगुणून गेले?
उठले तनूवरी ह्या लाघवी शहारे!

कोणी इथे समुद्री घेतली समाधी?
का आजकाल दचकू लागले किनारे?

चुपचाप आपला मी बेचिराख झालो!
आकाश का विजांनी सारखे थरारे?

माझी तुझी उमलली प्रीत पौर्णिमेला!
उरले नभात आता मोजकेच तारे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा बेफीजी मानले तुम्हाला...... नेमके काय चांगले आहे ते तुम्हाला आधीच आणि किती नेमके समजते

_/|\_ !!

कोणी इथे समुद्री घेतली समाधी?
का आजकाल दचकू लागले किनारे?

चुपचाप आपला मी बेचिराख झालो!
आकाश का विजांनी सारखे थरारे?

माझी तुझी उमलली प्रीत पौर्णिमेला!
उरले नभात आता मोजकेच तारे!<<<

शेर आवडले

धन्यवाद