'देहबंध'

Submitted by अमेय२८०८०७ on 9 February, 2013 - 10:22

शब्दाविण हुंदका येतो
अर्थाविण गळती आसू
जणू जन्मभयाने यावे
मरणाच्या तिथीस हासू

स्पर्शाची किमयागारी
वाऱ्याच्या प्रणयसुराने
बेभान कळी फुलताना
जगण्याचे स्फुरते गाणे

ती वाट स्वतःशी वळली
ज्या दिशेस सजणी गेली
विरहाच्या हरितखुणांनी
मार्गातिल सजल्या वेली

पाऊले सांजरंगांची
मेंदीसम पडली काळी
की दुःख पहाटेचे हे
उजळून दवाला जाळी?

डोहात स्निग्ध भिजताना
गंगेचे आठव स्मरती
अन धूळ देह्बंधांची
गर्तेतून उठते वरती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेसांचा प्रभाव जाणवतो
असो
आवडलीच हे वेगळे सांगणे न लगे
Happy
शुभेच्छा

अंजलीताई, भारतीताई अनेक आभार.

वै.व., सुशांत,

ग्रेसांचा प्रभाव या एवढी मोठी काँप्लिमेंट मिळेल असे वाटले नव्हते. धन्यवाद

असाच निकोप संवाद सुरू राहो हीच प्रार्थना

शब्दाविण हुंदका येतो
अर्थाविण गळती आसू
जणू जन्मभयाने यावे
मरणाच्या तिथीस हासू

वा.
पहिल्या ओळीत लय पहायला हवी.

डोहात स्निग्ध भिजताना
गंगेचे आठव स्मरती
अन धूळ देह्बंधांची
गर्तेतून उठते वरती

धूळ देह्बंधांची
गर्तेतून उठते वरती

सुंदर ओळी आहेत.
स्निग्ध भिजणे म्हणजे काय, असा प्रश्न पडला.

अमेयजी,
खूपच आवडली कविता.
तुमच्या या आणि मी इथेच वाचलेल्या आणखी एक दोन कवितांतून मृत्यूविषयक भाव , जाणीव फार उत्कटतेने व्यक्त झाली आहे असं वाटलं. आपली शैलीही भावली.
माझाही आवडता विषय आहे हा.

आपल्या अशाच आणखी चांगचांगल्या कवितांची वाट बघतो आहे.