मनाजोगते जगत रहावे

Submitted by निशिकांत on 5 February, 2013 - 02:57

हसणार्‍यांनी हसत रहावे
रडणार्‍यांनी रडत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

शिल्पकार मी माझा आहे
हवे तसे मी मजला घडविन
वरदहस्त मज नको कुणाचा
वाट कंटकांची मी तुडविन
एकलव्य आदर्श ठेउनी
स्वतः स्वयंभू घडत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

लांबी बघुनी अंथरुणाची
पाय पसरणे पसंत नाही
बुलंद माझे उंच इरादे
विचार करण्या उसंत नाही
विश्वासाने घेत भरारी
क्षितिजापुढती उडत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

भिष्म प्रतिज्ञा मीही केल्या
शरपंजर पण कधी न झालो
अभिमन्यू मी सळसळणारा
चक्रव्युहाला कधी न भ्यालो
मरावयाच्या अधी लाखदा
भ्याडासम का मरत जगावे?
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

आज बळी तो कानपिळी हे
सत्त्य जरी का जगा वाटते
अल्पसंख्य जे जरूर आहे
सत्त्य कधी का हार मानते?
प्रत्त्यंचा ओढीन अशी मी
सर्व जगाने बघत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

संध्याछाया दिसू लागता
मनी एवढा खेद कशाला?
जे जगलो ते सुरेख जगलो
सुखदु:खाचा भेद कशाला
पाश तोडुनी संसाराचे
हासत हासत सरत रहावे
प्राक्तन कसले?लगाम धरुनी
मनाजोगते जगत रहावे

निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेरणादायी कविता.

"मरावयाच्या अधी लाखदा
भ्याडासम का मरत जगावे?" >>> मस्त वाटल्या या ओळी.

------------------------------------------------------------------------
'अधी' अशी तडजोड मात्र रसभंगाला वाव देते.
तुमच्या आजवर वाचलेल्या लेखनावरून
तुमच्याकडे शब्दसंपदा चांगली असावी असे जाणवते.
तुम्ही अशा तडजोडी सहज टाळू शकाल.
एक रसिक म्हणून वरील मत व्यक्त केलंय.
कृपया गैरसमज नसावा.

जबरदस्त कविता !

भिडे सरांशी सहमत .
वाचताना लगेच जाणवतं ते .

'मरावयाच्या अधी'
ऐवजी
'मरायच्या पुर्वीच'
असं केलं तर ?

बाकी कविता खूपच आवडली .