ही तर स्वच्छन्दी फुलपाखरे

Submitted by SHANKAR_DEO on 14 October, 2008 - 08:26

व्यक्तिविकास हे औपचारीक किंवा अनौपचारीक शिक्षण पद्धतीचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच शाळेच्या परिक्षा संपतात न संपतात तोच निरनिराळ्या शिबीराच्या जाहिराती झळकू लागतात.
सगळ्याच पालकांना मग आपल्या मुलांना कुठे पाठवू आणि कुठे नको असे होऊन जाते. सध्याच्या धावपळीच्या युगात मुलांसाठी वेळ द्यावा लागतो तो आईबापांकडे नाही. आपल्या वारसदाराकडे आपल्याला लक्ष देता येत नाही याची टोचणी सध्याच्या ''हम दो हमारे दो'' किंवा आमचा एकच अशा जमान्यात प्रत्येक पालकाच्या मनाला लागलेली असते. या चुकीचे परिमार्जन व्हावे म्हणून बालराजांचे सर्व लाड पुरविण्यात नवे पालक मागेपुढे पहात नाहीत. या मानसिकतेमुळेच सध्या कोणतेही शिबीर 'हाउस फूल' असते. एकदा का सुट्टी लागली की, या अशा शिबिरान्चे पेव फुटते. काही खरोखर चांगली असतात तर काही केवळ पैसा गोळा करण्यासाठी निर्माण झालेली असतात.
आपल्या जीवनात अशा शिबिरांना फारसे स्थान नव्हते. एकतर अशा शिबिरान्चे आयोजन त्यावेळी होत नसे. पण तरीही मे महिन्याची सुट्टी संपली केंव्हा हेही कळत नसे. शाळेचा निकाल लागला की, मोकळे मोकळे वाटे. मुले पास झाली की घरच्यांना आनंद होत असे. मार्कांच्या आणि टक्केवारीच्या 'रॅट रेस' मध्ये आमच्या आईवडिलांनी आम्हाला उतरवले नाही. पास झाले की देवळात जाऊन गणपतीला नमस्कार करून यायचा. मग एक दोन दिवसात कपडे पिशवित कोंबले की थेट आजोळि खोपोलिस जायचे.मामा कायम ट्रक फिरवीत बसलेला असायचा. आम्हा भाचे कंपनीला त्याचे दर्शन क्वचितच व्हायचे. लहर लागली तर ट्रकमधून शीळ फाट्यापर्यन्त फिरवून आणायचा. आजीच्या घरामागेच डोंगरीवर जायचे, करवन्दे खायची, वरुन लाकडे गोळा करायची, त्याची मोळी बांधायची आणि योग्य जागा बघून वरुन खाली सोडून द्यायची. ती थेट खाली अंगणापर्यंत जाऊन पडायची.
सकाळी खोपोलीच्या नदीत येथेच्छ डुंबायचे, घरी येऊन आजीने थापलेल्या भाकर्र्या, पिठ्ले व ताजे लोणचे यावर ताव मारायचा आणि रविवार सायमळ पर्यंत चालत जाऊन टाटा कंपनी दाखवत असलेला सिनेमा फुकटात पाहायचा. खोपोलीत तेव्हा जेमतेम पंचवीस ते तीस मोठी घरे होती. अल्ट्रा व पेप्को या दोनच कंपन्या, त्यामुळे कुणीतरी याच दोन कंपन्यात नोकरीला असे. खोपोलीचा कंटाळा आला की, पिशवी उचलायची आणि झुकझुक गाडीने खोपोली-पळसदरी करत करत कर्जत गाठायचे.तेथे मामा रेल्वेतच नोकरीला होता. त्यामुळे सगळे रेल्वे स्टेशन आपलेच असे. अशा सगळ्या फुकटातल्या शिबिरातून आमचा व्यक्तिमत्व विकास का काय म्हणतात तो होत गेला. मे महिना अर्धा संपत आला की, मग आम्ही परत घरी यायचो. इथे उद्योग तोच. सकाळी नदीवर जाऊनो पोहणे, खाणे आणि खेळणे असा सगळा आळीभर हंगामा सुरू असे.
खाणे साधे असले तरी ते अंगी लागत असे. कारण आजी मावशी पासून मामा मामी पर्यंत सर्वांचे चिमूटभर प्रेम भरलेले असे. गालोल म्हणजे बेचकी घेऊन आंबे पाडणे, गोवा रस्त्यावर जाउन कच्ची पक्की करवन्दे खाणे, जांभळे, आवळे, यांच्या चविपुढे द्राक्षे, अंजीर यासारख्या फळांची चव कमीच वाटत असे. दुपारच्या ऊन्हात बाहेर जाण्यापेक्षा लॅडिस, झब्बु सारखे खेळ रंगत आणि त्याचाही कंटाळा आला तर "बहुरंगी करमणूक, गोट्या, चंदू, टारझन, सिंदाबादच्या सफरी, वेताळ पंचवीशी ही पुस्तके वाचावयास असत. प्रत्येक घरात एक दोन आराम खुर्च्या असतच. त्यात बसूनच याचे वाचन चाले.आरामखुर्ची पटकावण्यात स्पर्धा चाले.
हे सगळे मे महिना सुरू झाला की पुन्हा पुन्हा आठवते. आमच्या सर्वांचा जो काही थोडाबहुत विकास झाला तो असा झाला. दोन तीन वर्षे शिबिरात जाऊन आलेल्या मुलांना जांभळीच्या आणि चिन्चेच्या झाडावर चढता येत नाही. शिमग्यात घोडे पकडून त्यांना सुंभाची लगाम बांधून फिरवणे किती मुलांना जमते..? या आणि अशा अनेक गोष्टी मनात आल्या की निसर्गाच्या जवळ जाण्यात किती फायदा असतो हे कळते.थंडगार आरोग्यकारक गुळ घातलेले आणि वेलची लावलेले पन्हे पिण्याऐवजी नवी पिढी कोक आणि पेप्सिच्या बाट्ल्या तोंडाला लावते. मे महिना म्हणजे मुलांना स्वछन्दपणे खेळ्ण्या बागडण्याचे दिवस असतात. त्यांना हवे तेव्हा खेळू द्या. हवे तेव्हा झोपु द्या. आणि हवा तो रानमेवा खाउ द्या. त्यांच्या आनंदाची परिभाषा तुम्ही ठरवू नका. चला ....पुन्हा एकदा कर्जत खोपोलीला चक्कर टाकली पाहिजे...

गुलमोहर: