सुख-दु:ख

Submitted by कमलाकर देसले on 3 February, 2013 - 10:37

सुख -दु:ख..

पार्‍यासम हातोहाती सुख हळूच निसटून जाते ..
सावली सारखे साथी हे दु:ख सोबती येते ..

वेश्येला कसले नाते भोगाला घेते भोगी ;
आवेग संपता उरतो मग रितेपणाचा रोगी ;
मग कुरूप असली तरीही पतिव्रताच पदरी घेते ..
सावली सारखे साथी हे दु:ख सोबती येते ..

तो चंद्र जळीचा वाटे ओंजळीत घ्यावा मोती ;
फेकून ओढता जाळे वांझोटा थकवा हाती ;
प्रतिबिंब धरू जातांना ओंजळीत पाणी येते ..
सावली सारखे साथी हे दु:ख सोबती येते ..

चुंबिता भाळ मेघांनी शिखराला वाटे गावे ;
तोवरी थवे मेघांचे जणू उडून जाती रावे ;
मग रडवेल्या शिखराला आभाळ अलिंगन देते ..
सावली सारखे साथी हे दु:ख सोबती येते ..
कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users