केशराचे झुंजुमुंजू

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 3 February, 2013 - 05:06

केशराचे झुंजुमुंजू
हळवासा मंद वारा*
सूर्यात विरला तम
शशी जाई देशांतरा

चिंब दवामध्ये न्हाली
लडिवाळ हिरवाई
मुखी लाली किरणांची
अंगी शालू जरतारी

वेड लावी सागराला
नदी वळणे घेऊन
अर्णवही उतावळा
तिचे घ्यावया चुंबन

वेल्हाळल्या पाखरांचे
थवे झेपावले नभी
लेकुरळी वृक्षवल्ली
पहा निरोपाला उभी

मोगरयाने सजवल्या
कळ्या कोवळ्या कोवळ्या
उंच उंच नारळीच्या
झळझळल्या झावळ्या

बहरला पारिजात
दरवळ अंगणाला
नव्या उमेदीचा गंध
वेड्या थकल्या मनाला...

वनिता Happy

* रणजीतने सुचवलेला बदल... thhx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम सुंदर कविता आहे.. डोळ्यांसमोर चित्र उभी करणारी..

'हळवासा मंद वारा
सूर्यात विरला तम'
इथे आणि फक्त इथेच लय हलते आहे. काही बदल करता आला तर पाहा.... मी थो.पु.वर बदल सुचवतो.

खरोखरच चित्रदर्शी...
'हळवा पहाटवारा' इथे आणि फक्त इथेच लय हलते आहे. काही बदल करता आला तर पाहा.. >>> अनुमोदन.

लोभस शब्दांतलं वर्णन ..... आवडलं.

--------------------------------------------------------------------------

एकदा पोस्त केल्यानंतर बदलता येते का? >>> हो.

लॉगइन करून तुमच्या कवितेचं पान उघडा.
पानाच्या वरील बाजूस 'संपादन' वर क्लिक करा.
इच्छित बदल करा.
पानाच्या अखेरीस 'सेव्ह' बटनावर क्लिक करून बदल सेव्ह करा.

कविता खूपच रम्य आहे.

मी बदल सुचवत नसून फक्त एक लक्षात आणून देतोय गोड वाटतेय का पहा.

केशराचे झुंजुमुंजू
मंद हळवासा वारा
तम सुर्यामधे विरे
शशी जाई देशांतरा
.................................... शाम