ज्वलंत बांध्याची मशाल दे !

Submitted by राजीव मासरूळकर on 2 February, 2013 - 13:13

((प्रेम आणि शृंगाररस नावडणाऱ्‍यांची क्षमा मागून))

"गझल"
@ज्वलंत बांध्याची मशाल दे@

तुझा डौल दे, तुझा गाल दे
मिठीतला तो पुन्हा काल दे !

रदीफ माझी तुझा काफिया
नजाकतीचा तू खयाल दे !

दो नयनांचे वार रोखण्या
तव ओठांची मधुर ढाल दे !

नको ताज, सरताज नको मज
तुझ्याच प्रीतीचा महाल दे !

उडून जाता रंग जीवनी
तुझे सूर दे तुझा ताल दे !

पुन्हा नवी हो नव्या दमाने
ज्वलंत बांध्याची मशाल दे !

- राजीव मासरूळकर
मासरूळ, जि. बुलडाणा
दि २.२.२०१३
रात्री ९.०० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंसातल्याची गरज नाहीये त्यातला उपरोध लगेच कळतोय.

द्वीपदींचे आपसातील संबंध अजून दमदार हवे होते असे वाटले.

पु.ले.शु!

धन्यवाद शामजी .

इथे यापुर्वीच्या एका कवितेवर
'आता जरा उदात्त विषयाकडे वळा' असा उपदेश मिळाला होता म्हणून तो कंसप्रपंच .

Lol

राजीवजी:
कविता आवडली नाही म्हणण्यापेक्षा काहीही सापडलं नाही.

काही अनुभवाचे बोल देत आहे.
न पटल्यास सोडून द्यावे.
चांगलं लिहिण्यासाठी चांगलं साहित्य वाचणं आवश्यक आहे.
दोन-चार चांगले कवी वाचले तर ते कळावं.
भरमसाट लिखाण आणि क्षुल्लक वाचन ही एकंदर परिस्थिती आहे.
कवीसाठी ह्या इतकं दुर्दैवी काहीच नसावं.

समीर जी ,
अनुभवाचे बोल सांगितल्याबद्दल खूप खूप आभार .
त्या दोन चार चांगल्या कवींची नावं दिली तर मी धन्य होईन.

>>>चांगलं लिहिण्यासाठी चांगलं साहित्य वाचणं आवश्यक आहे>>>

समीर चव्हाण सर,

मान्य आहे , महान कलाकृती आपण वाचायला हव्यात.

पण नाही वाचलं काहीच , तर कविता लिहिता नाही येणार ?

आपलंच आयुष्य , आपल्या अवतीभवतीची माणसं वाचली आणि आपले अनुभव आपल्या शब्दांत मांडले तर त्याची कविता नाही होणार ?

बहिणाबाईंनी कोणकोणते ग्रंथ वाचले होते कवयित्री होण्याचा हेतू मनात ठेवून ?

मासरूळकर मुद्दा पटतो पण वाद नका घालू समीरजीही बरोबरय्त

वाचले तर अधिक छान काव्य करता येईल इतकाच अर्थ काढा

इतरांचे विचार वाचून आपण फक्त माहिती संकलीत करतो... मग मनन चिंतन ......मग त्यातून ज्ञान मिळते जे आपल्या आत्म्यात असतेच !!!

यासाठी ही पहिली स्टेप आहे <<<<<चांगलं साहित्य वाचणं !!!!!

Happy

असो विचार कराच
मीही काही फारसे वाचलेले नाही फारसे काही उपलब्धच होत नाही मला..... पण म्हणूनच समीरजींचा मुद्दा पटतो मला तरी तो लागू होतोय म्हणून

मासरूळकर:

मी अगोदरच म्हटले होते की पटले तर घ्या.
मग चर्चा वाढवण्यात अर्थ काय.
असो, आपल्या एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खटाटोप करतोय.

बहिणाबाईंनी कोणकोणते ग्रंथ वाचले होते कवयित्री होण्याचा हेतू मनात ठेवून ?

बहिणाबाईवर (संत बहिणाबाई नव्हे) तुकारामाचा प्रभाव स्पष्ट आहे.
हे सिध्द करायचा हेतू नाही आणि तसे शक्यही नसावे.
जुजबी पुरावा हवा असल्यास तुकारामाच्या ओव्या देता येतील.
बहिणाबाईवर निश्चितच पारंपारिक /संतसाहित्याचे संस्कार झाले असावेत.
तशीही गावोगावी वारक-यांनी चालवलेली भजनाची परंपरा ज्ञात आहे.
आयुष्य हा मोठा शिक्षक असतो हे मान्य.
मात्र कवीसाठी साहित्यिक पोषणही आवश्यक असतेच. तोच त्याचा रियाज असतो.
जन्मजात कुणी प्रतिभावंत नसतं.
तुकाराम म्हणतो

सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन

हे म्हटले तर कवींना लागू होते.
कुठल्याही शतकातला मोठा कवी घेतला तर त्याने आपल्या अगोदर झालेल्या मोठ्या कवीचे कौतुक भरभरून केलेय.
ही परंपरा उर्दूतच नसून मराठीतही आहे. जसे नामदेव ज्ञानेश्वरांचे आणि तुकाराम ह्या दोघांचे नाव घेतो.
फार कमी लोकांना माहीत असेल तुकारामाने गीतेचे भाषांतर केले होते मंत्रगीता ह्या नावाने.
अर्थातच तुकाराम ज्ञानेश्वरी कोळून प्यायला असणारच.
अजूनही बरेच काही आहे सांगण्यासारखे.
पटले तर घ्या इतकेच म्हणेन.

धन्यवाद.

इथे यापुर्वीच्या एका कवितेवर
'आता जरा उदात्त विषयाकडे वळा' असा उपदेश मिळाला होता म्हणून तो कंसप्रपंच .<<<

Rofl

Rofl

((प्रेम आणि शृंगाररस नावडणाऱ्‍यांची क्षमा मागून))<<< Rofl

वाद घालण्यात खरंच काही अर्थ नाही .

तो प्रांत आमच्यासारख्या क्षुल्लक वाचन करणाऱ्‍यांचा नाहीच .

सर्व मान्यवरांचे आभार !

"ज्वलंत बांध्याची मशाल " आवडली. त्या निमित्ताने वाचायला मिळालेले समीरजींचे विचार, अंतर्मुख करणारे यात शंकाच नाही. त्यांचेही आभार.

राजीव,

पुन्हा नवी हो नव्या दमाने
ज्वलंत बांध्याची मशाल दे !

व्वा...!

तुमचा हा गझलेचा प्रयत्न मला नक्कीच आवडला आहे.

*** निष्कारण वाद घालत बसू नका... चुकून प्रसिद्ध व्हाल... Lol

तुझा डौल दे, तुझा गाल दे
मिठीतला तो पुन्हा काल दे !
.
रदीफ माझी तुझा काफिया
नजाकतीचा तू खयाल दे !
.
पुन्हा नवी हो नव्या दमाने
ज्वलंत बांध्याची मशाल दे !

- मलाही प्रेम आणि शृंगाररसाच्या कविता फारशा भावत नाही. पण; वरील शेर फार फार आवडलेत. Happy

अहो, एवढे चांगले लिहाल तर "प्रेम आणि शृंगाररस" तुमच्या कवितेच्या प्रेमात पडेल. Happy

मलाही प्रेम आणि शृंगाररसाच्या कविता फारशा भावत नाही. पण; वरील शेर फार फार आवडलेत. स्मित
अहो, एवढे चांगले लिहाल तर "प्रेम आणि शृंगाररस" तुमच्या कवितेच्या प्रेमात पडेल. >>>>>>
.............एव्हढे लिह्ण्यापेक्षा फक्त "जान कुर्बान" लिहिले असते तरी पुरले असते आम्ही काय समजायचे ते समजलो असतो की शेर नेमके किती छान झालेत ते ! Wink

गंगाधर मुटे सर,
सविस्तर प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी आपले हार्दिक आभार !

वैवकु,
या चिमट्यासाठी आपलेही आभार !
Happy

या चिमट्यासाठी आपलेही आभार !>>>>
तुम्हाला नव्हता तो चिमटा मुटेसराना होता Happy एकदा त्यानाच विचारा "जान कुर्बान्" ची भानगड काय आहे ते ....फार मस्त किस्सा आहे तो !! Happy