मला न जमले.................

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 1 February, 2013 - 03:17

उर्मी मनी असूनी, जगणे मला न जमले
रोखून आसवांना, धरणे मला न जमले

दाबून हुंदके अन् लपवूनिया उसासे
हास्यास बेगडी त्या, जपणे मला न जमले

निशिगंध माळताना, दरवळ उरात सलतो
अन् आरशास कळले, सजणे मला न जमले

मी घेतली भरारी, पाऊस झेलण्याला
मग सांग चातका का, भिजणे मला न जमले?

मी जागतेच आहे, उलटून रात गेली
डोळ्यात कैद त्याला, करणे मला न जमले

आयुष्य वेचले मी, मांडीत डाव, पण तो..
उधळून आज गेला, रुसणे मला न जमले

वाटे "नितू"स सखया, स्वप्नी तरी दिसावा
विरहात नेत्र मिटुनी, निजणे मला न जमले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिगंध माळताना, दरवळ उरात सलतो
अन् आरशास कळले, सजणे मला न जमले

मी घेतली भरारी, पाऊस झेलण्याला
मग सांग चातका का, भिजणे मला न जमले?

व्वा..!

छान आहे आवडली
फेस्बुक वर पाहिले मी तुम्हाला कालपरवाच

इकडे जरा रोखठोक प्रतिक्रियाच मिळतात बरका तयारी ठेवा Happy
मायबोलीवर स्वागत
अवलोकनातला फोटो मस्त आलाय

नमस्कार!
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ...रोखठोक प्रतिक्रियाच अपेक्षित आहेत... आणि प्रामाणिक मतही .. हि माझी दुसरी रचना आहे मायबोलीवर ... हल्लीच एका जवळच्या मित्राकडून समजले म्हणून इथे आले... सध्या मी मायबोलीवरील रचना आणि एकंदर वातावरणाचा अंदाज घेतेय... त्यामुळे "तयारी" करणे सोपे होईल Happy

फेसबुकवरील गाजलेली रचना. येथे फेस दिसत नाही; तरीपण लोक चांगल्या रचनांना दाद देतातच. योग्य ठिकाणी आलीस वनिता. देर आये दुरूस्त आये.

स्वागत आहे, वनिता !!
वैभ्याने सावधगिरीचा इशारा दिलाच आहे.... पण त्याची तुला आवश्यकता नाहीच.. हे मला माहित आहे ! Happy

सुंदर गझल..

अजून येऊ दे ! बेष्ट लक !

निशिगंध माळताना, दरवळ उरात सलतो
अन् आरशास कळले, सजणे मला न जमले
व्वा...

मी जागतेच आहे, उलटून रात गेली ( याला 'उलटून रात गेली,मी जागतेच आहे' असे केल्यास किंचित जास्त परिणाम साधेल असे माझे वै. मत )
डोळ्यात कैद त्याला, करणे मला न जमले
आणि
वाटे "नितू"स सखया, स्वप्नी तरी दिसावा
विरहात नेत्र मिटुनी, निजणे मला न जमले

वरील दोन्ही शेर सुरेख आहेत...
आशय थोडाफार सारखा आहे दोन्ही शेरात..

आयुष्य वेचले मी, मांडीत डाव, पण तो..
उधळून आज गेला, रुसणे मला न जमले
सुंदर शेर..

गझल मस्त आहे..माबो वर स्वागत...