=@मनोभंग@=

Submitted by राजीव मासरूळकर on 29 January, 2013 - 09:36

=@मनोभंग@=

करी सळ् सळ् सळ् सळ् पानांवरती वारा
करी लुक् लुक् खुदकन हसे नभांगी तारा
ये रातराणीचा मंद मंद सुगंध
लहरींशी खेळे जळात प्रतिमा धुंद

या कोमल क्षणी मी बैसलो आतूर
काठावर ऐकत रजनीगीत मधूर
का कुणास ठाऊक, बदलले मनोरंग
वाटले : करावा थोडा शांतता भंग

हलकेच उचलला खडा जळी फेकण्या
कडकडुनी वीज, अवतरल्या कुणी देखण्या
क्षणी केला भस्म हातातला तो अश्म
डोळ्यांतून वायू सोडला कसला उष्म

अंगावर वस्त्रे चमचमते रेशमी
दोघींचे डोळे समान मादक कामी
"तू क्षुद्र जीव ! का खडा फेकशी पाण्या ?
हे तळे आमचे , आम्ही येतो पोहण्या !

"खरचटला किँवा घुसला जर का अंगी
हा खडा आम्हा पाण्यात पोहताना
पाण्यात सांडले जर का आमुचे रक्त
दिसणार ना तुजला उद्याचा जमाना !"

शब्दास्त्र तयांचे घुसले काळीजी आत
नाकात झोंबला त्यांचा घातक वात
मज हसू लागले तारे उपहासाने
पाण्यात दाखवी प्रतिमा मजला दात !

काठचा दगडही अता लागला टोचू
अन् दुःख अता हृदयाला लागले बोचू
हे क्षण ना जुळले होते माझ्यासाठी
सोन्याचीही होते मातीच माझ्या हाती !

- राजीव मासरूळकर
लेखन : २००२
प्रकाशन : "मनातल्या पाखरांनो" २००६

Group content visibility: 
Public - accessible to all site users