तिथे जाईन जेथे

Submitted by मुग्धमानसी on 28 January, 2013 - 00:48

तिथे जाईन जेथे सावली दिसणार नाही
तुझ्या अन् या धरेच्या मी मधे असणार नाही

मला जातील भेदुन हात तूझे आरपार
मला तेंव्हा असे गोंजारता येणार नाही

असा आतून बाहेरून वाहील धुंद वारा
बनूनी श्वास पण छातीत तो घुमणार नाही

कसा बोलावताना आज तू अडलास ओठी
मीच येईन तेंव्हा पण तुला कळणार नाही

कसा प्रारंभ झाला... संपले... काही कळेना
पुसावे सर्वकाही तेही पण जमणार नाही

तिथे जाईन जेथे तूच तू असणार नाही
तिथे जाईन जेथे मीच मी उरणार नाही!

तिथे गेल्यावरी पण पांगळ्या माझ्या स्मृतींना
तुझ्या अस्वस्थ ह्र्दयाची व्यथा कळणार नाही...!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकाकांशी सहमत
आवडली रचना
स्मृतींना>>>> "स्मृ" साठी smRu असे टाईप करा (शेवटची द्वीपदी)