पद्मभूषण मंगेश पाडगावकर

Submitted by चाऊ on 27 January, 2013 - 02:46

आमच्या सारखंच कुणाला कुठेतरी खुपतं
गोड काही पाहून त्यांचंही मन सुखावत
होय म्हणत आयुष्याला सामोरं जाताना
दु:खही लाजुन मोहरीचा दाणा होतं

तुम्हीच शिकवलं मनसोक्त जगायला
न दिसलं करत पोक्त जगाला वगळायला
प्रत्येक वेळी अगदी फाईव्ह स्टारच नको काही
काय मजा आहे पावसात कांदाभजी चाखायला

जेवलं पोटभर तर ढेकर देत दाद द्यावी
आवडलं कुणी तर डोळ्यांनी साद द्यावी
सुचलं झकास काही तर घ्यावी सुरेल तान
नाही तर हरकत नाही तण्णावून घोरायला

हे सगळं तुमच्यासारख आम्हालाही वाटतं
कुणाला तरी सांगावं, नीट मांडावं वाटत
तुमच्या कविता मग आपल्याश्या वाटतात
सहजच लागतो मग आम्ही मनापासून गुणगुणायला

पण तुमच्या तोंडून ऐकणं, म्हणजे सोन्याहुन पिवळं
जसं आपणच आपल्या बाळाला अंगाई गाणं
गाणंही तुम्हाला रोज दुवा देत असेल
त्याला ही आवडत असेल तुमच्या मनात जन्मायला

अशीच फुलवत रहा कवितांची फुलं
मजेत डोलू आम्ही सगळे थोर आणि मुलं
शतशा: प्रणाम तुमच्या स्वर्गीय प्रतिभेला
आणि आमचं बालमन जागं ठेवणा-या तुम्हाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users