चेहरा भलताच माझा बोलका!

Submitted by सतीश देवपूरकर on 26 January, 2013 - 04:36

गझल
चेहरा भलताच माझा बोलका!
त्यामुळे ठेचाळतो मी नेमका!!

कान भिंतींना असे लावू नका....
यायाचा ऐकू न माझा हुंदका!

मीच माझी साथ जेव्हा सोडली.....
त्याच वेळी जाहलो मी पोरका!

हे असे कुठवर, किती शिवणार तू?
मी असा हा जागजागी फाटका!

ते मला धरुनीच होते या मुळे....
वाटलो त्यांना जणू मी ओंडका!

वेदना जळण्यातली कळते चिते!
पोळलो मीही न थोडा थोडका!!

ते खडा समजून मजला फेकती....
मी हिरा साक्षात होतो वेचका!

याचसाठी मी नकोसा जाहलो....
मीच त्यांच्यातील होतो नेटका!

व्हायला सावध इश-यांनी मुक्या;
मी तुझ्या इतका कुठे रे बेरका?

थांग गझलेचा मला लागायला....
कैक जन्मे तू मला देशील का?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मला धरुनीच होते या मुळे.... क्या ब्बात

वाटलो त्यांना जणू मी ओंडका!....

या मुळे या आणि मुळे वेगवेअगले लिहल्याने शेरास वेगळीच अर्थ छटा आली आहे.

त्यामुळे ठेचाळतो मी नेमका!!

मीच माझी साथ जेव्हा सोडली.....
त्याच वेळी जाहलो मी पोरका!

याचसाठी मी नकोसा जाहलो....
मीच त्यांच्यातील होतो नेटका!

>>>
हेच आवडले

चेहरा भलताच माझा बोलका!
त्यामुळे ठेचाळतो मी नेमका! .. क्या ब्बात

थांग गझलेचा मला लागायला....
कैक जन्मे तू मला देशील का?>>>>>खूप छान मागणे मागितलेत सर ; वाह क्या बात है !!

गझल आवडली