तुझ्या हाकेमुळे मागे फिरावे लागले आम्हा!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 January, 2013 - 09:38

गझल
तुझ्या हाकेमुळे मागे फिरावे लागले आम्हा!
पुन्हा थडग्यातुनी बाहेर यावे लागले आम्हा!!

दिले तू सर्व आम्हाला जरी मागायच्या आधी,
स्वत:च्या सावलीसाठी झुरावे लागले आम्हा!

निसरडी वाट होती हे अम्हीही पाहिले होते....
अशी ती वेळ होती की, फसावे लागले आम्हा!

नको समजूस की, पटले जगाला एवढ्या सहजी;
स्वत:ला शेकडो वेळा पिसावे लागले आम्हा!

जरी वस्तीत ह्या आम्ही उगवलो हे खरे आहे,
अरे! दुसरीकडे वेड्या, ढळावे लागले आम्हा!

बरे झाले, तसे एका परीने वादळे आली....
जवळचे कोण अन् परके, पहावे लागले आम्हा!

समजला चांदण्यामधला अताशा गारवा आम्हा!
उभे तारुण्य रखरखते गिळावे लागले आम्हा!!

विचारू लागले वार्धक्य आम्हा जाब जगण्याचा....
हयातीचे पुन्हा थडगे खणावे लागले आम्हा!

जरी या कनवटी होते खरे बावनकशी सोने;
तरी भावात मोडीच्या विकावे लागले आम्हा!

कधी रडणार नाही हे शपथपूर्वक म्हणालो पण.....
जगाचे पाहुनी अश्रू रडावे लागले आम्हा!

फुकाचा गंध का येतो कधी जगण्यास कोणाच्या?
सुगंधी जिंदगीसाठी झिजावे लागले आम्हा!

दिसायाला भलीमोठी जरी ही जिंदगी आहे,
विचारा की, कितीवेळा मरावे लागले आम्हा!

अशी आणू नको देवा! कुणावर वेळ केव्हाही.....
बिलोरी स्वप्न जन्माचे पुरावे लागले आम्हा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाशीरामजी,
बोल काहीही, लिही काही, तुझी मर्जी!
वाद कोणाशीच मी घालायचा नाही!!

माझे अता कुणाशी कसलेही भांडण नाही!
माझ्या विषण्णतेला कुठलेही कारण नाही!!

नोंद इतिहासा तुलाही घ्यायला लागेल माझी...
टाळता येणार नाही मी असा अनुप्रास आहे!


राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा! तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!

लोकहो! या! बंद नाही दार माझे:
आज मी तुमच्यावरी नाराज नाही!

बोल तू सारे उद्या, पण, आज नाही!
आज माझाही मला अंदाज नाही!!

माणसांना मी म्हणालो 'लोकहो, या!"
तू कसा आलास अन् म्हणतोस 'आलो'!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> अस्सं होय ???

देवपुरकर नाव माझे देव मी नसलो जरी
ओळखा मज माणसांच्या सारखा दिसलो तरी

Wink

चेह-यावरुनी कुठे कळतात कोणी?
आडनावाने कुठे कळतात कोणी?

तोंड उचकटले जरा की, बोध होतो.....
कोण आहे, अन् किती पाण्यात आहे

प्रा.सतीश देवपूरकर

आडनावाने कुठे कळतात कोणी? >>>>>या शेरात दुसर्‍र्या ओळीत रदीफ बरोबर आहे पण अलामत साधली नाही आहे त्यमुळे हा मतला होवू शकणार नाही याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी

'सुटे मिसरे' वाचले होते सुटे शेर हा काय नवीन प्रकार ? की मीच अजून नवीन असल्याने ,मला माहीत नाही?
कृपया विस्ताराने सांगाल का

शेर म्हटल्यावर काफिया हवाच अन् काफिया म्हटले की अलामत ! जी योजलेल्या जमीनीतल्या सर्व शेरात एकच येते वगैरे अशी माझी समजूत आहे

की दुसर्‍या शेरात पाण्यात आहे ऐवजी पाण्यात कोणी असे हवे मग दोनही शेरातील कळतात -कोणीपाण्यात -कोणी अशी काफिया -रदीफ जोडी होवून एकाच जमीनीतले २ सुटे शेर होतात !!

मी फक्त पहिल्या दोन ओळी ह्या मतला होवू शकत नाहीत असे निरीक्षण नोंदवले होते इतकेच

चु भु द्या घ्या

सुटा शेर म्हणजे एक सवतंत्र स्यंपूर्ण कविता (दोन ओळींची) जिच्या दोन्ही ओळीत फक्त वृत्त सारखे असते!
दोन मुसलसल शेर म्हटले किंवा एकाच गझलेतील शेर म्हटले तर मात्र त्यांच्यातला रदीफ एकच असायला हवा, व काफिया निभावलेला असावा!
कामयाब शेराची ही प्रमुख अट आहे, की, रदिफ, कफिया कशाचीही कल्पना नसताना तो काळजाला भिडायला हवा!
खरे तर कोणत्याही दर्जेदार काव्याला रदीफ काय काफिया काय कोणत्याही यमकाची आवश्यकताच नसते!
त्या शेरातील विचारातच काव्य ओतप्रोत भरलेले असते, जसे एखाद्या जातीच्या सुंदर स्त्रीला कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांची खरे तर आवश्यकताच नसते!

महेश | 30 January, 2013 - 17:30
शेर जमिनीत आहे की पाण्यात ?

सतीश देवपूरकर | 30 January, 2013 - 21:25 नवीन
शेर आहे हवेत!<<<

Rofl

>>शेर आहे हवेत!
चुकून "शेर हवे आहेत" असे वाचले गेले,
आणि वाटले की तुम्ही कोणाला शेर कशाला मागाल ?