''हमसे आया न गया..'' - एक पद्यानुवाद

Submitted by भारती.. on 22 January, 2013 - 03:15

'' हमसे आया न गया.. ''-एक पद्यानुवाद

राहून गेले माझे येणे तुझ्याकडे
मौनामध्ये साद मिटवलीस तूही गडे
दोष कुणाचा रोष कशाचा ना कळले
ते अंतर दोघांमधले राहून गेले ..

स्मरणांच्या गुंफेत उजळते चित्र जुने
मनोहारी रंगांत अजून ना काही उणे
नजरेमधली ठिणगी स्पर्शाची बिजली
-मावळतीला तारकादळे लखलखली

नव्हते माहीत ताटातुटीस्तव त्या भेटी
विरहच होता लिहिला कथानकाअंती
कळ्याफुलांची कुंजवनांची ती वस्ती
उजाड झाली, आली घेरून उद्ध्वस्ती

स्मृती उरे अन काळ सरे भरभर पुढती
फूल काल,निर्माल्य आज,शेवटी माती
सारेच जाती ,वेदना एक जातच नाही
तुझ्या व्यथेचा व्रण हृदया जाळत राही..

``````````````````````````````````````````````````````````

हमसे आया न गया ,तुमसे बुलाया ना गया
फासला प्यारमे दोनोसे मिटाया ना गया ..

वो घडी याद हैं जब तुमसे मुलाकात हुई
इक इशारा हुआ दो हाथ बढे बात हुई
देखते देखते दिन ढल गया और रात हुई
वो समां आजतलक दिलसे भुलाया ना गया

क्या खबर थी के मिले हैं तो बिछडनेके लिये
किस्मते अपनी बनायी हैं बिगडने के लिये
प्यार का बाग लगाया था उजडनेके लिये
इस तरह उजडा के फिरसे बसाया ना गया

याद रह जाती हैं और वक्त गुजर जाता हैं
फूल खिलताभी हैं और खिलके बिखर जाता हैं
सब चले जाते हैं कब दर्दे जिगर जाता हैं
दाग जो तूने दिया दिलसे मिटाया ना गया

https://www.youtube.com/watch?v=esPzSp_jlNs
`````````````````````````````````````````````````````````

भारती बिर्जे डिग्गीकर
( ता.क. एकच बदल केला होता तो मानवला नाही.क्षमस्व.मूळ शब्दच ठेवलाय.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स जाई, उल्हासजी .. आवडत्या गाण्याचे शब्द अन भावना लाडक्या मायबोलीत आणण्याचा (नकळत झालेला श्लेष ) हा प्रयत्न.

स्मृती उरे अन काळ सरे भरभर पुढती
फूल काल,निर्माल्य आज,शेवटी माती
सारेच जाती ,वेदना एक जातच नाही
तुझ्या व्यथेचा व्रण हृदया जाळत राही..<<<

उत्तम! शब्दनिवड, वातावरण निर्मीती, दोन्ही अगदी स्वतंत्र काव्यरचेइतकेच सुंदर!

धन्यवाद!

भारती....

सुंदरच.... अगदी राजेन्द्र कृष्ण यांच्या मनातीलच भाव मराठी रुपडे घेऊन उतरले आहेत असेच वाटत राहिले वाचताना.

दोघांच्या प्रीतीच्या कळीने पूर्ण फुलाचे रुप घेतले नाही....परिस्थितीवश, पण म्हणून 'तो' 'तिच्या' विषयी तक्रारीचे सूर न काढता जे काही भाळी वाट्याला आले तेच अत्यंत नम्रपणे मांडत आहे. मूळ चित्रपटातील कथानकाचीही मागणी तशीच होती.

"....फासला प्यारमे दोनोसे मिटाया ना गया ....." हा रेटा परिस्थितीने दिलेला असून त्याला थोपविण्यासाठी जरी दोन्हीबाजूनी प्रयत्न झाले असले तरी नियतीच्या मनात मिलन नव्हते हेच खरे. विलक्षण अशा काव्यात्म भावनेसाठी तुम्ही वापरलेली "...ते अंतर दोघांमधले राहून गेले ..." ही ओळ मला काहीसी गद्य वाटली....

"मिटाया ना गया..." मध्ये प्रयत्न केल्याची जशी जाणीव होते, तशी "....अंतर राहून गेले...' मध्ये हतबलता उमटते...प्रयत्नाची उल्लेख येत नाही.... घटनेचा उल्लेख वाटतो.

"दाग जो तूने दिया दिलसे मिटाया ना गया ...."
साठी...
"तुझ्या व्यथेचा व्रण हृदया जाळत राही...." योजन आहे. मला याऐवजी "तुझ्या विरहाचा व्रण हृदया जाळत राही...' आवडले असते. प्रत्यक्ष 'तिची व्यथा' काहीच नाही....काहीतरी अस्मानीसुल्तानी झाल्यामुळे याला तिचा 'विरह' सहन करणे क्रमप्राप्त आहे....आणि त्या विरहाचा व्रण त्याने आपल्य हृदयी कोरला आहे.

असो...ही काही तक्रार नव्हे, फक्त एका चांगल्या भावानुवादाच्या प्रेमापोटी एका वाचकाच्या मनी आलेले मोडकेतोडके विचार आहेत असे मानावे.....बदल करण्याची गरज नाही.

अशोक पाटील

काव्य म्हणून खूप आवडले
.............अनुवाद म्हणून नाही आवडले क्षमस्व !
Happy

-----------------------------
संपादित करताना दोनदा आला म्हणून डिलिटला हा प्रतिसाद Happy

सर्वच प्रतिसादकांचे खास आभार. या अशा वैविध्यपूर्ण प्रतिक्रिया नसल्या तर चुकल्याचुकल्यासारखे वाटले असते.
मी भास्कर, दिनेशदा कवीमनाने समजून घेणारे,बेफिकीर,विनायकजी,वैभव स्वतः चिकित्सक कवी तर अशोकजी प्रत्येक अर्थच्छटेचा साक्षेपी विचार करणारे ,त्यामुळे समीक्षकाच्या भूमिकेत जाणारे.

जाईने अगदी सुरुवातीला जे निरीक्षण नोंदवलेय (''केवळ शब्दशः अनुवाद न करता...'') तेच बेफिकीरनी सौम्य अप्रत्यक्ष शब्दात सांगितलेय (शब्दनिवड, वातावरण निर्मीती, दोन्ही अगदी स्वतंत्र काव्यरचनेइतकेच सुंदर!) अन वैभवला कदाचित हे स्वातंत्र्यच पटले नाहीय.

अशोकजी, होय, हा एक भावानुवाद आहे.. तुम्ही केलेला रसास्वाद खरेच अद्भुत ! काव्य इतके समजून वाचले जावे यासारखा कवीचा सत्कार नाही..तरीही मूळ निर्मितीसारखीइतकीच अनुकृती हा एक जैविक ढाचा असतो, त्यात बदल करणे खूपदा कवीला जड जाते.कधी मात्रांचे गणित ढळते, कधी नंतरच्या जोडणीत वेगळाच अर्थविक्षेप येतो.तुमचे आक्षेप साभार अन सादर मान्य..माझ्या बाजूने खुलासा करण्याचा हा प्रयत्न -
'ते अंतर दोघांमधले राहून गेले ' असे म्हणताना का राहून गेले हे आधीच्या ओळीत -मूळ काव्यात नसलेल्या- ''दोष कुणाचा रोष कशाचा ना कळले'' यात ती गूढ परिस्थितीजन्य नियती झळकून गेलीय जिच्यामुळे अंतर मिटवता न येता राहून गेलेय..
'तुझ्या व्यथेचा व्रण हृदया जाळत राही' इथे तुमचा पर्याय घेतला (तुझ्या विरहाचा व्रण..) तर एक मात्रा वाढते. बरं 'विरहव्यथेचा व्रण हृदया जाळत राही' असे करता येईल पण 'तुझ्या' हा शब्द मला सोडवत नाहीय..'तू' दिलेला व्रण आहे त्याला कोणतेच नाव नाही, तुझा अभाव हेच त्याचे नाव असे काहीसे.

फूल काल,निर्माल्य आज,शेवटी माती >>>> हे विशेष उल्लेखनीय >>> +१

हे गाणं अत्यंत आवडतं. भारती, चांगलं जमलं आहे पण काही ठिकाणी गद्य वाटतंय..काही शब्दांमुळे. उदा. कथानकाअंती.

अश्विनी, का ग गद्य म्हणतेस ? असो. 'कथानकाअंती' मला तर वेगळं अन छान वाटतंय (आपलं पोर सुंदर दिसावं त्यातला प्रकार Happy )
चिमण,मामी, आभार.. मामी , तुमचा प्रतिसाद बघून मस्त वाटलं.

माहित नाही गं का वाटतंय ते! परत एकदा वाचून तो शब्द काव्यात्मक वाटवायचा प्रयत्न केला पण माहित नाही......
तू त्याबदली अजून काही शब्द सुचतोय का बघ ना. तुझी कॅपॅसिटी आहे आणि तुझी शब्दसंपदाही अफाट आहे.
"विरहवेदना अटळ या कहाणीअंती" वगैरे चालेल? :लहान तोंडी मोठा घास गिळून बांध बसलेली बाहुली: Uhoh

भारती....

तुमचे काही प्रतिसाद वाचून थोडेसे सविस्तर लिहितो.

मी दिलेला प्रतिसाद तुम्हाला भावल्याचे तुमच्या भाषेवरून समजतेच; पण माझे मत म्हणजे तुमच्या भावानुवादाचे टीकात्मक परीक्षण आहे असे कृपया मानू नये. ती एक सहजतेने आलेली उत्स्फुर्त भावछटाच आहे, जी तुमच्या प्रतिभेला दिलेली एका वाचकाची दाद समजा. मी जाणीवपूर्वक तिथे लिहिले आहे की, प्रतिसाद वाचून तुमच्या मूळ रचनेत कसलाही बदल करू नये...त्याची आवश्यकता नसते. कवीची प्रतिभा आणि वाचकाचे मत यामध्ये सात समुद्राचे अंतर असते....किंबहुना तसे कवीने ठेवलेच पाहिजे या मताचा मी आहे. आलेल्या सकारात्मकन प्रतिक्रियांमुळे कवीला जरूर हुरुप येतो, असे असले तरी नकारात्मक मतांकडे दुर्लक्षही करू नये. कारण कित्येकवेळा अशी डावी मते कवीसाठी दिशादिग्दर्शनाचे काम करू शकतात. मी काव्यप्रेमी जरूर आहे [मी कलाशाखेचाच विद्याथी होतो] पण म्हणून मी स्वतः काव्यरचना कधीच करू शकलो नाही, तो माझा पिंडही नव्हेच. कारण मी मानतो की काव्य ही एक जन्मजात देणगी आहे.... जी फारच थोड्यांच्या नशिबी येते.... त्याचे 'सिम्पट्म्स' मला तुमच्या काव्यात दिसले/दिसतात हे मात्र मी अधिकारवाणीने म्हणतो, तितकी माझी पोच/माझे वाचन नक्कीच आहे.

मीटरच्या अनुषंगाने काव्यरचना करणे एक महत्वाचे कसब मानलेच पाहिजे. कित्येकवेळा ते किती कष्टदायक आणि वेळखाऊ काम आहे हे फक्त कवीच जाणतो. आमच्यासारखे किरकोळ वाचक काय, काहीही सुचवू शकतात....त्याला कितपत महत्व द्यायचे हे कवीनेच ठरविणे योग्य. मात्र कवी आणि वाचक यांच्यात प्रतिभेविषयी नातेसंबंध असणेही महत्वाचे, त्याशिवाय दोन्ही घटकांत नीट संवाद होऊच शकणार नाही. मी तुमच्या भावानुवादाविषयी लिहिले म्हणजे तुम्ही केलेल्या कवितांवर भाष्य करण्यास सर्वस्वी पात्र आहे असा त्याचा अर्थ नाही. पण निदान त्यामुळे तुम्हाला अधिकचा आत्मविश्वास जरूर मिळू शकतो अशी माझी धारणा आहे.

कवीने नेहमी त्याला स्वतःला ऐकू येत असलेल्या आवाजाच्या दिशेनेच जावे हे कवितेच्यादृष्टीने अंती सुखकारक असते. ....

कुणीतरी म्हटलेच आहे की, "एकल्याने गावे, एकट्याचे गाणे, परक्याचे नाणे, खरे खोटे...".

अशोक पाटील

अशोकजी, तुमचं कालचं भावपर भाष्य अतिशय आवडलं तरी ती एक भावच्छटा आहे हे अगदी खरेपणानं लिहिलंत आता तुम्ही. या छटा पहातापहाता बदलतात हे जाणतो आपण.तुम्ही लिहिलंत,
>>दोघांच्या प्रीतीच्या कळीने पूर्ण फुलाचे रुप घेतले नाही....परिस्थितीवश, पण म्हणून 'तो' 'तिच्या' विषयी तक्रारीचे सूर न काढता जे काही भाळी वाट्याला आले तेच अत्यंत नम्रपणे मांडत आहे. मूळ चित्रपटातील कथानकाचीही मागणी तशीच होती.

ही एक सुंदर 'कथानकछटा.' चित्रकथेपलिकडे जाणार्‍या या काव्याची गूढता अशी मनोरम की ही छटा क्षणात बदलून अशीही दिसू शकते-
>> परिस्थितीचेही तेवढेसे बंधन नव्हते, दोघेही एकमेकांना आवडत होती,पण एका निर्णायक क्षणापर्यंत ती दोन्ही माणसे पोचली नाहीत्..कदाचित अतिचिकित्सा करत राहिली, कदाचित एखाद्या ध्येयाला वा समजा करीयरला फॉलो करत राहिली,कदाचित दुसर्‍याने आग्रहाने आपल्याला विनवावे अशा सूक्ष्म आत्मसन्मानापोटी दु;खी होत राहिली (इथे मला पु.शि.रेगेंची सावित्री आठवतेय )..

हे अभिजात साहित्याचे सौंदर्य की ते अंतिम निष्कर्षापर्यंत पोचू देत नाही,आयुष्याइतकेच अथांग रंग दाखवतं.

मीटर वगैरेबद्दल माझा अनुभव असा की बरीचशी कविता जशी सुचते तशी निसर्गतः सुंदर असते, जिथे अडते,तिथे कवीला बर्‍यापैकी अडवते..

बदल शक्यतो (स्वलिखित )कवितेत करूच नयेत हे माझेही वैयक्तिक मत (तुम्हीही तसेच लिहिले होते )कारण पुनः तेच,ती निर्मिती अज्ञातातून येते तेव्हा मला जास्त सुंदर वाटते.. ..अर्थात भावानुवाद ही एक वेगळी जबाबदारी असल्याने मी बदलांचा विचार केला,ते जमत नाहीत हे पक्के झाल्याने ते केले नाहीत..

शेवटी कवी आणि वाचकाबद्दल.. कविता लिहून झाल्यावर ती वाचकाचीच असते, त्याच्या/तिच्या मनात तिचे पुनर्घटन होत असते, कवितेचे रसिकाने केलेले मूल्यमापन हा तिचा सर्वात मोठा सत्कार असतो हे तर मी मानतेच, कित्येकदा कविता मूळ आशयाला transcend करून कवीच्या व्यक्तीगत परिप्रेक्ष्यापलिकडच्या रसिकांच्या सर्वगत विशाल आशयाच्या स्थलकालातीत आकाशात पोचलेली दिसते..

भारतीजी ,
कविते बद्दल लिहणे बाकी राहिलेच नाही.कविता लिहण्या बद्दल लिहले गेलेलेही अभ्यास करण्या सारखे आहे,

,<<<<<<<<तरीही मूळ निर्मितीसारखीइतकीच अनुकृती हा एक जैविक ढाचा असतो,,,,,<<<<<अभिजात साहित्याचे सौंदर्य की ते अंतिम निष्कर्षापर्यंत पोचू देत नाही,आयुष्याइतकेच अथांग रंग दाखवतं.,,,<<<<<<<अनुभव असा की बरीचशी कविता जशी सुचते तशी निसर्गतः सुंदर असते....शेवटी कवी आणि वाचकाबद्दल.. कविता लिहून झाल्यावर ती वाचकाचीच असते, त्याच्या/तिच्या मनात तिचे पुनर्घटन होत असते, कवितेचे रसिकाने केलेले मूल्यमापन हा तिचा सर्वात मोठा सत्कार असतो हे तर मी मानतेच, कित्येकदा कविता मूळ आशयाला transcend करून कवीच्या व्यक्तीगत परिप्रेक्ष्यापलिकडच्या रसिकांच्या सर्वगत विशाल आशयाच्या स्थलकालातीत आकाशात पोचलेली दिसते.....

सगळ सुंदर निबंधा सारखे आहे .वाचणाऱ्याला BONUS.

चर्चा अतिशय मौलिक व मार्गदर्शनपर ठरते आहे
अशोक जी , भारतीताई धन्स .....खूप शिकायला मिळते आहे

विक्रांत, वैभव, कवितेशी संबंधित सगळेच आनंददायी.. आनंदाचे डोही आनंद तरंग !

माझ्या प्रतिसादात व्यक्त झालेली मते विशेषतः निर्मितीबद्दलची (''बरीचशी कविता जशी सुचते तशी निसर्गतः सुंदर असते''), मूलतः कवितालेखनाला जास्त लागू पडतात. एरवी निर्मितीप्रक्रियेच्या तर्‍हा अनेक असतात, पण चांगली कविता मुळातच सुडौलपणे प्रकटते असा अनुभव असल्याने असे लिहिले गेले.मुद्दाम प्रयत्न अन आळवणी करावी तेव्हा ही देवी रुसलेली रहाते आणि अकल्पितपणे कशी सालंकृत प्रकटते हे कोडे मला समजून घ्यायचे नाही..बा.भ.बोरकरांच्या सुंदर शब्दात-
''कायाकल्पित सिद्ध शब्द असले नि:शब्द साकारती
मायानाट्यविलास जेवि विभूचे ऐश्वर्य विस्तारती
माझे चित्त सकंप गूढ विभूचा चित्रस्त्रवी आरसा
त्याचा विश्वविकाससंविद असा वर्धिष्णु वा वारसा

-लावण्योत्सव पाजळे प्रतिपळे कोण्या द्युतीच्या मुळे ?
मापू ये न मुळी तयापरी उरे अंती दहा अंगुळे !!

भारतीजी,

पद्यानुवादाच्या उपक्रमाबद्दल धन्यवाद. काही मिश्र प्रतिक्रिया येणे स्वाभावीक आहे. मुळच तलतजींच्या आवाजातल हे गाण इतक मनमोहक आहे. त्यातले शब्द चित्तवेधक आहेत. कधी कधी पद्यानुवाद चपखल असेलच असे नाही. पण याचा अर्थ प्रयत्न करुच नये असे नाही.

अश्विनी, का ग गद्य म्हणतेस ? असो. 'कथानकाअंती' मला तर वेगळं अन छान वाटतंय>>>

या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या..

तुमच्या काव्या इतकंच तुमच मन तरल असल्याचे जाणवते.

पुलेशु!