सा-या जगाशी केवढे पटवून घेते एरवी !

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 January, 2013 - 00:57

तू वृक्ष डेरेदार अन मी करपलेली पालवी ...
माझ्या तुझ्या फुलण्यामधे इतकी तफावत वाजवी !

होते चुकामुक नेहमी सांगड कशी घालू सख्या
स्वप्नात येण्याची तुझ्या तू वेळ ठरवाया हवी !

माझ्या स्वभावाचा नको बांधूस तू अंदाजही
भेटेन मी जेव्हा मला वाटेन मी सुध्दा नवी !

'ती यायची अन भर-दुपारी चांदणे बरसायचे'
जागेपणी सुध्दा खुळा स्वप्नात वावरतो कवी !

माझ्यातल्या 'मी' शी जरी अष्टौप्रहर मी भांडते
सा-या जगाशी केवढे पटवून घेते एरवी !

चुकले असावे रे तुझे कोठेतरी, काहीतरी
होणार नाही अन्यथा भाषा अचानक आर्जवी

आता नवी जागा बघा माझ्याकडे राहू नका
थरकाप दु:खांचा जुन्या ह्रदयास माझ्या गोठवी

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकले असावे रे तुझे कोठेतरी, काहीतरी
होणार नाही अन्यथा भाषा अचानक आर्जवी

तू वृक्ष डेरेदार अन मी करपलेली पालवी ...
माझ्या तुझ्या फुलण्यामधे इतकी तफावत वाजवी !

होते चुकामुक नेहमी सांगड कशी घालू सख्या
स्वप्नात येण्याची तुझ्या तू वेळ ठरवाया हवी !

माझ्या स्वभावाचा नको बांधूस तू अंदाजही
भेटेनही जेव्हा मला वाटेन मी सुध्दा नवी !<<<

शेर आवडले. गझलही आवडली.

ष्टौप्रहर

धन्यवाद Happy

>> चुकले असावे रे तुझे कोठेतरी, काहीतरी
होणार नाही अन्यथा भाषा अचानक आर्जवी

आता नवी जागा बघा माझ्याकडे राहू नका
थरकाप दु:खांचा जुन्या ह्रदयास माझ्या गोठवी

मस्त.
वादाडते हा शब्द ऐकला नव्हता.

चुकले असावे रे तुझे कोठेतरी, काहीतरी
होणार नाही अन्यथा भाषा अचानक आर्जवी

वा.. मस्त शेर. आणि चांगली गझल.
('वादाडणे' मात्र पचले नाही.)

शुभेच्छा.

मनःपुर्वक धन्यवाद ज्ञानेशजी

माझ्यातल्या 'मी' शी जरी अष्टौप्रहर वादाडते
सा-या जगाशी केवढे पटवून घेते एरवी

प्रथम हा शेर असा केला होता

माझ्यातल्या 'मी' शी जरी अष्टौप्रहर मी भांडते
सा-या जगाशी केवढे पटवून घेते एरवी !

मी -मी दोनदा येत होते म्हणून वादाडणे- वाद घालणे या अर्थी सर्रास वापरात असलेला शब्द प्रयोग करावासा वाटला .

बदल केला Happy

-सुप्रिया.

वाहवा, सुप्रिया!!

सुटे मिसरे अधिक आवडले ह्या गज़लेतले..

माझ्या तुझ्या फुलण्यामधे इतकी तफावत वाजवी !

होते चुकामुक नेहमी सांगड कशी घालू सख्या>> Happy

आणि हा शेर खासच...
माझ्या स्वभावाचा नको बांधूस तू अंदाजही
भेटेनही जेव्हा मला वाटेन मी सुध्दा नवी !

आर्जवाचाही मस्त, वास्तववादी...

माझ्यातल्या 'मी' शी जरी अष्टौप्रहर मी भांडते
सा-या जगाशी केवढे पटवून घेते एरवी !
आहा..........ज्जे ब्बात

तू वृक्ष डेरेदार अन मी करपलेली पालवी ...
माझ्या तुझ्या फुलण्यामधे इतकी तफावत वाजवी !>>>>>
..................... एवढी मोठी तफावत वाजवी कशी हे न कळले.