दोडक्याचे थालिपीठ

Submitted by मानुषी on 20 January, 2013 - 00:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
३/४ कोवळे दोडके, साधारण २ वाटया तांदळाचे पीठ, २ हिरव्या मिरच्या बारीक वाटून(ठेचून),
१ चमचा जिरे पावडर, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून, मीठ चवीपुरते, पाव वाटी नारळाचा चव, पाणी, तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती: दोडके स्वच्छ धुवून त्याच्या शिरा साल काढण्याने काढून घ्या. त्या नंतर चटणीसाठी वापरा. व फक्त शिराच काढा. आपण दोडके कोवळे घेतलेत. फार सालं काढू नयेत. दोडके किसून घ्या. या किसात साधारण २ वाट्या तांदूळ पीठ, १ चमचा तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा जिरे पावडर, वाटलेली मिरची, नारळाचा चव व चवीपुरते मीठ घालून, पाणी घालून याचा गोळा तयार करा. मळून घ्या.
दोडक्याच्या किसालाही पाणी सुटते, त्याचा अंदाज घेऊन हळूहळू पाणी घाला.
एका नॉनस्टिक पॅनला तेलाचा हात पुसून घ्या. त्यावर तयार पिठाचे मध्यम जाडीचे थालिपीठ थापा. त्याला ४/५ भोके पाडा. झाकण ठेऊन आधी गॅस् मोठा ठेवा. नंतर बारीक फ़्लेमवर थोडा वेळ ठेवा.
नंतर भोकांमधे एकेक थेंब तेल सोडा.(हे ऑप्शनल.)मग उलटा व पुन्हा थोडा वेळ भाजू द्या. एखाद्या मिनिटानी गॅस बंद करा. व थालिपीठ घरच्या पांढर्‍या लोण्याबरोबर सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
यात सामग्रीत साधारणपणे ३ थालिपिठे होतात.
अधिक टिपा: 

हे पांढरे व हिरवट थालिपीठ छान दिसते. म्हणून यात काळा मसाला किंवा लाल तिखट घालू नये.
नारळाचा चव: ज्या घरांमध्ये नारळ भरपूर प्रमाणात वापरतात, त्यांच्याकडे बर्‍याच वेळा नारळाचे दूधही वापरतात. अश्या वेळी दूध काढून उरलेला चोथा शिल्लक असतो. खरं म्हणजे या थालिपिठात हा चोथाच वापरतात. हा चोथा गोव्याकडे तांदळाच्या भाकरीतही वापरतात.
पण आपण फ़्रेश खवलेला नारळही घालू शकतो. त्याचे थालिपीठ अर्थातच जास्त चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी...जिचं माहेर गोव्याचं आहे. त्यामुळे तिच्याकडून "गोंयच्या" शाकाहारी स्पेश्यालिटीज चाखायला आणि शिकायला मिळाल्या.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा!! मस्त लागत असणार..
दोडके आले नाहीत अजून बाजारात पण आले की नक्की करेन. Happy

सारीका, धन्यवाद!
प्रतिसादक...........अहो आहात कुठे? आले आहेत बरं दोडके!!!
फोटो टाकायचे आहेत...........कसे?

मानुषीताई छान.

मी भाजणीच्या थालीपीठात टाकते ब-याचदा कांद्याबरोबर दोडका. कोवळा असेल तर तसाच शिरा न काढता. मला सवयच झालीय की थालीपीठात कांदा नुसता न टाकता एखादी पालेभाजी किंवा घोसाळे, शिराळे, कोबी, दुधी अशा भाज्या त्याच्याबरोबर टाकायची. खोबरं मात्र नाही घातलं कधी.

तांदुळाच्या पिठाचे करुन बघेन ह्या पद्धतीने. Happy

Aamchya kade dodkyacha bhaji chi phala khup awadtat..
Ani chatani dekhil..

Thalipith pahilyandach aikte ahe.. Nakki karun baghin.. Ya divsat dodke chhanach miltat..