सप्रेम नमस्कार विनंती विशेष

Submitted by जयनीत on 12 January, 2013 - 04:52

प्रिय मन्नूस,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व.
आज मी मुद्दाम प्रयत्न करून तुला मोठे आणि सविस्तर पत्र लिहित आहे, कारण इथल्या नवीन शाळेतल्या मॅडम ज्यांना इथे बाई म्हणतात त्या नेहमी माझ्या गचाळ हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी खूप रागावातात. इतक्या मोठया शहरातून आलास तरीही तुझं लेखन इतकं अशुद्ध आणि अक्षर इतकं खराब कसं असं त्या नेहमी म्हणतात. पण त्यांना माझे निबंध मात्र खुप आवडतात, ते त्या सगळ्या वर्गांमधे वाचुनही दाखवतात. त्या माझे नाव आंतर शालेय निबंध स्पर्धेत पाठवणार आहेत, आणि माझा नंबर जिल्ह्यातुन पहिला आलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या. पुढच्या वर्षी शाळा सुरु झाल्यावर लगेच ती स्पर्धा होणार आहे म्हणून त्यांनी मला लिहिण्याचा सराव करण्यास सांगितले आहे आणि शुद्धलेखन आणि हस्ताक्षर सुधारायलाच हवं असे त्या म्हणाल्या. आता मला निबंध स्पर्धेसाठी तरी लिहिण्याचा सराव करणे भाग आहे.
असो. आम्ही आजच नंदोरी (जिल्हा छिंदवाड़ा, मध्य प्रदेश) हून मोर्शीला पोहचलो. नंदोरीला माझ्या मामाची शेती आहे. ते फारच छोटे तीनशे लोकवस्तीचे गाव आहे. तिथे पोस्ट ऑफिस नसल्या मुळे तुला पत्र पाठवता आले नाही. नंदोरी हे फार लहान गाव असले तरीही फारच सुन्दर व निसर्गरम्य आहे. ते गाव मला फार आवडते. तिथल्या जंगल आणि पहाडा वर भटकताना फारच मजा येते. तिथले लोकही फार चांगले आहेत, ते प्रत्येकाशी फार आदराने वागतात मी इतका लहान आहे तरीही इथली मोठी माणसेही येत जाता मला सुद्धा अभिवादन करतात, आपल्याकडे जसे कुणी भेटल्यावर ' राम राम ' म्हणतात तसे इथे ' जय रामजी की ' म्हणतात. इथली भाषा हिंदी असून ती फारच गोड भाषा आहे, आता त्या भाषेचा मला चांगला सराव झाला आहे. इथे शहरा प्रमाणे पक्के डांबरी रस्ते नाहीत अन गाड्याही नाहीत इथे फक्त बैलगाडी, रेंगी, छकडे नाहीतर पायीच लोक प्रवास करतात. इथे जंगलात दूर दूर अंतरावर पाच पाच दहा दहा घरांचे पाडे असतात तिथे वीज ही नसते तिथे लहान लहान मुले बाहेर खेळत असतात इथे लोकांना रहायला भीती कशी वाटत नाही ह्याचेच मला आश्चर्य वाटते. इथल्या गमती जमती नंतर कधीतरी.
मोर्शी हे आमचे नवीन गाव अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून हे गाव सुध्दा खूप चांगले आहे, इथे आमच्या घराजवळच दमयंती नावाची नदी आहे, तिच्या किना-यावर खेळायला आणि रेतीचे किल्ले बांधायला फार मजा येते. इथली मुले अभ्यासात मागे असली तरीही खेळां मध्ये मात्र फार पटाईत आहेत. आमच्या शाळेत झालेल्या क्रिडा स्पर्धां मध्ये मी ह्या वर्षी फार मागे पडलो, पण कबड्डी मध्ये माझा खेळ बघून मात्र सर्व मुले माझ्याशी बोलायला लागली. शाळेच्या कबड्डी संघात माझी निवड झाली आहे. मला कबड्डी हा खेळ मला किती आवडतो हे तुला तर माहीत आहेच तो इथे वाड्यात अन नदी जवळ मुलां सोबत मी सतत खेळत असतो. पुढच्या वर्षी मात्र इतर खेळातही प्रगती करायचे ठरवले आहे.
इथून जवळच सालबर्डीला दरवर्षी महादेवाची यात्रा भरते तेव्हा खूप मजा येते. तिथे जत्रेत मी रामलीला बघितली. त्यात रामसेतूची कथा सांगितली होती, रामाने वानरसेनेला लंकेत नेण्यासाठी दगडाचा पूल बांधला होता असे म्हणतात, त्या कथे मधे भक्तीचा महिमा सांगितला होता रामाचे नाव लिहिल्यावर दगड कसे तरंगायला लागले हे सांगितले होते, मी आमच्या नदीत रामाचे नाव लिहून दगड टाकला पण तो तर तरंगला नाही, मग मी तसे त्या रामलीलावाल्यांना सांगितले तर सगळे हसायला लागले, एक मोठे बाबा त्या गटा सोबत होते ते म्हणाले की तुझ्यात भक्तीची कमी आहे असे म्हणून असे झाले, मी म्हटले मग तुम्ही रामाचे नाव लिहून दगड कसा तरंगतो हे दाखवा, तर ते म्हणाले हे कलियुग आहे म्हणून आजकाल तसे होत नाही. तू लहान आहेस मोठा झाल्यावर तुला सारे समजेल असे ते म्हणाले.
असो. घरी आल्यावर बाकी मुलांनी माझ्या प्रश्नांबद्दल सांगीतले, त्या वरून सगळे मोठे लोक मला फार रागावले." मेल्या तुला काही लाजलज्जा? असे मूर्खा सारखे प्रश्न विचारात बसतोस?" असे सर्वजण म्हणाले. बाबांना कळल्या वर तर त्यांनी तर ते ऐकुनच सरळ कपाळाला हात लावला." जिभेला काही हाड तुझ्या? कसं व्हायचं ह्या कार्ट्याच काही कळत नाही " असं ते म्हणाले." नुसते प्रश्न नुसते प्रश्न. परीक्षेत काय दिवे लावतोस ते माहीत आहे आम्हाला. प्रश्नां पेक्षा उत्तरां कड़े लक्ष दिलं तर भलं होइल " असं ते म्हणाले. पण मागे एकदा मी परिक्षेच्या वेळी मित्राची गाईड घरी घेउन गेलो होतो आणि प्रश्नांची उत्तरे पाठ करत होतो तेव्हा पण ते मला खूप रागावले होते. गाईड वाचून नुसती उत्तरं पाठ केलीस तर विषय पूर्णपणे कसा कळेल असं म्हणाले होते. कसे वागावे हेच कळत नाही. बाबा नेहमीच माझी तुलना त्यांच्या एका मित्राशी करतात. ते ही लहान पणी असेच प्रश्न विचारायचे असे म्हणतात, '' काय झालं शेवटी त्याच? चांगला हुशार होता पण अभ्यासा पेक्षा इतर सटर फटर वाचण्यात आयुष्य घालवल, पार मातेरं करून टाकलं आयुष्याच!'' असे ते नेहमी म्हणतात. हे काका म्हणजे बाबांचे बालपणीचे मित्र अगदी तुझ्या माझ्या सारखेच. ते खुप खुप चांगले आहेत. त्यांना तुझ्या माझ्या बाबांसारखी कायम नोकरी नाही, ते सतत नोक-या बदलत असतात. त्यांचं कधीच कोणाशी पटु शकणार नाही असं बाबा नेहमी म्हणतात.
आजीचा पण काकांवर फार जीव," मेल्यानं चांगल्या सोन्या सारख्या आयुष्याच पार वाट्टोळ केलं. लहानपणी अगदी गुंड होता गुंड!" असे ती नेहमी म्हणते," प्रश्न सारखे प्रश्न, अगदी तुझ्या सारखेच. अन सतत वाचन, जे मिळेल ते वाचत सुटायचा, त्यासाठी तर मेल्यानं किती मार खाल्ला पण सुधारला नाही, अन वाचन तरी कोणतं आभ्यासाच सोडून बाकी सर्व मग मार नाही खाणार तर काय? ह्या पुस्तकांनीच बिघडवलं त्याला. अच्छा जे वाचायच ते ते तरी त्याला कुठलं पटायला त्यावर ही मोठ्यांशी वाद घालायचा, त्याला काही भिड भाड़ म्हणून नाहीच. अरे इतकी मोठमोठी पुस्तकं लिहिणारे काय मुर्ख असतील? पण नाही जशी काही सारी अक्कल ह्यालाच! अरे मी म्हणते पुस्तकं लिहिणं हे थोरामोठयांचे काम आपण त्यांच्या पासंगालाही पुरणार आहोत का? आपण त्यात कशाला खुपसायच? आपण साधी माणसं आपण आपलं आभ्यासापुरतं वाचायचं अन मोकळं व्हायचं. पण ते नाही! ह्याचा तालच वेगळा, बाकी सगळी पोरं सोरं शिकून मार्गाला लागली अन हां राहिला मागे. कशाला वाचायच इतकं! पूर्वी कुठे इतकी पुस्तकं होती? अन कुठे होतं हे शिक्षणबिक्षण? पण जग चाललच होतं ना? तुझे आजोबा फ़क्त दोन बुकं शिकले होते, पण केलाच ना संसार त्यांनी? माझे (म्हणजे तिचे) बाबा त्यांच्या काळात तर काहीच नव्हतं मग काही अडलं का त्यांचं? अन बाया कुठे शिकायच्या आधी पण संसारात काही अडलं का कधी?" आजीच्या तोंडाचा पट्टा सतत सुरूच असतो. मग तो कुठून कुठल्या विषयावर जाईल ह्याचा काही नेम नसतो, मग ती आजकालच्या शिकलेल्या पोरींच्या नावाने शंख करते." आजकालच्या पोरी चार बुकं शिकतात आणि संसाराची कशी वाट लावतात हे चांगलं माहीत आहे मला!" आई पण ते ऐकून सतत हसत असते. आजीचा शब्दनशब्द मला पाठ आहे. त्यात काहीही नवीन नसतं फ़क्त लिहीण्याच्या सरावासाठी मी लिहित आहे.
असो.माझी मोर्शीची शाळा फार चांगली आहे. मोर्शी हे गाव सुध्दा फार चांगले आहे, इथे संत्र्याची फार मोठी बाजारपेठ आहे, इथल्या मंडईत संत्र्यांच्या मोठमोठ्या राशी लागल्या असतात, तिथले व्यापारी फार चांगले आहेत ते आम्हाला खूप संत्रे खायला देतात. लहान दोघ तर सतत मंडईतच खेळत असतात. इथल्या संत्र्याच्या राशी बघून मला नंदोरीच्या भुईमुगाच्या शेंगांच्या राशी आठवतात.
इथे मला खूप नवीन मित्र मिळाले. तू कधी इथे येउन त्याना सगळ्यांना भेटावं असं मला फार वाटतं. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की ये तुझे आई बाबा अन मनी पण आली तर फार मजा येइल. मी तुला इथल्या सगळ्या गमती जमती दाखवीन.
आता लवकरच परीक्षेचा निकाल आहे. मला त्याची फार भीती वाटत आहे, दोन पेपर तर फारच खराब गेलेत, मी कदाचित नापास होणार असे मला वाटते, तसं झालं तर सगळे मला खुप रागावातील, माझे खेळणे तर पूर्णपणे बंद होउन जाईल. रात्री तर मला खुप खुप वाईट स्वप्ने पडतात, मी नापास झालो आहे आणि घरून पळून गेलो आहे असे दिसते, घरा पासून खूप दूर रात्रीच्या वेळी एका झाड़ा खाली बसून आहे असे दृश्य दिसते, मग मी आजुबाजुला बघतो तर बंद झालेला आठवडी बाजार दिसतो जवळपास कुणीच नसते, दूर दूर काही लोक शेकोटी पेटवून बसलेले दिसतात पण मला त्यांची भाषा काही कळत नाही, अन तेही माझ्या कड़े फारसे लक्ष देत नाहीत असे दिसते, मग मला अजुनच भीती वाटते, मी मग तिथून निघून जातो पण समोर अंधारात घनदाट जंगल दिसते.
जर मी खरच नापास झालो तर मला नक्कीच तसे घर सोडून जावे लागेल असे वाटते. मग बहुतेक असेच होइल असे वाटते. रात्री लवकर झोप येत नाही, भलते सलते विचार येतात, मी झोपण्याचा खुप प्रयत्न करतो लवकर गाढ झोप लागुन सकाळी उठल्यावर आपण मोठे झालेलो असले पाहिजे असे वाटते, पण तसे कधीच होत नाही. पण तरीही हा मधला काळ कधी एकदाचा निघून जातो अन आपण एकदाचे मोठे होऊन जातो असे सतत वाटत राहते. खरच माणसानी लहान कधीच राहू नये हो ना?
लहान असले की आपल्याला आपल्या मनासारखे कधीच वागता येत नाही, सर्वांचे नेहमी ऐकावे लागते. मोठे झाल्यावर मात्र कोणी रागावाणारा असत नाही, मग आपण सगळं काही आपल्या मना सारखे करू शकतो कुणालाही काही विचारायची गरज नसते. ह्या वर्षी पण मनासारखे फटाके उड़वता आले नाहीत मोठया लोकानी लक्ष्मी बोंम्ब, सुतळी बोंम्ब आणि अ‍ॅटम बोंम्ब घेऊ दिले नाहीत, लहान मुलांसाठी ते घातक असतात असे घरचे मोठे म्हणतात, पण वाड्यातली बाकी मुले तर ते फटाके फोडतात त्यांना तर काहीच होत नाही, मला साप, चक्र, अनार, आणि फूलझड़ी हे फटाके काही आवडत नाहीत ते तर मुलींचे फटाके आहेत. पण माझे कोणी ऐकत नाही, मोठा झाल्यावर आपल्याला नोकरी लागेल तेव्हा आपल्या जवळ खुप पैसे असतील मग आपण तेव्हा आपल्या मनासारखे वागू शकू. मग आपल्याला रागवणारा कुणी राहणार नाही मग आपण खुप खुप मजा करू.
आता तर आपण वेगवेगळ्या गावात आहोत पण लवकरच कधी तरी माझ्या बाबांची तुझ्या बाबांच्या गावात किंवा तुझ्या बाबांची बदली आमच्या गावात व्हावी असे मला वाटत राहते तसे झाले तर किती मजा येइल ना? मग आपण पुन्हा शेजारी राहू शकू आणि एकाच शाळेत अ‍ॅडमीशन घेऊ, आपण पुन्हा एकाच वर्गात आलो तर खूपच छान होईल.
अजून एक, मोठे झाल्या वर आपण एकाच गावात राहावे असे मला वाटते, आपण एकाच गावात नोकरी करू अन जवळ जवळ घर घेऊन राहू मग किती मस्त होइल? तुला काय वाटते ते पत्रानी कळव.
माझे पत्र मिळाल्या वर लवकरच उत्तराचे पत्र टाक मी वाट बघील. आणि आपल्या सगळ्या मित्रां बद्दलही कळव, मला त्यांची फार आठवण येते हे सगळ्यांना सांग. पुढच्या सुट्टीत जर तिकडे येणे झाले तर फार चांगलं होइल, मग सर्वांशी प्रत्यक्ष भेट होइल, पण बाबांचे काय ठरते ते माहीत नाही, पण आई, बाबा आणि ताई सुद्धा तुमच्या सगळ्यांची फार आठवण काढत असतात. हे तू तुझ्या आई बाबां आणि मनीला पण सांग.
आईने तुझ्यासाठी तुझा आवडता कैरीचा छुंदा अन मनी साठी तिचा आवडता आंब्याचा मुरांबा वेगळा काढून ठेवला आहे
असो. लवकरच आपली भेट व्हावी असे वाटते. मी तुझ्या आणि मनीसाठी इथल्या जंगलातून जमवलेले गूंज देइल. ते फार सुंदर दिसतात. आणि माझ्यापाशी खुप शंख शिम्पले पण जमले आहेत, ते मी इथल्या दमयंती नदीच्या रेतीतून शोधले आहेत, आपण मागे जमवलेल्या शंखांपेक्षा ते फार वेगळे आहेत ते तुम्हाला खुप आवडतील, आणि अजुन एक गम्मत, मी चांगले तीन मोठे शिंपले ख़ास मनीसाठी काढून ठेवले आहेत, ते एका पाकिटातच ठेवले आहेत ते मी आपली भेट झाल्या वर तिला देइल, पण ते हलकेच उघडून नळाखाली साफ़ करावे लागतील, जर जास्त जोरानी उघडले गेले तर त्याचे दोन भाग होतील मग त्यात काही मजा राहणार नाही, ते मनीला तिच्या कानाताले अन नाकाताली नथ ठेवायला कामात येतील, तिला ते खुप आवडतील. मी आपल्या सगळ्या मित्रांसाठी काजवे अन मासोळ्या पण पकडून बाटलीत ठेवल्या होत्या पण ते सगळे मरून गेले. मासे फ़क्त नदीच्या पाण्यातच जगु शकतात असे आई आणि बाबांनी मला सांगीतले अन हवा न मिळाल्या मुले बिचा-या काजव्यांचा जीव गेला, पुन्हा असे करू नको असे ते म्हणाले. मला पण फार वाईट वाटले मी पुन्हा असे करणार नाही.
आता खुप उशीर झाला आता पत्र संपवतो.

मोठ्यांना नमस्कार
xछोxट्यांxनाxअxनेxकxआxशिxर्वाxदx

ऊत्तराचे पत्र लवकर पाठव मी वाट बघील.

तुझाच
-----------------

ताजा कलम,
चार दिवसां पूर्वीच मी पत्र पोस्टात टाकणार होतो पण मी ज्या काकांचा उल्लेख केला होता ते काका बाबाना ख़ास भेटण्यासाठी मोर्शीला आले होते. खुप खुप मजा आली. मी तीन दिवस त्यांच्या सोबतच होतो. आम्ही दोघे खुप खुप फिरलो. मी त्यांच्यासोबत आजूबाजूच्या परिसरातील अनेक लहान लहान गावे बघितली. संध्याकाळी आम्ही नदीवर फिरायला गेलो होतो तेव्हा मी काकांना दगडाच्या गोष्टी बद्दल सांगितले तेव्हा ते खूप हसले आणि म्हणाले की त्यात अजून खूप खूप विसंगती आहेत त्याकाळी विज्ञान इतके प्रगत म्हणा किंवा मंत्रशक्ती इतकी प्रभावी होती म्हणा की त्याद्वारे विमाने उडवता यायची मग जमिनी वरचे रथ मात्र नाही ते मात्र गरीब बिचारे घोडे ओढायचे अन तेव्हा खूप खूप प्रगत संहारक अशी अस्त्रे म्हणे पण ती सोडायचे कशाने तर काठी अन दोरीच्या धनुष्याने आहे की नाही गम्मत!
मी त्यांना हनुमानाच्या माकड असण्या बाबत शंका विचारली तेव्हा ते म्हणाले की खोल जंगलात खूप आधी पासून वस्ती करून असलेल्या कितीतरी जाती जमाती अजूनही दिसतात की त्यांच्यातल्या कित्त्येकांची चेह-याची ठेवण अजूनही पुष्कळशी आदिमानवाच्या चेहरेपट्टीशी मिळती जुळती आढळते अन रामायणाची कथा तर किती जुनी. मूळ कथेतील हनुमानाचे पात्र त्या जातीतील असावे हे जास्त तर्कसंगत वाटते पण झालं काय ' मर्कटा समान ' मधील ' समान ' हा शब्द गाळल्या गेला अन ' मर्कट ' उरला, गंमत बघ मर्कटाला शेपटी नसून कसे चालेल मग लोकांनी कल्पनेतील चित्राला मर्कटा समान शेपटी जोडली.
जुन्या कथा पुराणातल्या अनेक गोष्टी वेळोवेळी गाळल्या गेल्या अन ज्याला जशा सुचतील अशा गोष्टी जोडल्या गेल्या मुळे कसा विपर्यास झाला त्याचे त्यांनी उदाहारणही दिले ते म्हणाले हनुमानाला नेमकी मुळी ओळखण्यात अडचण आली म्हणून त्याने त्या सारख्या त्यानी जितक्या म्हणून दिसतील तितक्या मुळ्या उचलून आणल्या असाव्यात अशावेळेस कोणीही आश्चर्याने काय म्हणेल ' जणू काही त्याने सगळा पर्वतच उचलून आणला ' आता ह्यातील ' जणू काही ' हे शब्द गाळले गेले अन हनुमानाच्या पाठीवर पर्वत आला.
मला खूप प्रश्न पडतात आणि मी मोठा झाल्यावर त्यांची उत्तरे नक्कीच मिळवीन असे मी त्यांना म्हणालो तेव्हा आताच ह्याच वयात जे व्हायचं ते होतं मोठेपणाचं काही खरं नाही असे ते म्हणाले.
मोठेपणी काय होईल? असे मी त्यांना विचारले तर ते म्हणाले की मोठेपणी प्रश्नच पडणं बंद होतं कधी कधी.
मोठ्या माणसांना प्रश्न पडत नाहीत ह्याचे मला फार आश्चर्य वाटले मी त्यांना त्या बाबत विचारले तर ते म्हणाले पूर्णपणे नाही तरी थोड्या फार प्रमाणात सर्वां सोबत ते होतंच. मोठेपणी प्रश्नांचे स्वरूप बदलते तेव्हाचे प्रश्न फार छोटे अन आपल्यापुरते असतात हे असले प्रश्न ह्याच वयात पडतात असे ते म्हणाले.
मी मोठा झालो की अजून काय काय करणार आहे ते त्यांना सांगितले तेव्हा ते हसले " का रे मोठं व्हायची घाई झाली आहे का तुला?" असे त्यांनी मला विचारले. काय उत्तर द्यावे हे मला सुचले नाही. मला पण मोठं व्हायची अगदी अशीच घाई झाली होती त्यात काहीही नवीन नाही सगळ्यांना ह्या वयात तसच वाटतं असं ते म्हणाले. पण मोठं झाल्यावर कळलं की वयम मोठ्म खोटम असं का म्हणतात ते! असं पुढे ते म्हणाले.
मला ते पटले नाही पण मी काहीच बोललो नाही. पण माझ्या चेह-या कडे पाहून त्यांना ते कळले असावे ते म्हणाले असाच होतं आता ते तुला पटणार नाहीच मुंगी साखरेचा रवा लहानपणी कुणालाच आवडत नाही पण नंतर जन्मभर मात्र मनात त्याचाच गोडवा रेंगाळत राहतो .
काका मला आवडत असले तरीही त्यांचे सर्वच म्हणणे मला पटले असे नाही ' वयम मोठम खोटम ' हे तर बिलकुलच नाही. आपण तर मोठेपणी खूप खूप मजा करणार आहोत, हो ना?

असो, आता पत्र इथेच संपवतो.
तुला काय वाटते ते उलट टपाली कळव.
बाकी सर्व प्रत्यक्ष भेटीत.

कळावे लोभ असावा ही विनंती,
तुझाच

-_-
...................
(समाप्त)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users