मला ना कधी कधी....

Submitted by बागेश्री on 11 January, 2013 - 05:01

मनाला जाच नको
ओठांना काच नको,
सलणारं सारं काही सांगावं वाटतं..
मला ना कधी कधी मोकळं व्हावं वाटतं..

कसले मळभ अन् दाटलेले मेघ
जगण्याची समजेना असली मेख,
नात्यालाच घट्ट मिठीत घ्यावं वाटतं..
मला ना कधी कधी पार रितं व्हावं वाटतं..

निष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश
सोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश
खुल्या आसमानी मग निडर वावरावं वाटतं..
मला ना कधी कधी जगून घ्यावं वाटतं..

गोंजारणार्‍या हातावर होत्या सुरकुत्या लाख
गोंजारून घेतलेल्या हाती उरली केवळ राख,
नसलेल्या त्या माणसाच्या कुशीत शिरावं वाटतं..
मला ना कधी कधी अशक्य साधावं वाटतं..

मावळतीचाच सूर्य हा... टिकेल कायम कसा
येणार्‍याने जाण्याचाच घेतला आहे वसा,
सोबतीच्या हातांनी सुटुच नये वाटतं...
मला ना कधी कधी शहाणपण सोडावं वाटतं...

-बॉगवरही प्रकाशित http://venusahitya.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक कडव्याची तिसरी ओळ .. वरच्या दोन्हींना परीपुर्ण अर्थ देते
आणि शेवटची यथायोग्य समारोप...

सुंदर आशय.. शब्दकळा... मस्त!

निष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश
सोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश.... वाह!

मस्त.

Happy

ए कसली मस्त.
>> गोंजारणार्‍या हातावर होत्या सुरकुत्या लाख
गोंजारून घेतलेल्या हाती उरली केवळ राख,
नसलेल्या त्या माणसाच्या कुशीत शिरावं वाटतं..
Sad

खूप सुंदर कविता बागेश्री, आयुष्य अन कविता अगदी पारदर्शक असावीसे वाटणे अन तेही पुनः कवितेतूनच. सगळे सल निचरून टाकणारे शब्द.

धन्यवाद दोस्तहो..

शैलेश,
पतंग उडवताना मांज्यामुळे बोटांना पडातात त्या काचा... तीक्ष्ण गोष्टींमुळे होणारी/ झालेली इजा.. थोडक्यात असं की- व्यक्त होताना कुठलेही बंधनं/ त्रास नसावेत ही इच्छा..

पैलवानजी,
हीला काकाक समजलात तरी हरकत नाही, तो विभाग सापडला नाही म्हणून इथे पोस्ट केली मी, आभारी आहे.

निष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश
सोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश
>>> अप्रतिम!!! Happy

निष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश
>> फार फार आवडल्या या ओळी... Happy

म स्त Happy

सहजतेने भाव उतरलेत ...... छान.

"सोबतीच्या हातांनी सुटुच नये वाटतं...
मला ना कधी कधी शहाणपण सोडावं वाटतं..." >>> हे विशेष उल्लेखनीय वाटलं. .... मस्तच.