जगून घे जरा....

Submitted by बदीऊज्जमा बिराज... on 8 January, 2013 - 08:41

गझल

जगून घे जरा जरा!
फुलून घे जरा जरा!!

समोर आरसा तुझ्या...
नटून घे जरा जरा!

अजून दु:ख यायचे;
हसून घे जरा जरा!

वळीव हा उन्हातला...
भिजून घे जरा जरा!

सुमार हा दुपारचा!
पडून घे जरा जरा!!

नशा जरी पिण्यामधे;
जपून घे जरा जरा!

रुसून नीज जायची;
निजून घे जरा जरा!

बदल स्वत:मधे प्रथम;
करून घे जरा जरा!

न शब्द आठवायचे....
लिहून घे जरा जरा!

ढळू नयेत आसवे!
पुसून घे जरा जरा!!

चिता विझेल तोवरी....
जळून घे जरा जरा!

जिणे शिकायचे तुला;
मरून घे जरा जरा!

बुडायचेच शेवटी!
तरून घे जरा जरा!!

अखेर जिंकणार तू!
हरून घे जरा जरा!!

तिच्या दिठीतली सुधा;
भरून घे जरा जरा!

न फार बोलणार ती....
कळून घे जरा जरा!

करायचेच स्नान ना?
मळून घे जरा जरा!

पुन्हा न लाड व्हायचे....
छळून घे जरा जरा!

सराव चालला तुझा....
चुकून घे जरा जरा!

फकीर साबिरास तू;
स्मरून घे जरा जरा!

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)
sabirsolapuri@gmail.com
MOB: ९८९०१७१७०३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढळू नयेत आसवे!
पुसून घे जरा जरा!!
>>

एक शंका आहे इथे. आसवे 'ढाळणे' आणि पदर 'ढळणे' असतं ना? की इथे आसवे 'पदर ढळणे' या अर्थानेच अभिप्रेत आहेत?