देवाची बायको हरवली !

Submitted by दिनेश. on 2 January, 2013 - 03:29

बायबलची सुरवात बहुदा अशा अर्थाच्या वाक्याने होते, आणि देव म्हणाला प्रकाश असो, आणि प्रकाश पडला.
मुसलमान लोकांची रोजची प्रार्थना, ला ईलाह ईल्लिलाह, ने सुरु होते. याचा अर्थच अल्लाशिवाय कुणीच नाही, ( नन टू बी वर्शिप्ड ) ज्यू धर्मदेखील असा एकच देव मानतो.

हा एकेश्वरवाद त्यांच्या अभिमानाचा / अस्मितेचा विषय आहे. आणि त्यावरुनच ते इतर धर्मियांची हेटाळणी
करत असतात. पण हा एकेश्वर वाद अगदी मूळापासून त्यांच्याकडे होता का ? या प्रश्नाचा शोध, बीबीसीच्या

BBC. Bibles Buried Secrets 2. Did God Have a Wife?

http://www.youtube.com/watch?v=jYD0LzmilE8

या माहितीपटात घेतलेला आहे. तो बघायचे निमित्त झाले आणि काही विचार मनात आले. यातले काही
विचार या माहितीपटातले तर काही माझे.

निर्मिती, खास करुन प्रजानिर्मिती हि एकाच व्यक्तीला कशी शक्य आहे ? अमिबा/ गांडूळ सारखे काही जीव सोडले तर त्यापेक्षा वेगळ्या ( वरच्या म्हणवत नाही ) पातळीवरच्या किंवा वेगळ्या तर्‍हेने विकसीत झालेल्या
जींवांच्या बाबतीत तर लैंगिक प्रजननच शक्य आहे. क्लोन, टिश्यू कल्चर, कलम वगैरे तंत्रे सध्या बाजूला ठेवू.
त्यामूळे देव झाला म्हणून काय झाले, त्याला नवनिर्मितीसाठी जोडीदार हवाच ना ?

मग एक मुद्दा पुढे येतो, कि देव हा देव असल्याने, लिंगनिरपेक्ष आहे. त्याला निर्मितीसाठी अशा जोडीदाराची
गरज नाही. अर्थातच ही नंतरची मखलाशी.

त्यामूळे मूळात अशी एक स्त्री होतीच. आणि ती स्त्री म्हणजे अशराह. आणि तिचेच नव्हे तर तिच्या प्रतिमेचेही
कसे दमन झाले, यावर हा माहितीपट काही भाष्य करतो.

अगदी पहिल्यांदा प्रजा निर्माण करण्यात नराचा काही सहभाग असतो, हेच मानवाला माहीत नव्हते. हि अदभूत क्षमता केवळ स्त्रीकडेच आहे असाच समज होता. त्याकाळात समूह हेच बळ असल्याने नवे जीव
निर्माण होणे अत्यावश्यक होते आणि अर्थातच अशी क्षमता असलेली स्त्री, पूजनीय होती.

तिच्या या निर्मितीत आणि नंतरच्या पालपोषणात हातभार लावणारे अवयव तर स्वतंत्रपणे प्रतीकाच्या
रुपात तर पूजले गेलेच पण स्त्री प्रतिमांमधेदेखील हे अवयव ठळकपणे दाखवले गेले.
पुढे भिन्न्वर्णांच्या संकरातून भिन्न्वर्णीय प्रजा निर्माण होतेय असे लक्षात आल्यावर प्रजानिर्मितीतला नराचा सहभाग कळला. आणि त्यानंतरच बहुदा हे प्रतिमेचे दमन झाले.

आपल्यापेक्षा आणखी कुणी, सर्वोच्चस्थानी असू नये असे त्या मानवनिर्मित प्रतिमेला, म्हणजेच देवाला
वाटल्याने, पद्धतशीरपणे बाकीचे संदर्भ मिटवण्यात आले. मुख्य पर्तिस्पर्धी तर अत्यंत ताज्य ठरला.
( त्याचाच पुढे सैतान झाला असेल का ? ) देव असला तरी सर्व तो एकट्याने कसे करेल, त्याला सहकारी,
मदतनीस लागणारच ना ? पण त्यांचा दर्जा कमी करण्यात आला आणि आता ते केवळ देवदूतांच्या रुपात
शिल्लक आहेत.

पण बायकोचे काय ? ती तर देवाच्या सर्वात निकटची. इतर देव आणि सहकारी यांच्यातला दुवा ती होती.
देवाच्या बरोबरीचे स्थान होते तिचे. तिच्या प्रतिमेचे पूजन होत होते. ( असे पुरावे थेट इस्राईल मधेच
सापडले आहेत.) पण ती प्रतिमा मागे पडली.

कदाचित प्रतिमेतील काही अवयवांचे ठळकपण, समाजाला अमान्य ठरले असेल आणि मग ती प्रतीकात्मक
रित्या, एका झाडाच्या रुपात दाखवली जाऊ लागली. आणि नंतर तेही मागे पडले.

सगळ्यात नवलाचे म्हणजे, अशराह या शब्दाला वेगळाच म्हणजे काठी असा अर्थ जोडण्यात आला.
आता काठीच ठरवली तर ती पुरता येते, मोडता येते आणि जाळताही येते.

असे करत करत सर्व प्रतिस्पर्धी नष्ट केल्यावर देव एकटाच सर्वोच्च स्थानी राहिला. देव = श्रेष्ठ आणि देव = पुरुष, अशी समीकरणे झाल्यावर, पुरुष = श्रेष्ठ असे समीकरण तयार होणे, अगदी नैसर्गिकच होते.

पण जननी / आईचे विस्मरण कसे होऊ शकेल ? मग ती उरली मेरीच्या रुपात. कधी ती बाळ येशूला जोजवताना दिसते तर कधी मरणासन्न येशूला मांडीवर घेऊन शोक करताना. पण तिच्या प्रतिमेला पण
किती बंधनात जखडून टाकले आहे बघा. ती कायम नखशिखांत कपड्यात असते. इतकेच नव्हे तर ती "व्हर्जिन" आहे असे मानले जाते. एकदा देवाचे मातृत्व दिल्यावर तिने व्हर्जिन असावे असा आग्रह का ?
तिचे देवत्व केवळ त्या एका गोष्टीने हिन दर्ज्याचे ठरते का ? आणि तिचे प्रतिक असलेले झाड, ते तर
ज्यू धर्मात आजही मान्य आहेच.

इतक्या पद्धतशीरपणे केलेले प्रतिमेचे दमन, पुरुषी ( मानवी, म्हणवत नाही ) मानसिकतेमधूनच आले असे
नाही वाटत ?

दुसर्‍या एका माहितीपटात मी असे बघितलेय, ( इब्लिस, साती वाचत असाल आणि चुकीचे असेल तर जरुर सांगा ) कि स्त्री आणि पुरुष असा काही भेद मूळात नसतोच. स्त्री शरीर हेच मूळ, तोच मूळ साचा. केवळ
एका बदलाने गर्भाचे लिंग ठरते. म्हणजे जर XX आणि XO असे ठळक फरक जर निसर्गात घडले नाहीत, तर
असा अपवादात्मक देह, स्त्रीचाच असेल. ( हा बीबीसीचाच माहितीपट सिक्रेटस ऑफ सेक्स या नावाने उपलब्ध आहे. अगदी लहान मुलांनी बघण्यासारखा नाही. पण अर्थातच दर्जेदार आहे.)

हाच विचार पुढे न्यायचा तर प्रत्येक पुरुष हा मूळात स्त्री असतो, पण केवळ काही बदलाने तो पुरुष म्हणून
जन्माला येतो. आणि याच कारणाने, कुठलेही कार्य नसलेले, स्तनाग्र त्याला असतात.

मग स्त्रीचा असा दुस्वास करणे कुठून आले ? मला हा संदर्भ टाळायचा होता पण राहवत नाही, श्रीकृष्णाला म्हणे स्तनाग्रे नव्हती, का तर तो केवळ एकमेव, पूर्ण पुरुष. मग असाही भक्तीभाव दिसला, कि देव म्हणजे पुर्ण पुरुष आणि सर्व भक्त म्हणजे ( पुरुष असले तरी ) स्त्रियाच. पण हा विचार तितकासा दृढ नाही.

सर्व देवं नमस्कारं, केशवं प्रति गच्छति किंवा देवोंके देव महादेव असल्या वाक्यातून कधी कधी आपल्याकडेही एकेश्वरवाद डोकावतोच. पण त्याचवेळी शक्तीपिठे / दूर्गापूजन असल्या गोष्टींनी दिलासाही
मिळतो.

पण तरीही सद्यस्थिती बघता आपणही त्याच दिशेने जात आहोत का, अशी शंका वाटते.

वरचे माहितीपट जरुर बघा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचला, पण ह्या विषयावर आधी काहीच वाचन नसल्याने माहितीच्या नावाने शंख आहे. Happy तस्मात इथले प्रतिसाद वाचणार!

सर्व देवं नमस्कारं, केशवंम प्रति गच्छति >>> 'केशवं' करणे! एक्स्ट्रा 'म' उगीच आलाय!

'केशवं' करणे! एक्स्ट्रा 'म' उगीच आलाय!>> निंबुडा, तु मागच्या जन्मात मास्तरीन होतीस हे पक्क झालं!
दिनेशदा,
सध्या कुराण वाचतोय.
वाचून झाल्यावर काही लिहण्यासारखी असलेच तर नक्की लिहेण. आत्तातरी माझ्याकडे यावर लिहण्यासारखे फारसे काही नाही.

आभार निंबुडा, सुधारलं आता. ( आणखीही असणार Happy )

तो सिक्रेट्स ऑफ सेक्स आता यू ट्यूबवर सापडत नाही आहे, बहुतेक काढून टाकला असणार.

एम, त्या माहितीपटात कुराणाचेही संदर्भ आहेत.

दिनेशदा,

बीबीसीवरील कार्यक्रम पहिला. माझी निरीक्षणे देतोय. प्रत्येक सूत्राच्या सुरुवातीस कार्यक्रमातील मिनिटसेकंदांचा (mmss) संदर्भ दिला आहे.

१. ११५० : एक स्त्री आणि दोन छोटी मुले दाखवलीयेत ते सीता आणि लवकुशही असू शकतात.

२. १२४६ : बाह हा बीजदायी (fertile) पावसाचा देव दाखवला आहे. वह् या धातूपासून हा शब्द आलेला वाटतो. एरवी इंद्र असाच देव आहे.

३. १४०० : एल हा देव पुढे मुस्लिमांतही आलेला दिसतो. El-lah (उच्चार : अल्-लाह) यांतील El म्हणजे सर्वकाही (अलम् या अर्थी) आणि लाह हा शब्द प्रेम दर्शवतो. साहजिकच अल्लाह म्हणजे सर्वप्रेम असे मानायला हरकत नसावी.

४. १८२० : El is the god that liberates and brings his followers to the promised land. हे वाक्य परस्परविरोधी आहे. निदान भारतीय संदर्भात तरी. जर एकदा liberation झालं म्हणजे मुक्ती मिळाली की promised land वर जायची गरजच उरणार नाही.

५. १९२७ : Israel = isra + el असं समीकरण मांडलं आहे. इथे el हा शब्द देव म्हणून आला असेल तर isra हा शब्द asherah दर्शवतो. किंवा इस्रायल हे ईश्वरालय असेही असू शकते. तर मग el म्हणजे आलय (=घर) या अर्थी घ्यायला लागेल.

६. १७२४ : Bet El मधले Bet हे विद् या धातुवरून असलेले दिसते. म्हणून Bet El म्हणजे विद्यालय.

७. २५३० : yahweh हा दैवी परिषदेचा (किंवा देवगणांचा) प्रमुख म्हणून सांगितला आहे. ही समजूत हिंदु धर्मीयांशी जुळते.

८. २६१० : इस्रायेल आणि कन्नी लोक एकच धर्म पाळीत असं विधान आलं आहे. हे खरं धरलं तर मग ओल्ड टेस्टामेंटला राजकीय रंग चढल्यासारखा वाटतो.

९. २७३० : बायबलमध्ये गुपित दडवल्याचं विधान आलंय. हे विधान जरा चमत्कारिक वाटतं. गुपित (secret) असेल तर ते बायबलात कोण कशाला लिहील?

१०. ३५१५ : इथे आशेराहचे प्रतीक उलगडून दाखवले आहे. मात्र त्यात तिच्या मोठ्या डोळ्यांविषयी काहीच टिप्पणी नाही. केवळ वक्ष आणि योनी यांचा प्रतीकात्मक अर्थ दिला आहे. माझ्या मते मोठे डोळे याचा अर्थ सर्वसाक्षित्व असावा.

११. ४४४४ : 'yahweh + asherah' याचा पुरावा दडवला आहे असं विधान आलंय. हा नेहमीचाच प्रकार आहे. व्हॅटिकन यासाठी बदनाम आहे.

१२. ४९४५ : इथे दाखवलेल्या क्रूसाच्या उजव्या बाहूवर (म्हणजे आपल्या डाव्या बाजूस) 3U असं चिह्न आहे. ते ॐ सारखे दिसते.

असो.

मला जे जाणवलं ते लिहिलं आहे. मी या विषयातील तत्ज्ञ नाही.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै. हि सगळी समीकरणे सोडवायला बरेच पुरावे मिळवायला हवेत. तूम्ही लिहिले आहेत तसे संदर्भ असतीलही. आपलीही मूळे तिथे सापडतील.
पण मला त्यातल्या त्यात समाधान कि आपल्याकडे असे स्त्री प्रतिमांचे जाणीवपूर्वक दमन झाले नाही. आणि तसे होऊही नये.

दिनेशदा,

>> पण मला त्यातल्या त्यात समाधान कि आपल्याकडे असे स्त्री प्रतिमांचे जाणीवपूर्वक दमन झाले नाही.
>> आणि तसे होऊही नये.

अगदी बरोबर! Happy भारतीय परंपरेत अनुभूती सर्वोच्च आहे. मत (ओपिनियन) तितकेसे महत्त्वाचे नाही. त्यामुळे एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद या मांडणीला अर्थ नाही. त्याचप्रमाणे मूर्तिपूजक आणि मूर्तीपूजा न करणारे हे विभाजनही भारतीय परंपरेनुसार पूर्णपणे निरर्थक आहे.

आ.न.,
-गा.पै.

निंबुडा >>> सर्व देवं नमस्कारं, केशवंम प्रति गच्छति >>> 'केशवं' करणे! एक्स्ट्रा 'म' उगीच आलाय!
" एक्स्ट्रा 'म' आलाय! " किंवा " 'म' उगीच आलाय! " असे हवे का ?

पण मला त्यातल्या त्यात समाधान कि आपल्याकडे असे स्त्री प्रतिमांचे जाणीवपूर्वक दमन झाले नाही.>>> दिनेशदा,
भारतातिल अत्यंत प्रतिभावान समाज/घटक शिक्षणापासून हजरो वर्षे वंचित होता. तो समाज म्हणजे स्त्री समाज/घटक. या स्त्री समाजाला साक्षर बनविणा-या बाईची आत्ता कालच जयंती झाली. एकाही स्त्रीने इथे माबोवर दोन अक्षरं सुद्धा(कृतज्ञतेची) लिहली नाही. याला मी दमन असेच मानतो. तुम्ही काय मानता?

@एम. मायबोली म्हणजे समाज नाही हो.
मी त्यांच्याबद्दल कॅलेंडरमधे बघितले. निदान तेवढीतरी जाण आहे आपल्याला.
दिल्लीमधल्या घटनेवर चीनमधे पण चर्चा झाली ( आता बंदी घातलीय ) आधीचा सूर असा होता कि बघा, लोकशाही असलेल्या भारतात असे होतेय, त्यावर भारतीयांनी उत्तर दिले, निदान आमच्याकडे याविरुद्ध निदर्शने होतात, तूमच्याकडे ते शक्य नाही.

मी त्यांच्याबद्दल कॅलेंडरमधे बघितले. निदान तेवढीतरी जाण आहे आपल्याला.>>> याचा अर्थ काय?
(तुम्ही माझ्या जाणिवे बद्दल बोलताय कि तुमच्या? दोघांच्याही बद्दल बोललात तरी ज्याना जाणिव हवी होती त्याना नाही त्याचे काय? ) थोडक्यात काय तर हा सुद्धा दमनाचा एक प्रकार आहे. एवढेच!

दिल्लीमधल्या घटनेवर चीनमधे पण चर्चा झाली >>> दिलीत जे घडले त्या पेक्षा क्रुरकृत्ये आपल्या महाराष्ट्रात सुद्धा घडले. थोडं मागे जाऊन बघा, आठवेल. तेंव्हा हे कँडलवाले कुठे गेले होते? यावर माझी बायको गंमतीने म्हणते 'तेंव्हा हे सगळे लहान होते हो!' असो.

नाही एम, तूम्ही मायबोलीवर जाण ठेवली नाही असे म्हणालात, त्याबद्दल म्हणालो, कि मायबोली म्हणजे समाज नाही.
घट्ना दुर्दैवीच होती, न्यायाची प्रक्रिया झाली ( त्यानंतर शिक्षा झाली, माफिही मिळाली .. ) या सगळ्यातून पुढे काय होतेय ते बघू या. गुन्हेगारांना शिक्षा मिळूनही, ज्यांनी भोगले त्यांच्या जखमा भरणार नाहीतच. पण निदान
असे गुन्हे पुढे घडणार नाहीत, यासाठी एक समाज म्हणून आपण काय करणार आहोत, ते महत्वाचे. मी तरी
आशा ठेवतोय.

गामा पैलवान या माहितीबद्दल धन्यवाद

येशु क्रुसावर चढल्यानंतर जिवंत राहिला आणि गुप्तपणे काश्मीरमधे येऊन राहिला. तिथला त्याचा एक केस हजरतबाल या ठिकाणी आहे असं वाचलं आहे. मग त्यानेच पैगंबर या नावान्ने इस्लाम ची स्थापना केली हे खरं आहे का ?

दिनेशदा, डा विंची कोड वाचा.. येशूला त्याची परंपरा मेरी मॅग्डालीनने ( म्हणजे त्याची कंप्यानियन म्हणजे बायकोने) चालवावी अशी इच्छा होती. पण नंतर इतर शिष्यानी आणि पुढे त्यांच्या धार्मिक परंपरेने जाणीवपूर्वक मेरी आणि स्त्रीजात यानाच त्याज्य ठरवले. डा विंची कोडमध्ये याबाबत अगदी सखोल लिहिले आहे. तुमच्या शंकाना त्यात सप्रमाण उत्तरे मिळतील.

देवाची बायको हरवली, हा विचार मात्र अगदीच विनोदी आहे.

उत्क्रांतीच्या काळात फार नंतरच्या टप्प्यावर स्त्री पुरुष्ह हे भेद निर्माण झाले. त्याआधी एकच प्राणी जन्म देऊ शकत होता, आजही असे सजीव आहेतच. किंबहुना त्यांचीच संख्या आजही जास्त असावी.

त्यामुळे देवालाही देवी असावीच, ही कल्पना हास्यास्पद आहे.. असंच म्हटलं, तर सरकवायची कडीची दांडी म्हणजे पुरुष्ह आणि ती ज्या गोलाकार भागात शिरते ती स्त्री! अशीही प्रतिके शोधली जातील... पण नुसतीच खिट्टी असेल, तर त्याला स्त्री पुरुष कसे विभाजीत करणार? Proud

इस्लाम, ख्रिश्चन यानी एकेश्वर मानलेला आहे... बायबलमध्ये तर स्पष्ट आहे....

जमीनीवर रहाणारा, पाण्यातील किंवा आकाशात उडणारा .. अशा कोणत्याही रुपाच्या प्राण्याच्या स्वरुपात मी तुला कधीही भजणार नाही.

इस्लामनेही हीच कल्पना पुढे नेली. मग त्यांच्या देवाला देवी का असावी?

त्यांचा देव हा ' प्राणी' नाही, त्यामुळे त्याला मादी/ नर/ स्त्री/ पुरुष असे काही शोधायची गरजच नाही. नंतरच्या त्या धर्मातील ( आणि हिंदु देखील) मंडळीनी स्त्रीचे खच्चीकरण केले, हे जरी खरे असले, तरी त्यांच्यात देवी नाही, म्हणजे त्यानी स्त्रीवर फार अन्याय केलाय किंवा हिंदुच्यात देवी असते, म्हणून हिंदु धर्म नारीला फार मानतो, अशी तुलना करणे अयोग्य आहे. त्यांचा देव हा प्राणीरूप मूर्ती नाही, म्हणून त्याला पार्टनर नाही, इतकेच. हिंदुंनी देवाला मनुष्य प्रतिमा दिल्याने पुरुष्ह आणि स्त्री या प्रतिमा निर्माण करणे, त्याना गरजेचे ठरले. त्यामुळे त्यान्नी त्या केल्या.

एक कुत्रा दुसर्‍या कुत्र्याला सांगतो असतो... देव हा एक प्रचंड मोठा कुत्रा आहे आणि त्याला हाडकाचा नैविद्य आवडतो.

शेजारुन एक मांजर चाललेले असते, ते दुसर्‍या मांजराला म्हणते.. किती मूर्ख प्राणी आहेत. देव हा एक मोठा बोका आहे आणि त्याला साय आवडते, हेही या मूर्खाना माहीत नाही. Proud

आंबा३,

आपल्या वरील प्रतिसादावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण लघुपट पहिला नाही. चर्चा लघुपटाच्या संदर्भात करायची आहे. तुमचं हे विधान

>> जमीनीवर रहाणारा, पाण्यातील किंवा आकाशात उडणारा .. अशा कोणत्याही रुपाच्या प्राण्याच्या स्वरुपात
>> मी तुला कधीही भजणार नाही.

आज कितीही खरं असलं तरी पूर्वीचे लोक त्यानुसार वागत नसत. हा त्या लघुपटाचा सारांश आहे.

तेव्हा विषयाला धरून लिहावे ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

आण्णा,

ख्रिस्ती आणि इस्लाम येण्यापूर्वी त्या भागातील लोक भारतातील लोकांप्रमाणेच स्त्री आणि पुरुष्ह प्रतिमा असलेल्या देवांची पूजा करत होते.

पण आज ही परिस्थिती राहिलेली नाही.. जुन्या मानवी देवता सोडून देऊन नवा एकेश्वरवाद मांडला की नवा देव पुरुष्ह आहे की स्त्री , आणि त्यांना नवरा किंवा बायको आहे का, ही चर्चाच निरर्थक ठरते.

त्यामुळे मी मांडलेले मुद्दे चर्चेच्या संदर्भातच आहेत, काळजी नसावी, इतर सूचना करायला अ‍ॅडमिन आणि परमेश्वर समर्थ आहेतच. आपण विश्वाची चिंता करु नये.

दिनेशदा, माझे मत, माझ्या अल्प अभ्यासावर व बर्‍याचशा आस्थेवर आधारित-

लघुपटात दाखवल्याप्रमाणे देवी प्रतिमेचे व देवीच्या प्रस्थाचे ख्रिश्चॅनिटी अन ज्युडाइझम मध्ये दमन झाले असेलही, इस्लाममध्ये तर कुराणात मोहम्मदांनी एकूण एक मूर्तीपूजकांचा (देव-देवी दोन्हींच्या मूर्तींचे पूजक ) अन अनेकेश्वरवादाचा कडाडून सशस्त्र विरोध केलाच आहे ..
पण देवाची बायको अन तिचे महत्व कमी करणे हे दोन्ही प्रकार आपल्याकडे झालेले नाहीत.
विविध देवांच्या अर्धांगी आहेत, त्यांची स्वतःची समृद्ध व्यक्तीमत्वे, कथानके-उपकथानके,भक्तगण आहेत,पूजापरंपरा आहेत,वेळी त्यांनी आपापल्या नवर्‍यांना यथार्थ विरोध,मार्गदर्शन केलेय,विनोद अन क्रीडाही केलीय,,आपले आग्रह समारंभपूर्वक धरलेत्/सोडलेत वगैरे वगैरे, त्या त्या देवांच्या पुरुष व्यक्तित्वांना मृदू पूर्णता देणार्‍या या शक्ती आहेत, शिवाची अर्धांगी तर शरीराने त्याच्याशी जुळली गेल्याचे अर्धनारीनटेश्वराच्या प्रतीकात येते.

एकेश्वरवाद समावेशक अनाग्रही अशा स्वरूपात आपल्याकडे आहे, जसे की ' सर्व धर्मान परित्यज्य माम एकं शरणं व्रज' हे गीतेतले विधान किंवा 'एकं सत विप्रा बहुधा वदंति'' अशा विधानातून हा परमेश्वर आपण मूलतः एकच आहोत असे म्हणताना लघुदैवतांच्या अस्तित्वाला व पूजनाला विरोध करत नाही, पण अशा पूजाअर्चांची मर्यादा अंतिम सत्याच्या परिप्रेक्षात स्पष्ट करतो..

आंबा३,

>> पण आज ही परिस्थिती राहिलेली नाही.. जुन्या मानवी देवता सोडून देऊन नवा एकेश्वरवाद मांडला की नवा
>> देव पुरुष्ह आहे की स्त्री , आणि त्यांना नवरा किंवा बायको आहे का, ही चर्चाच निरर्थक ठरते.

नेमकी हीच 'न राहिलेली' परिस्थिती हळूहळू बदलून पूर्वपदावर येत आहे. जागे व्हा!

नूतनदिनाभिनंदन!

आ.न.,
-गा.पै.

भारतीताई,

अगदी मनातलं बोललात! Happy

अगदी मोहिनीसुद्धा पूर्ण नारी नाही. विष्णूने स्त्रीरूप घेतल्याने त्यास चक्राचे आवाहन करता येईना. म्हणून त्याने गुप्तपणे अर्धपुरूष रूप धारण केले. (म्हणजे नक्की काय केले ते माहीत नाही.) त्यामुळे सुदर्शनचक्रास आवाहन करून राहू-केतूंचा शिरच्छेद करता आला. परंतु दुर्गादेवीने मात्र स्त्री असूनही चक्र धारण केले आहे. बहुधा तिला यथार्थ शक्ती प्राप्त झालेली असावी.

सांगण्याचा मुद्दा काय की हिंदू पुराणांत स्त्री आणि पुरूष देव एकाच सत्याची दोन रूपे म्हणून सादर केली आहेत.

आ.न.,
-गा.पै.

भारती मस्त प्रतिसाद!
दिनेशदा, लेख आवडला. इतके दिवस शीर्षक वाचून उघडलाच नव्हता. सॉरी.
फिल्म मी अर्धवट पाहिलीय परंतू वरिल विवेचन डा विंची कोडात आणि त्या अनुषंगाने केलेल्या वाचनात केलेय.
प्रत्येक गर्भ मॉर्फॉलॉजिकली सुरूवातीस स्त्रीच असतो हे अगदी खरे आहे
ख्रिश्चन आणि तत्सम ग्रंथाधारित धर्मात स्त्रीशक्तीचे जाणीवपूर्वक दमन केले आहे हे खरे आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात मात्र स्त्री शक्तीची यथायोग्य दखल अय्यपा वैगेरे सोडल्यास सगळ्याच पंथात घेतली आहे. इतकेच नव्हे तर पूर्ण शक्तीरूपालाच वाहिलेले अनेक पंथ आहेत.
एकाच पंथातही स्त्रीशक्तीला जास्त महत्त्व देणारे असे काही उपपंथहि आहेत. उदा. कोंकणात महारांच्यात पाने महार आणि बेले महार असे उपपंथ होते असे मला आजोबांनी सांगितले होते. पाने पार्वतीचे बेले शंकराचे उपासक.
बहुतांश हिंदु कुटुम्बात कुलदैवत सोडून इतर स्त्रीप्रतिकाचेही अधिष्ठान असते ,कधी बोडण, कधी जागरण या स्वरूपात,ते जोपासले जाते.
केवळ आणि केवळ स्त्री प्रतिकांची पूजा करण्यासाठी खास नवरात्र, लक्ष्मीपूजन असे सण आहेतच.
थोडक्यात भारताने आणि प्रचलित हिंदू म्हटल्या जाणार्या धर्माने स्त्रीप्रतिकांचे, दैवतांचे कधी पूर्ण दमन केले नाही.

प्रत्येक गर्भ मॉर्फॉलॉजिकली सुरूवातीस स्त्रीच असतो हे अगदी खरे आहे

डॉ. सातीताई ( एम डी) ,

माणसामध्ये XX- XY असा पॅटर्न असतो. XX -स्त्री, XY पुरुष .. या पॅटर्नमध्ये जीव प्रथम स्त्री असतो. जो पुरुष असतो, त्याचे पुरुष अवयव नंतर कार्य सुरु करतात व तो पुरुष्ह होतो, हे खरे आहे. तुमचे मत इथवर खरे आहे.

पण काही प्राण्यांमध्ये उलट पॅटर्नही असतो. म्हणजे त्यांच्यात पुरुष झेड झेड असतात. जीव तयार होताना पुरुषच असतो. मग तो जर स्त्री असेल तर त्याचा डब्ल्यु क्रोमोसोम कार्य सुरु करतो व तो स्त्री बनतो असे त्यांच्यात होत असेल ना? ( याला ZZ - ZW म्हणतात. ZZ म्हणजे पुरुष , ZW म्हणजे स्त्री) ..

नेमकी हीच 'न राहिलेली' परिस्थिती हळूहळू बदलून पूर्वपदावर येत आहे. जागे व्हा!

आम्ही झोपतो, तुम्ही जागे रहा म्हणजे झालं.

असंही असेल आम्बा ३. मला वाटलं मानवाविषयी बोलणं चाललंय म्हणून मी स्त्री म्हटलं. इतर प्राण्यांविषयी स्त्री लिंगी किंवा मादी म्हटलं असतं. त्यात मी पडले फक्त माणसांची डॉक्टर त्यामुळे जनावरांच्या डॉक्टरला असणारी किंवा प्राणिशास्त्रज्ञाला असणारी किंवा तुमच्यासारख्या सर्वज्ञाला असणारी माहिती मला नाही. Wink
माहितीबद्दल धन्यवाद.

प्रत्येक गर्भ मॉर्फॉलॉजिकली सुरूवातीस स्त्रीच असतो हे अगदी खरे आहे>>>>>> साती |
माणसामध्ये XX- XY असा पॅटर्न असतो. XX -स्त्री, XY पुरुष .. या पॅटर्नमध्ये जीव प्रथम स्त्री असतो. जो पुरुष असतो, त्याचे पुरुष अवयव नंतर कार्य सुरु करतात व तो पुरुष्ह होतो, हे खरे आहे. तुमचे मत इथवर खरे आहे.>>>>>>> आंबा३ |

आम्ही तर इतके दिवस सुरुवातीला बीजांड फलनाच्या वेळीच वेळीच लिंग ठरलेले असते असे समजत होतो. तर मग मनुष्यायोनीच्या बाबतीत लिंगनिर्धारिकरणाची प्रक्रिया नक्की कोणत्या महिन्यात चालू होते. या गोष्टीवर माझी अन्य एक शंका अवलंबून आहे म्हणून विचारले.

Sex is determined at the moment of fertilization. But organs develop later on.

Pages