जरा अपॉइंटमेंट हवी होती...

Submitted by मुग्धमानसी on 2 January, 2013 - 02:52

जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?
मनातली चीड सांगायची होती... जरा लक्ष देशील का?

तुझ्याशी भरपूर भांडायचं आहे... डोळ्यात पाणी आणायचं आहे
माझ्या असण्याचा तुझ्या लेखी अर्थ काय?... विचारायचं आहे
हिशोब काही मांडायचेत, जुनेच पाढे गिरवायचेत...
आवाज चढवून थरथर कापत प्रश्न काही सोडवायचेत...
माझ्या डोळ्यांत डोळे मिसळून निखार माझा सोसशील का?
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?

विचारायचेत खुप खुप जाब, कसलीच भीड ना कुणाची आब
नात्याच्या या पारतंत्र्यात, आज होऊदे इंकलाब!
घुसमट झाली पुरे आणि पुरे झाला अ-संवाद...
याच भिंतींच्या साक्षीनं आता उकरुन काढू सगळेच वाद!
तुही माझ्यावर एकदातरी असा हक्कानं चिडशील का?
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?

खांदे माझे घट्ट धरुन गदागदा हलव नं एकदा..
तुलाही पर्वा आहे... मलाही जाणवू दे नं एकदा
हात धरुन बसव शेजारी.. म्हण मला की बोल धडधड..
गुदमरणारा हा अबोला सांग तुलाही झालाय ना जड?
का वागते मी अशी तुटक? जाब मला विचारशील का?
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?

नात्याची ही दोर भलतीच चिवट म्हणून टिकली आहे
अजून ताणू नकोस राजा... वेळ कुणाला चुकली आहे?
माझ्या डोळ्यात पाणी कधी तुझ्या डोळ्यात पाणी असतं
तुझ्या नजरेत प्रश्न असतात... ओठी मात्र काहिच नसतं
भांडणाच्या शेवटी एकदा दोघे मिळून रडुयात का?
आपल्या आतल्या ’अहं’शी आपण दोघे मिळून लढुयात का?
’मला गरज आहे तुझी’- एकदाच फक्त म्हणशील का?
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भांडणाच्या शेवटी एकदा दोघे मिळून रडुयात का?
आपल्या आतल्या ’अहं’शी आपण दोघे मिळून लढुयात का?
>>>>>>>

सहिच आहे

आवडली

मस्त....

Happy

नात्याची ही दोर भलतीच चिवट म्हणून टिकली आहे
अजून ताणू नकोस राजा... वेळ कुणाला चुकली आहे?
माझ्या डोळ्यात पाणी कधी तुझ्या डोळ्यात पाणी असतं
तुझ्या नजरेत प्रश्न असतात... ओठी मात्र काहिच नसतं
भांडणाच्या शेवटी एकदा दोघे मिळून रडुयात का?
आपल्या आतल्या ’अहं’शी आपण दोघे मिळून लढुयात का?
’मला गरज आहे तुझी’- एकदाच फक्त म्हणशील का?
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का? >>>

हे कडवं अगदी कवितेचा कळस आहे. सुंदर !!