तू आज हाती हात दे....

Submitted by मुग्धमानसी on 31 December, 2012 - 06:40

काल रात्री चांदण्याने हासणे नाकारले,
आणि मीही समजले हे सूख नाही आपले!
मीही असते तुही असतो तरिही का नसते हमी,
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!

आज ओल्या पावलांना बोचती का पाकळ्या,
सूखभरल्या या मनाला टोचती का पोकळ्या?
मी अशी हसते तरी हसण्यात का नसतेच मी
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!

ठेवलेला त्या क्षणी मी जन्म अवघा तारण
मी अशी का वागले... काहीच नव्हते कारण!
अजुनही उरलीच मज मी उधळण्याची खुमखुमी
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!

ओंजळीमधल्या फटीतुन निसटले अस्तित्व माझे
ओंजळीभरल्या फुलांचे आणि उरले फक्त ओझे!
गंधला नाहीस तू अन् रंगले नाहीच मी
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!

तू आज हाती हात दे.. ही साथ मजला दान दे
मी इथे आहे अशी याचे जगाला भान दे...
हरवले गर्दीत तरीही वेगळी आहेच मी
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धमानसी जी,
काही ठिकाणी छंदात राहण्यासाठी केलेली र्‍हस्व-दीर्घाची ओढाताण थोडासा रसभंग करते आहे, असं वाटलं. तसेच काही ठिकाणी ती छंदात राहण्यासाठी देखील गरजेची नाही. "तू" हा शब्द - कवितेतही - नेहमी दीर्घच असावा. आणखीन काही बदल सुचवतो आहे, ते केलेत, तर कविता छंदबद्ध राहीलः

"काल रात्री चांदण्याने हासणे नाकारले,
आणि मीही समजले हे सौख्य नाही आपले!
मीहि असते तूहि असशी का तरी नसते हमी,
आज हाती हात दे, या साथिची सलते कमी!

आज ओल्या पावलांना बोचती का पाकळ्या,
सौख्य भरल्या या मनाला टोचती का पोकळ्या?
मी अशी हसते तरी हसण्यात का नसतेच मी
आज हाती हात दे, या साथिची सलते कमी!

ठेवलेला त्या क्षणी मी जन्म अवघा तारण
मी अशी का वागले... काहीच नव्हते कारण!
अजुनही उरलीच मज मी उधळण्याची खुमखुमी
आज हाती हात दे, या साथिची सलते कमी!

ओंजळीमधल्या फटीतुन निसटले अस्तित्व माझे
ओंजळीभरल्या फुलांचे आणि उरले फक्त ओझे!
गंधला नाहीस तू अन् रंगले नाहीच मी
आज हाती हात दे, या साथिची सलते कमी!

आज हाती हात दे.. ही साथ मजला दान दे
मी इथे आहे अशी याचे जगाला भान दे...
हरवले गर्दीत तरिही वेगळी आहेच मी
आज हाती हात दे, या साथिची सलते कमी!!!"

अनाहूत सूचनांबद्दल प्रथम क्षमस्व! पण ह्या/ अश्या बदलांमुळे आपल्या सुंदर कवितेचे सौंदर्य अधिकच खुलेल, असे वाटले, म्हणून हा प्रपंच. विचार करून पहा. ह्या अभिप्रायामुळे मी आपल्याला जराही दुखवले असेल, तर पुनःश्च माफी मागतो.

माफी मागण्याची मुळीच गरज नाही हिमांशुजी. तुम्ही एवढ्या अभ्यासपुर्वक ही कविता वाचलीत, त्यात योग्य ते बदल सुचवलेत त्याबद्दल खरेतर मीच तुमचे मनःपुर्वक आभार मानायला हवेत. खरोखर धन्यवाद!

ओंजळीमधल्या फटीतुन निसटले अस्तित्व माझे

व्वा.. व्वा..!

अप्रतिम ओळ. अशा काही शब्दरचनांमुळेच कविता खुलते.

तुमची कविता मुक्तछंदी असल्याने वृत्ताबाबत बोलणे टाळत आहे. मुक्तछंदात विचार महत्वाचा..!

धन्यवाद जोशीजी! मला वृत्त वगैरे तांत्रिक गोष्टी फारशा काही कळत नाहीत. मनात जे आणि जसं येतं ते मी उतरवत जाते. मुद्दाम काही करत नाही. त्यामुळे माझ्या कविता आपोआपच 'मुक्तछंद' होत असाव्यात.

ओंजळीमधल्या फटीतुन निसटले अस्तित्व माझे

ओंजळीभरल्या फुलांचे आणि उरले फक्त ओझे!

मी अशी का वागले... काहीच नव्हते कारण!

अजुनही उरलीच मज मी उधळण्याची खुमखुमी

या सुट्या ओळी आवडल्या...

शुभेच्छा!