"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जे जीवनमान/ रहाणीमान स्वतः स्विकारलयं.. त्याच्याबद्दल कोणी आपल्याला "पदक" का बरं द्यावं?

>> कदाचित त्यांना "पदक" वगैरे नकोय.. त्या फक्त जाणीव असण्याविषयी बोलताहेत. तेही "नवरा" या व्यक्तीला.

माझं वैयक्तिक मत:

१. "दुसऱ्याला" आपल्या कामांची किंमत वाटली नाही (आणि त्याला तुमच्या कामांची किंमत वाटणे/ जाणीव असणे तुमच्यासाठी इतकेच महत्वाचे असेल) तर ते काम करणे थांबवा. त्या माणसाचे (पक्षी नवऱ्याचे) जिथे जिथे अडेल तिथे त्याला तुमच्या कामांची, तुम्ही त्यांच्याही नकळत त्यांच्यासाठी करत असलेल्या लहान लहान गोष्टींची जाणीव होईल. (उदा:अंघोळीला जाताना टॉवेल....).

२. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण, शक्यतोवर गृहिणी असतांनासुद्धा स्वत:च्या सवयी, स्वत:च्या आवडीनिवडी यांना एका मर्यादेबाहेर मुरड घालू नका. तो खरोखरच मोठा त्याग असतो ज्याची इतरांना जाणीव असेलच/ होईलच असे नाही. काही वेळा समोरचा माणूस कृतघ्न/ तुमच्या कष्टांना मुद्दाम नजरेआड करणारा नसतो. पण तुम्ही त्यांच्या नकळत ज्या छोट्या छोट्या गोष्टी कराल त्या त्यांच्या लक्षातच येत नाहीत.

उदा. तुम्हाला भेंडीची भाजी अतिप्रचंड आवडते. पण सासरी कोणालाच आवडत नाही म्हणून तुम्ही लग्न झाल्यावर भेंडीची भाजी खाणेच सोडले तर कदाचित कोणाच्या लक्षातही येणार नाही की तुम्हाला हि भाजी आवडत असेल. असे समजले जाइल कि तुम्हालाही सर्वांप्रमाणे हि भाजी आवडत नाही. अश्या वेळी तुम्ही काय कराल?? कुढत बसणार का कि माझ्या त्यागाची कुणालाच जाणीव नाही?

मग तुम्हाला सारखे हे फिलिंग येत राहील कि मी एवढी स्वत:चा आनंद, इच्छा आकांशा बाजूला ठेऊन यांच्यासाठी (नवरा, सासूसासरे, मुले इ.) राब राब राबते, तरी यांना त्याची जाणीव नाही/ किंमत नाही आणि तुम्ही तुमचा आनंद गमावून बसाल.

अश्या वेळी-

अ. तुमच्या तडजोडीची त्यांना जाणीव करून द्या. किंवा
ब. तडजोड करणे बंद करा आणि मस्तपैकी भेंडीच्या भाजीचा आस्वाद घ्या..

३. जर तुमच्या घरच्यांना (मुख्यत्वे नवऱ्याला) तुमचे कौतुक करायची सवय असेल/ मनापासून इच्छा असेल तर तो तुमच्या लिखाणाची सुद्धा करेल. त्यासाठी स्वत:कडे दुय्य्मता घेण्याची/ मनाविरुद्ध तडजोडी करायची/ पडते घ्यायची/ संसारासाठी भोगायची गरज नाही.

(त्याची तुम्हाला किंमत/ श्रेय द्यायची इच्छाच नसेल तर तुमचा "नित्यनवा झगडा"सुद्धा त्याच्यासाठी काहीच नाही.)

३. (हे मी कुठेतरी वाचलेले आहे) कोणतीही तडजोड/कोणतेही काम तुमची इच्छा नसतांना केवळ कोणीतरी आपल्याला चांगले म्हणेल म्हणून करू नका. त्यामुळे (वर नताशाने म्हटलंय तसं) आपण आपली/ आपल्या कष्टांची किंमत दुसऱ्याला करायची परवानगी देतो.

जाईजुई, चांगली पोस्ट आवडली.

दुसऱ्याला" आपल्या कामांची किंमत वाटली नाही (आणि त्याला तुमच्या कामांची किंमत वाटणे/ जाणीव असणे तुमच्यासाठी इतकेच महत्वाचे असेल) तर ते काम करणे थांबवा. त्या माणसाचे (पक्षी नवऱ्याचे) जिथे जिथे अडेल तिथे त्याला तुमच्या कामांची, तुम्ही त्यांच्याही नकळत त्यांच्यासाठी करत असलेल्या लहान लहान गोष्टींची जाणीव होईल.>>>> +१.

कुणा एका व्यक्तीचा आदर्श सगळ्या माबोकरांनी ठेवला आणि सगळे तसेच लिहू लागले तर ती आयडीबोली होईल , जसे की दादसारखे सगळ्यांनी लिहिले तर दादबोली. (सॉरी दाद, यात तुला त्रास द्यायचा हेतू नाही गं!)
बेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक वेगवेगळ्या प्रकारे लिहिणारच. त्याने तर मायबोलीवरचा जीवंतपणा वाढतो. हो फक्त अतिवैयक्तिक शेरे आणि असांसदीय शब्द नकोतच. >>> + १००

मनस्मि, मलाही खूप त्रास व्हायचा सुरुवातीला. गंमत म्हणजे त्यावर बोलताना मी ही दादचंच उदाहरण दिलं होतं आणि सातीने जे लिहिले आहे अगदी तेच मला समजावून सांगण्यात आले. आणि खरंच मला पटले की सगळेजणं समजुतीच्या सुरात लिहू लागले तर सगळी गंमतच निघून जाईल. जेवणात नुसतं गोड खाऊ शकू का आपण ? खारट, तिखट, तुरट, कडू, आंबट सगळ्याच चवी हव्या.
अर्थात हे माहीत असूनही माझ्याशी बोलताना जरा कुणाचा वेगळा सूर लागला तर एक क्षण वाईट वाटते, राग येतो. स्वाभाविक आहे तेही. पण जितक्या वेगवेगळ्या सुरांत प्रतिक्रिया येतील तितकी आपली अंतर्मुख होण्याची, विचार तपासून बघण्याची क्षमता वाढते हे आता अगदी पक्कं समजलं आहे Happy

विजोडचे निकष काय असतात? म्हणजे मला पडलेला हा मूलभूत प्रश्न आहे. हे निकष कोणी ठरविले?
स्वभाव, गुण, अवगुण, रूप, वर्ण, अंगयष्टी, सवयी, वर्तन यांमध्ये प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा भिन्नच असते ना? एका घरात जन्मलेले, त्याच आईवडीलांच्या पोटी जन्म घेतलेले बंधू-भगिनी तरी कुठे सारखे असतात? त्यांच्याबद्दल कधी कुणाला तक्रार नसतेच का? Happy स्वतःच्या आईवडीलांविषयी तक्रार नसते का? पोटच्या पोरांविषयी तक्रार नसते का? यांनाही मग विजोड ठरवावे का?

तक्रारी करणे हीदेखील एक कला आहे! जिथे जीवाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तिथे लटक्या तक्रारींना जागा नसावी बहुतेक!

आधी कोणी म्हणलेच आहे पण पुन्हा

लग्न टिकतात कारण दुसरा option नसतो. आणि भारता सारख्या समाजात दुसरा option शोधणे आणि तो मिळाला तरी आधिचे लग्न तोडुन बाहेर पडणे हे फार अवघड आहे, त्यामुळे आहे त्या लग्नात टिकुन रहावे लागते. कायदा सुद्धा लवकर divorse घेउन देत नाही आणि त्यात एका चा विरोध असला तर जवळजवळ अशक्य च.

दुसरे म्हणजे विजोड्पणा जाणवायला वेळ जायला लागतो ( मी एकदम extreme उदाहरणे सोडुन बोलतोय ), तो पर्यंत मुलांची जबाबदारी आलेली असते, आणि मग काहीच करणे शक्य होत नाही.

लेखकाला, कवीला "शब्दप्रभू" उगाच म्हणतात बाई.. कोणी काही कुठच्याही शब्दात का म्हणेना.. आपण त्यातून काय ऐकू येतय ते शोधायचं.., कुठचा सन्देश मिळतोय त्याने काही फरक पडत नाही...!

हम्म.. उच्च विचार.

योग्य पर्याय निवडा
१)सगळं विजोड असलं तरी छत्तीस गुण जुळलेले असतात, फक्त आणि फक्त त्यामुळेच संसार टिकतात.
२)विभक्त होण्याचा पर्याय परवडत नाही त्यामुळे संसार 'टिकतात'.

आमच्या शेजारी एक अतिशय हुशार मुलगी राहते. सहावीपर्यंत शिक्षणासाठी मेहनत घेणारी, खूप अभ्यास करणारी मुलगी त्याकडे दुर्लक्ष करू लागली. टाळाटाळ करू लागली. मुलीला त्याबाबत विचारणा झाली असता ती म्हणाली "माझ्याबरोबर शिकणारी दुसरी मुलगी काहीही न करता पास होते मग मी एवढा अभ्यास का करू?"

गोव्यात हजेरी ५०% झाली की विद्यार्थ्याला पुढच्या इयत्तेत ढकलतात, तेही अगदी आठवीपर्यंत. शिक्षण कसं असावं, कसं आहे हा स्वतंत्र लेखनाचा धागा होऊ शकेल. पण फुले, कर्वे आत्ता हयात असते तर त्यांना आता मिळत असलेले शिक्षण पाहून याचसाठी आपण हालापेष्टा का काढल्या असेच वाटले असते.

<महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच दे‌ईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो>

ह्या वाक्यावरून मला ह्या फुले, कर्वे यांच्याविषयी आदर नाही अथवा त्यांच्या कार्याचा आदर नाही असा कृपया घेऊ नये. फुले व कर्वे यांना अपेक्षित शिक्षण आज मिळतय हे मला पटत नाही. आज आपण फक्त सुशिक्षित होतोय सुसंस्कृत नाही. लेखात आलेला शिक्षणाचा संदर्भ हा नवरा बायको एकमेकांना शिक्षणावरून दुय्यम दर्जा देतात त्यावर होता. गृहीणी घेत असलेले कष्ट यांचा उल्लेख उदात्तीकरण किंवा त्याचा बाऊ करण्याकरीता नसून त्यांच्या आपल्या यजमानाविषयी आलेल्या प्रतिक्रिया ("बोंडेर" म्हणजे निर्बुध्द, "भाणशिरें" म्हणजे पायपुसणे) तशा का आल्या हे सांगताना आला आहे.

सौ. लिहिण्याविषयी

लग्न झाल्यानंतर सौ. असं माझ्या नावाआधी, सुरुवातीला मी लग्न झाल्यामुळे लावू लागले. आता आठ वर्षानंतर, हे माझ्या आयुष्यात आले हे खरच सौभाग्य आहे हे पटलं व त्या अर्थाने लावते. "सौ." ह्या शब्दाला अनुभवाची जोड मिळाली तेंव्हा माझं सौभाग्यवती असणं अर्थपूर्ण झालं. आमच्यातल्या गुणदोषांसकट आम्ही एकमेकांचे सौभाग्य आहोत.

सौ. वंदना बर्वे.

महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच दे‌ईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो>>> या वाक्यातून

ह्या फुले, कर्वे यांच्याविषयी आदर नाही अथवा त्यांच्या कार्याचा आदर नाही असा कृपया घेऊ नये. असा अर्थ का घेऊ नये हे तुम्ही स्पष्ट करू शकता का? कारण, मुळात तुमचे "शिक्षण अहंकार निर्माण करतं" हे वाक्य जितकं चूक आहे त्याहून जास्त वरती दिलेलं विधान बेजबाबदार आहे. खासकरून "अहंकारच येतो, ज्ञान नाही" हे वाक्य!!! माझ्यातर्फे तरी या वाक्याचा निषेध.

महात्मा फुले अथवा कर्वे हे "चुकलेत की काय हे अजून सिद्ध व्हायचे आहे" म्हणजे नक्की काय व्हायचे आहे? आजच्या शिक्षणपद्धतीमधे ज्या काही चुका असतील त्या या लोकांमुळे निश्चितच नाहीत. कुठलीपण सिस्टीम परफेक्ट नसते, शिक्षणपद्धती तरी का असावी? बदल घडवण्याची गरज आहेच म्हणून पद्धतच चुकीची आहे असे मानणे चूक. मिळणार्‍या शिक्षणातून "अहंकारच येतो, ज्ञान नाही" असे कृपया बोलू नका. हे बोलून तुम्ही स्वत: तुमच्या शाळेचा, त्यामधील शिक्षकांचा आणि तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा अपमान करत आहात.

वंदनाताई, आज तुम्ही आणि आम्ही इथे बसून जे हे काही लिहत आहोत ना ते या लोकांमुळे. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे. कर्वे यांच्या संस्थेतील शिक्षणामधून "ज्ञान" मिळत नाही वगैरे कुणी सांगितलं तुम्हाला? उलट आजही मला अभिमान वाटतो, या संस्थेमधून शिक्षण घेतल्याचा. काल सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. मुलींनी शिकावं, स्वतःच्या पायावर सक्षमरीत्या उभं रहावं म्हणून त्यांनी किती सोसलं असेल याबद्दल एकदा वाचा नंतर त्यावर एकदा विचार करा. किमान त्यांच्या कार्याची एवढीतरी बूज राखा, आणि अशी बेताल विधाने करू नका. प्लीज.

"सौ." ह्या शब्दाला अनुभवाची जोड मिळाली तेंव्हा माझं सौभाग्यवती असणं अर्थपूर्ण झालं. आमच्यातल्या गुणदोषांसकट आम्ही एकमेकांचे सौभाग्य आहोत.

कित्ती छान. असे ज्या जोडप्याना वाटते त्यातील पुरूषही सौ. लावत असतील नै!

याहून , ज्या जोडप्यातले असं लावत नाहीत ते स्वतःला सौभाग्यशाली मानत नाहीत का?

संस्कृत शिकलेल्या कुणा एकीने तर या शब्दाचा फारच वेगळा अर्थ सांगितला होता तो तर इथे देऊही शकत नाही.
Happy

<कित्ती छान. असे ज्या जोडप्याना वाटते त्यातील पुरूषही सौ. लावत असतील नै!>

नाही. ते सौ. नाही लावत सातीजी.

आपण स्त्रीया सौभाग्यशाली होतो व पुरुष श्रीयुत होतात. पण हा भावच नात्यामध्ये नसेल तर ते संस्कारांनी स्विकारलेलं ओझं तरी होतं किंवा नावाआधी लावलेलं संबोधन.

सौ. वंदना बर्वे.

गोव्यात हजेरी ५०% झाली की विद्यार्थ्याला पुढच्या इयत्तेत ढकलतात, तेही अगदी आठवीपर्यंत. शिक्षण कसं असावं, कसं आहे हा स्वतंत्र लेखनाचा धागा होऊ शकेल. पण फुले, कर्वे आत्ता हयात असते तर त्यांना आता मिळत असलेले शिक्षण पाहून याचसाठी आपण हालापेष्टा का काढल्या असेच वाटले असते.
>>
गोव्यात मिळणार्‍या शिक्षणावरून तुम्ही बाकी ठिकाणीही असेच शिक्षण मिळते हा निष्कर्ष काढला आहात असे एकंदर वाटत आहे. शितावरून भाताची परीक्षा सरसकट सगळीकडे नसते हो करायची.

हे साती, असं नाही हं करायचं.. मला तरी दोन्ही अर्थ कळले पाहिजेत.. तरच मी ठरवेन "सौ" की नाही ते. मला कळलेली माहिती मी नवर्‍याला पण सांगेन .. मग तो ही ठरवेल त्याचं त्याचं काय ते.

"ज्योताई, प्रीतमोहोर असे आयडी ज्यांनी गोव्यात शिक्षण घेतलं आणि/किंवा आपल्या मुलांनाही तिथे शिकवले, त्यापैकी कोणालाही अहंकार नाही आणि स्वतःच्या कार्यक्षेत्रात व इतर सामाजिक कार्यात गति आहे" हे मी स्वानुभवाने नमुद करू इच्छिते. माझी बरीच भावंडं जी कोकणातून, मुम्बैच्या महापालिका शाळेतून शिकली त्यांच्याबद्दलही हेच मत आहे.

निदान माझ्या माहितीतल्या कुठच्या ही शाळेत "गर्वाचे घर वरती" असे शिकवत नाहीत. "स्त्रियांचा / कष्टाचा अनादर करा " असे कोणी शिकत असेल तर त्यात सोशल कंडीशनिंगचा जास्त भाग आहे. हां, आता शिक्षण अरेला का रे? म्हणायची क्षमता निर्माण करत असेल आणि त्याला आपण अहंकार म्हणत असू तर मात्र कर्वे, आगरकर, फुले ह्यांच चुकलचं.

आपण स्त्रीया सौभाग्यशाली होतो व पुरुष श्रीयुत होतात. पण हा भावच नात्यामध्ये नसेल तर ते संस्कारांनी स्विकारलेलं ओझं तरी होतं किंवा नावाआधी लावलेलं संबोधन. ??पुरूष लग्नाआधी काय असतात? चिरंजीव. लग्नानंतर श्रीयुत होतात. स्त्रिया लग्नाआधी काय असतात. कुमारिका. लग्नायोग्य झाल्या की चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी होतात. यामधे तुम्हाला कुठेच काहीच चूक वाटत नसेल तर काय बोलणार?

(माझ्या आधीच्या पोस्टचा सपशेल अनुल्लेख का बरे????)

नंदीनिजी,

लेखात शिक्षणातून अहंकार निर्माण होतो हे वाक्य नवराबायकोमध्ये एकमेकांना दुय्यमता देणे व अनादर निर्माण होण्याचे कारण शिक्षणातून निर्माण झालेला अहंकार असे होते.

"बापरे महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे सगळे चुकलेच म्हणायचे मग!!! गेट अ ग्रिप! गेट वेल सून!"

हा "शिक्षण अहंकर निर्माण करते" ह्या वाक्याला आलेला प्रतिसाद होता.

त्या प्रतिसादाला दिलेले "महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच दे‌ईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो"

हे उत्तर होते. ज्याचा संदर्भ पुन्हा नवरा बायको यांच्यातल्या नात्याशी आहे, सार्वजनिक नाही. संदर्भ काढून वाक्याचे पंचनामे केल्याने असे होते.

एकीकडे तुम्हीच मान्य करता की जे शिक्षण मिळतय ते सदोष आहे. मी त्याकरीता फुले, कर्वेंना जवाबदार धरलेच नाही. उलटपक्षी त्यांना आपण ज्या शिक्षणप्रसारासाठी हाल-अपेष्टा काढल्या, ते शिक्षण आज मिळत नाही हे पाहून आपण हाल-अपेष्टा का काढल्या असेच वाटले असते. आजचे शिक्षण पाहून तशी कमेंट येणे हे फुले, कर्वेंच्या कार्याची बूज न राखणे असं कसं म्हणता येईल? माझ्या मनातही तसे येणे शक्य नाही.

सौ. वंदना बर्वे

महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच दे‌ईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो>>> हे लिहिल्यानंतर वेग्ळा अपमान करायची गरज नाही.

कृतघ्नपणा कशाला म्हणतात तर त्यासाठी मी हे उदाहरण देइन.

कृतघ्नपणा कशाला म्हणतात तर त्यासाठी मी हे उदाहरण देइन. <<<
कृतघ्नपणा १०० %
बाईंना उपरोध झेपला नाही आणि निघाल्या फुल्यांच्या, कर्व्यांच्या कामाची किंमत करायला... सिद्ध व्हायचेय म्हणे...

<पुरूष लग्नाआधी काय असतात? चिरंजीव. लग्नानंतर श्रीयुत होतात. स्त्रिया लग्नाआधी काय असतात. कुमारिका. लग्नायोग्य झाल्या की चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी होतात. यामधे तुम्हाला कुठेच काहीच चूक वाटत नसेल तर काय बोलणार?>

नाही मला यात काही चूक नाही वाटत. तुम्हाला जे चूक वाटते ते अवश्य सांगा.

सौ. वंदना बर्वे.

>> लग्न टिकतात कारण दुसरा option नसतो. आणि भारता सारख्या समाजात दुसरा option शोधणे आणि तो मिळाला तरी आधिचे लग्न तोडुन बाहेर पडणे हे फार अवघड आहे, त्यामुळे आहे त्या लग्नात टिकुन रहावे लागते. कायदा सुद्धा लवकर divorse घेउन देत नाही आणि त्यात एका चा विरोध असला तर जवळजवळ अशक्य च.
दुसरे म्हणजे विजोड्पणा जाणवायला वेळ जायला लागतो ( मी एकदम extreme उदाहरणे सोडुन बोलतोय ), तो पर्यंत मुलांची जबाबदारी आलेली असते, आणि मग काहीच करणे शक्य होत नाही
>>
प्रसाद१९७१ >> १०१ % अनुमोदन. 'बदाम राणी' मध्ये आनंद ईंगळेने ही हेच सांगितले आहे.
शिवाय समाज - नातेवाईक ,मित्रमंडळी,कलिग्स यांच्यापुढे इमेजचे तीन तेरा वाजतात ते वेगळेच.
पुन्हा नंतर 'अशा' (म्हणजे घटस्फोटित) स्थळांचे 'जमणे' हा एक प्रकार वेगळाच.
हल्ली शिक्षण्,नोकरी करून मग स्थळे बघून जमेपर्यंत तिशी येते.त्यात पुन्हा विजोडता जाणवून घटस्फोटाचे ठरून तो प्रत्यक्षात येईपर्यंत अजून ३,४ वर्षे गेली.पुन्हा दुसर्या लग्नाची तयारी करा,स्थळे बघा,नाव नोंदवा. स्थळे बघताना तिशीपस्तीशीपुढच्या मुलामुलींनाही प्रथमवरच हवा असतो(संदर्भासाठी - रविवारच्या पेपरमधल्या पुरवणीतला वधू/वर पाहिजे विभाग गरजूंनी वाचावा).बरं जरी कोणी मिळाली /मिळाला तरी तिच्या/त्याच्या विजोडतेचे काय? ती नंतर जाणवली तर मग? शेवटी मेड टू ऑर्डर क्लोन तर मिळू शकणार नाही ना. मग काय आयुष्यभर विजोडता व अनुरूपता शोधत बसावे का?

ज्याचा संदर्भ पुन्हा नवरा बायको यांच्यातल्या नात्याशी आहे, सार्वजनिक नाही. संदर्भ काढून वाक्याचे पंचनामे केल्याने असे होते.<< नवरा बायकोच्या नात्यामधे शिक्षण आणि अहंकार यांची सांगड तुम्ही घातली आहे. तेदेखील ठामपणे "शिक्षणाने अहंकार निर्माण होतो" असे लिहून (प्लीज नोट: तुम्ही अहंकार निर्माण होऊ शकतो" असे विधान केलेले नाही.)

वरची चर्चा मी पूर्ण वाचलेली आहे. त्यामुळे ते संदर्भ देण्याची आवश्यकता नाही. तरीपण

बापरे महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे सगळे चुकलेच म्हणायचे मग!!! गेट अ ग्रिप! गेट वेल सून!"

हा "शिक्षण अहंकर निर्माण करते" ह्या वाक्याला आलेला प्रतिसाद होता.

त्या प्रतिसादाला दिलेले "महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच दे‌ईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो"

यातलं हे जे बोल्ड केलेले तुमचे वाक्य आहे ना ते किती चूक आहे ते तुम्हाला अद्याप समजलेलं दिसत नाहीये!! फुले आणि कर्वे शिक्षणक्षेत्रतज्ञ नव्हते, समाज्-सुधारक होते. त्यांना "अभिप्रेत असलेले शिक्षण" यापेक्षा जास्त "जास्तीत जास्त मुलींना शिक्षण मिळावे" याची चिंता होती. आणि मी पूर्ण विश्वासाने सांगते की अवघ्या १०० वर्षात झालेली स्त्रियांची प्रगती आणि समाजामधे घडलेले बदल पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता. पूर्ण प्रगती झाली नसली तरी किमान आपण अर्धा टप्पा तरी गाठलेला आहे. आज एकही असे क्षेत्र नाही जिथे स्त्रिया काम करत नाहीत. गावामधे जिल्ह्यामधे जाऊदेत, पण परदेशामधे एकट्या जाऊनदेखील स्त्रियानी किती प्रगती गाठली आहे ते एकदा बघा. मायबोलीवर "संशोधनक्षेत्रातले मायबोलीकर" असा एक विभाग आहे. तिथे काही स्त्रियांनी आपली माहिती लिहिली आहे. ती बघा... हे एक उदाहरण झाले.

पण तुम्हाला त्याचे महत्त्व वाटत नाही. तुमच्या दृष्टीने "शिक्षणामुळे नवराबायकोच्यात अहंकार येतो" हेच अंतिम सत्य. डेलिया म्हणते तसं, "नवरा, घर, संसार यामधून बाहेर या!!!"

लग्न न झालेल्या वयाने मोठ्या बाप्यालाही श्रीयुत असे म्हणले जाते. हे माहितीये का? की लग्न झालेले मोठ्य वयाचे बाप्ये पाह्यलेच नाहीत आजूबाजूला?

लग्न न झालेल्या वयाने मोठ्या बाईला सौभाग्यवती म्हणत नाहीत. कुमारिका म्हणतात. मोठ्या वयाच्या बाईच्या कुमारी असण्या नसण्याची केवढी ती उठाठेव जगाला.

नाही मला यात काही चूक नाही वाटत. तुम्हाला जे चूक वाटते ते अवश्य सांगा. >> सान्गून काय उपेग? आम्ही शिकलेल्या स्त्रिया आहोत. अहंकारी असणारच. जोडीदाराबद्दल अनादर असणारच. आमचे तुम्ही ऐकून घेणार आहात का?

Pages