ओलांडली गावे..

Submitted by भारती.. on 30 December, 2012 - 03:04

ओलांडली गावे..

आयुष्याच्या यज्ञी

जळे याज्ञसेनी

सीतामाय वनी

फिरते गर्भिणी

दु;ख एक सत्य

स्थिर तेथे कुंती

उर्मिलेच्या ऊर्मीभवती

प्रासादाच्या भिंती

नामयाची जनी

ज्ञानियाची मुक्ता

अभावांच्या अंगणात

उभारली सत्ता

घट्ट खोचलेल्या

पदरांना ठावे ..

वादळांची वणव्यांची

ओलांडली गावे..

- भारती बिर्जे डिग्गीकर

अमानुष अत्याचारांच्या होरपळीत स्त्रीत्व अनादि काळापासून जळते आहे..महाकाव्यांचे,इतिहासाचे दाखले दुसरं काय सांगतात ?

पण आज हे अन्यायांना निर्ढावलेलं मनही सुन्न झालंय,सोसण्याची परिसीमा झालीय. मूक आसवं कितीएक डोळ्यात सतत तरारताहेत..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई...
अस्वस्थ मन असंच काहीसं व्यक्त होऊ पहातयं..

तुम्ही सगळे कविता लेख या माध्यमातून व्यक्त होताहात...

मला तर तेही जमेना झालयं.... Sad

धन्स.. काय लिहावे सुचत नाहीय.अंजली,काहीही न सुचणं ही एक अत्यंत उत्कट प्रतिक्रियाच.

सर्वांचे आभार..
बेफिकीर, ही कविता स्त्रीजातीच्या वेदनेची, असं लिहितानाच पीडा देणारे व पीडित यांचा कोणताही वर्ग,लिंग,जात नसते याची सतत जाणीव आहे. आज वृत्तपत्र वाचताना वेदना ही एकच प्रतिक्रिया मनात व्यापून रहाते,एवढंच की स्त्रिया अन लहान मुले ही soft targets म्हणून नरपशूंच्या तावडीत जास्त सहजपणे सापडतात ..सामाजिक अन घराच्याही चौकटीत त्यांची घुसमट जास्त होत असते..

भारती, सह-वेदना असा नुस्ता विचारही तडफडवणारा आहे. मग ती वेदना प्रत्यक्षात भोगलेल्या जीवांचं काय होत असेल?
तू लिहून गेलीस, मला तेही जमलं नाही. नुस्तं काहीतरी लिहणं नाही तर... पोचेल, टोचेल, भिडेल... नाकारता येणार नाही असं काही लिहिलयस.
माझा नुस्ता षंढ, नपुंसक तडफडाट...
एकच केलं. मनोमन ठरवलं, की समोर असं काही होत असताना गप्पं बसणार नाही. जमेल तसं जमेल तितकं झगडेन....
बाकी प्रार्थनेवर जगणं आहेच...

धन्य आहे तुमची... मनातली ही वादळं किमान शब्दांत पुसट्शी तरी पकडता आली तुम्हाला! मी मात्र अजुनही डोळ्यांतल्या पाण्यात मनातल्या व्यथा वाहून जाण्याची वाट पाहते आहे!

घट्ट खोचलेल्या

पदरांना ठावे ..

वादळांची वणव्यांची

ओलांडली गावे..>>>> हेच... असंच म्हणायचं होतं मला...!!! :'(

पुनश्च सर्वांचे आभार.

>>>>एकच केलं. मनोमन ठरवलं, की समोर असं काही होत असताना गप्पं बसणार नाही. जमेल तसं जमेल तितकं झगडेन....>>

दाद,सलाम या संकल्पाला.

खरेय. सहवेदना हा शब्दही जिवाचा थरकाप उडवतोय. एका द्रौपदीची कुरुसभेतली आकांतिक प्रश्नमय वेदना थिटी ठरेल असं काही गल्लोगल्ली घडतंय.प्रार्थना तिने केली, ती सिद्ध झाली ..आपल्याकडे आहेत अधुर्‍या अपुर्‍या कवितेतले उसासे,डोळ्यातले पाणी ..