------ वाचलो बुवा ----------

Submitted by अनुराधा म्हापणकर on 27 December, 2012 - 01:03

प्रदुषणाने कोंडूदे ना
आमचे मोकळे श्वास
डेंगू मलेरिया, चावूदेत ना
उकरिड्यावरचे डास
….. तरी वाचलो बुवा, बरं झालं
….. जगबुडी झाली नाही !

करुदे ना नेत्यांना
मोठ मोठाले स्कॆन्डल्स
आमच्याच जीवावर छापूदे
नोटांची बंडलच्या बंडल्स
….. तरी वाचलो बुवा, बरं झालं
….. जगबुडी झाली नाही !

आमच्या पॊश घराबाहेर
साठूदेत कच-यांचे ढीग
नाका-नाका सिग्नलवर
भिकारी मागूदेत भीक
….. तरी वाचलो बुवा, बरं झालं
….. जगबुडी झाली नाही !

महागाईचा भस्मासूर
नको परवडूदे गॆस डिझेल
रोजच्या घासासाठी लागूदे
करायला जीवाची घालमेल
….. तरी वाचलो बुवा, बरं झालं
….. जगबुडी झाली नाही !

नसेना का आमच्या
शहरा-देशात राहणं सेफ
शहरामधे उघड्यावरती
होऊदेत ना गॆन्गरेप
….. तरी वाचलो बुवा, बरं झालं
….. जगबुडी झाली नाही !

रोज रोज मरणयातना
जगण्यासाठीची लाचारी
तरी मनात उद्याची आशा
जगण्याचा सोसही भारी
म्हणूनच म्हटलं …
….. वाचलो बुवा, बरं झालं
….. जगबुडी झाली नाही !
….. जगलो आम्ही जरी आम्हाला
…. आज कुणी वाली नाही

अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users