आहेर भैरव

Submitted by मुंगेरीलाल on 25 December, 2012 - 07:44

आजकाल लग्न समारंभ मी चुकवीत नाही. कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भेटीगाठींपेक्षाही जरा निराळ्या चवीचं सुग्रास जेवण यथेच्छ झोडणे हा माझा अंतस्थ हेतू असतो. शिवाय बहुतेक ठिकाणी आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नये असे पत्रिकेत लिहिलेलंच असतं त्यामुळे या गोष्टी आवर्जून वेळ काढून विकत आणण्याचे कष्टही जवळपास इतिहासजमा झालेले आहेत. जरा बऱ्यापैकी कपडे घातले की काम झालं. पूर्वी असं नव्हतं. अगदी सुरवातीला अशी सूचना छापून यायची तेंव्हाही ते खरोखरच प्रमाण मानायचं की तरीही काहीतरी न्यायचंच या संभ्रमात पडायला व्हायचं. बायको म्हणायची ‘अहो ते लिहायची पद्धत आहे, पण आपण जवळचे पडलो, बरं दिसत नाही’. मग हो-नाही करता-करता जसजसा लग्नाचा दिवस (तिथी म्हणतात सुसंकृत माणसं) जवळ येईल तसं कधी ही मला ‘तुला सुचेल तसं ऑफिसमधून येताना काहीतरी घेऊन ये’ आणि मी तिला ‘पैसे देऊन ठेवतो, तूच काहीतरी दुपारी जाऊन घेऊन ये’ अशा टाळ-गर्जना करत आहेर प्रकरण जमेल तसं चुकवत असतो. पण मग तो निर्वाणीचा दिवस येऊन ठेपतो.

मी पुन्हा एकदा ती आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नयेत ही ओळ उगीचच पुन्हा वाचून पहावी म्हणतो (जणू काही आहेर न आणण्याचा निर्णय घेण्यासाठी मानसिक बळ मिळणार आहे), पण नेमकी पत्रिका सापडत नाही. मग अगदी, कालपर्यंत इथे समोर टेबलावर होती, माझ्या हातानी ठेवली होती/डोळ्यांनी पहिली होती वगैरे आणा-भाका होतात, पण तो यजमानांनी कौतुकानी पैसे खर्च करून, सपत्नीक घरोघरी चहा-कॉफी-सरबताचा यशस्वी प्रतिकार करत उन्हा-तानात येऊन अगदी रीतीला धरून डोक्यावर टोपी वगैरे घालून अटेन्शन मध्ये उभं राहून सुपूर्द केलेला मुंडावळीयुक्त मखमली लखोटा काही केल्या नजरेस पडत नाही. फक्त मला इतकंच आठवतं की पत्रिका हातात देताना यजमान तुमच्या इथे पूर्व-पश्चिम कुठे आहे असे विचारतात आणि मी कायम गडबडून हिलाच ‘कुठे ठेवलीस गं? किंवा आमच्याकडे दोन्ही वेगवेगळ्या दिशांनाच आहे’ असं काहीतरी हमखास बडबडतो.

तेव्हढ्यात शोधाशोध आणि आमचे संवाद कानावर पडून आज्जी खोलीच्या बाहेर येते आणि विचारते ‘गडद तपकिरी रंगाचा होता काय तो लिफाफा?’. आम्ही दोघंही हर्षोल्हासानी गरकन तिच्या दिशेने वळून गॅदरिंगच्या भारुडात पाठ करून घेतल्यासारखं एका सुरात ‘होsss’ असं ओरडतो. पण ती एका फटक्यात खुलासा करत नाही.

‘परवा नाही का तुझ्या ऑफिसमधले ते दोघं आले होते... नावं एक माझ्या आजकाल लक्षात रहात नाहीत’

‘हां तो शेवडे आणि त्याची बायको... पण लग्न बापटांच्या घराचं आहे, त्यांचा काही संबंध नाही’

‘चांगली होती हो पण ती पोरगी, छान साडी वगैरे नेसलेली आणि जाताना मला नमस्कार केलान’

‘अगं त्या गडद तपकिरी साडीचं.... आपलं पत्रिकेचं सांग की पटकन, इथे जीव टांगणीला लागलाय’

‘अरे त्यांचा बंटू की पिंटू किती त्या काचेच्या फ्लॉवरपॉटच्या मागे लागला होता..’

‘अगं आज्जी, किती हवेत बोलशील...’

‘हवेत मी नाही, त्याचं लक्ष वळवायला तू त्याला जे कागदाचं विमान करून दिलं होतंस ना, ते गडद तपकिरी रंगाचं होतं बघ... ते गेलं त्याच दिवशी गॅलरीतून हवेत.’

आता माझा चेहेरा पत्रिकेच्या ऐवजी ‘आधार कार्ड’ हरवल्यासारखा झाला होता. कारण कार्यालयाचं ठिकाण, लग्नाची वेळ वगैरे काहीच लक्षात नव्हतं. आजकाल काहीही झालं की गुगलवर जायची सवय असते, त्यामुळे क्षणभर मनात ‘बापट पुणे वेडिंग टुडे’ असं काहीतरी टाकून तरी पहावं असं मनात आलं. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा फोलपणा लक्षात आला. बायकोकडे धैर्यानी वळून पहायची वेळ आली होती. आतापर्यंत मी नेहेमीप्रमाणे तिच्या आवरा-आवरीच्या तथाकथित उपद्रवी छंदाला आणि विसराळूपणाला यथेच्छ बोल लावले होते, त्याचा टोल भरायची वेळ आलेली असते.

‘कसं करायचं गं आता?’ आवंढा गिळणं ठीक आहे, पण कोरड पडली असताना काय आणि कसं गिळावं ते कळत नाही. पण बॅटरी संपत आलेल्या रोबोसारखा मी महत्प्रयासानं मान यांत्रिकपणे आधी डावीकडून उजवीकडे आणि मग सावकाश वर उचलून तिच्या नजरेला नजर देतो. पण ती मला दिसतच नाही. दिसतो फक्त गडद तपकिरी रंग. काय झालंय मला हे? जीए कुलकर्णींची कथा तर नव्हती वाचली काल रात्री.... हळूहळू भान येतं की तिच्या हातात तोच लिफाफा असतो.

‘अरे वा, सापडली की काय पत्रिका? आणि मग आज्जी काय म्हणत होती?’, मला आता क्षणा-क्षणाला धक्के देणाऱ्या कौटुंबिक मालिकेच्या महाएपिसोड मध्ये नुसतेच निरनिराळ्या रंगांचे झब्बे घालून उगीचच चकित आणि हताश होणाऱ्या प्रभावहीन शुंभ बापासारखं वाटायला लागतं.

‘पत्रिका नाही, हँगर आहे’

‘हँगर?’ डबल-शुंभ बाप मुद्रा.

‘म्हणजे नुसताच लिफाफा, तू बनवलेल्या पत्रिकेच्या विमानाचं हँगरच ना ते?’ अगदी मालिकास्टाईल कुत्सित-क्रूर-कटाक्ष. फक्त खऱ्या मालिकेत मोक्याच्या जागी ‘पुढच्या भागात...’ असं करून पात्रांची सुटका होते तशी माझी मात्र होत नाही. तो प्रसंग तिथेच निभावावा लागतो.

अशा तऱ्हेने पत्रिकेच्या लिफाफ्यावरून स्थळ, काळ, वेळ यांचा तर खुलासा होतो. पण ती आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नयेत ही दिलासा देणारी ओळ मात्र पत्रिकेबरोबरच उडत गेलेली असते. त्यामुळे मग आहेर- खरेदी करायचीच हा निर्णय होतो. हिला याचा विशेष त्रास होत नाही, कारण या निमित्तानी कायदेशीररित्या पुन्हा एकदा बाजार धुंडाळायला मिळून स्वतःसाठीही ‘चांगलं दिसलं म्हणून, पुन्हा-पुन्हा येणं होत नाही म्हणून’ हात (आणि माझा खिसा) धुवून घेता येतो. याचा प्रत्यय ही खरेदी कशी होते यातच येतो.

आजकाल बऱ्याच प्रसंगी साडीच्या ऐवजी ड्रेस मटेरियल चालून जातं, जे तिचं ती आजकाल आणते. कुठलं तरी कॉलनीमधलं छोटं दुकान असतं, ज्यात सुदैवानं मला आत शिरायला जागा नसते. मग मी बाहेर गाडीवर घरफोडीतला एक साथीदार उभा असतो तसा ताटकळत थांबतो, इतकंच. फक्त सगळी प्रक्रिया झाल्यावर क्रेडीट कार्ड घासायला आणि ‘ठीक आहे नं’ ला ‘अगदी, परफेक्ट’ असं ठराविक उत्तर द्यायला डोकं आत घालावं लागतं. तरी हे फार-फार बरं. पूर्वी साडी खरेदीचे दारूण अनुभव आलेले असतात. ती दुकानं, त्यातल्या गाद्या, त्यावर नुसतंच चातकासारखं मान वर करून फडताळातून कोसळणाऱ्या साडी-प्रपाताकडे करुणपणे बघत बसणं आणि एरवी फोटोत दिसणाऱ्या निरनिराळ्या संतांच्या/महाराजांच्या स्टाईलने त्यांचं तपोबल अंगी बाणवत तासंतास बदलून पाहिलेल्या मांड्या/खुरमांड्या, त्यातून शेवटी-शेवटी पिंढरीत आलेले गोळे आणि तात्पुरती कमरेखालील पक्षाघाताची दिव्य अनुभूती. देवा. यापेक्षा दुर्दैवी म्हणजे फक्त तुळशीबागच असू शकते.

एकदा तर कंटाळून मी बसलोच आहोत तिथे तर आपणही काहीतरी रस दाखवावा खरेदीत या विचारानं ढिगातली एक साडी ओढून ‘ही कशी वाटते’ असं विचारायचा आगाऊपणा केला होता तो चांगलाच अंगाशी आला. कारण ती साडी ढिगातून वर येताच, बाजूला पाठमोऱ्या बसलेल्या एका चौसोपी काकूंचा पदर होता हे जाणवले. मग त्याही गोळे आलेल्या अवस्थेत फलाटावरच्या पांगळ्या भिकाऱ्याच्या चपळाईने जागा बदलून जे सगळ्यात वरच्या फडताळात नजर लावली की, बायकोनं ‘गेली वाघीण, उतर आता मचाणावरून’ अशा अर्थाची खुण केली तेंव्हाच खाली पाहिलं.

पण ही कपडेखरेदीची फेज डायरेक्ट येत नाही. सुरुवात ‘कपडे-बिपडे नेहेमीच घेतले जातात आणि बजेटही फार जातं, फार काही नको, टोकन म्हणून काहीतरी द्यायचं’ असं कमी पैशाचं आमिष दाखवत भांड्यांच्या दुकानात नेलं जातं. तिथे मग एकात-एक बसणारी पाच-सहा भांडी असलेला सेट आधी पाहिला जातो, जो ५०० च्या आत असतो. आपण स्वस्तात सुटणार या दिवास्वपनात मी शिरणार तोच,
‘ही मायक्रोवेव्ह मध्ये चालतील ना?’ असा प्रश्न येतो. दुकानदार नकारार्थी मान हलवत स्टुलावर चढून दुसरा एक १२०० चा आणि एक तिसरा तसाच पण 'आयएसआय' मार्क वाला १६०० चा काढतो. आता माझ्या उदरपोकळीतले अवयव हळूहळू आवळून एकत्र येऊन तातडीची बैठक बोलवायचं ठरवतात.

‘काय करूया?’ हा प्रश्न अनपेक्षित कानावर पडतो. आणि मी त्या ५०० वाल्या भांड्यांची ‘कड’ घेणार, तोच इतक्या जोरात माझ्या पोटात कोपर मारलं जातं की मी कळवळून
‘अगं मारतेस का मला’ असं ओरडतो. दचकून दुकानदाराच्याही हातातली भांडी निसटतात आणि बायकोही चमकते कारण ते तिनं मारलेलं कोपर नसून माझ्या मागून लगबगीनं बाहेर पडणाऱ्या दुसऱ्याच एका भगिनीच्या काखेतल्या निर्लेपच्या तव्याचा दांडा असतो. शिवाय तिची अपराधीपणाचा लवलेशही नसलेली ‘काय बै हे पर्रपुर्रुष... वरवर सुशिक्षित दिसतात’ अशी तव्यापेक्षा चरचरीत नजर. एरवी तिनी मला जाहीररित्या चांगलाच फैलावर घेतला असता पण फक्त बरोबर तिच्याइतकीच तुल्यबळ बाई माझ्यासोबत पाहून मला अधिक ‘जलील’ न करता ‘बा-इज्जत-बरी’ करते.

‘काय दिलं होतं त्यांनी आपल्याला आठवतंय?’, धडा संपल्यावर प्रश्न असतात तसं हिचं विचारणं.

‘तीव्र खोलवर वेदना’

माझ्या विव्हळमुद्रे कडे दुर्लक्ष करत ती दबक्या आवाजात पुन्हा विचारते,
‘मी बापटांचं म्हणतीये, आपल्या लग्नात त्यांनी काय दिलं होतं आठवतंय का?’

‘ते सगळं तुलाच लक्षात असतं, मला काय विचारतेस?’ मी घटनास्थळी अंगठा आणि तर्जनीत कमरेचं कातडं धरून पडलेला खड्डा होमशॉपी चानलवर घरच्याघरी गाडीला आलेला पोचा काढताना दाखवतात तसा बुजवायचा प्रयत्न करत करवादतो.

‘तुमच्या बाजूच्या भेटवस्तूंची नोंद तुझी बहिण ठेवत होती, ते मला काय विचारतोस?’

बापट त्यावेळी तरी आमच्या बाजूनी निमंत्रित होते हे आठवून मी गप्प होतो आणि ‘ठीक है, ये १२०० वाला दिखाना’ असं समोर पाहून बोलतो, पण मला दुकानदाराच्या ऐवजी समोरच्या कपाटातली भांडीच दिसतात आणि तीही गेटवे ऑफ इंडियातून पहिल्यासारखी. कारण एव्हाना तो आमच्यासमोर वर चढून दुसऱ्या माउलीला वर टांगलेली नारळाची खवणी काढून देण्यासाठी सुतळीशी झोंबत असतो. आता खवणी डोक्यात पडून आतलं खोबरं बाहेर यायच्या आत तिथून काढता पाय घेणं मी पसंत करतो. शिवाय एवढ्या किमतीत एक बऱ्यापैकी शर्ट आणि एखादी आहेर-छाप साडी आरामात येईल ही आकडेमोड हिच्या डोक्यात चालू झालेलीच असते. मग बाकीच्या वाटेतल्या भगिनी आणि पाय पसरून बसलेली बाथरूम मधली स्टूलं आणि कपडे वाळत घालायचे stand चुकवत आमची जोडी बाहेर पडते, पण भागते भूत की लंगोटीही सही या न्यायानं स्वतःसाठी बिनमायक्रोवेव्ह वाला सेट (आपल्याला अन्न काढून ठेवायला चालतो) विकत घेऊनच.

मग दु:खावर फुंकर म्हणा किंवा पेपर मधला सोपा प्रश्न आधी सोडवण्याची परवानगी म्हणून शर्टच्या दुकानात आमचा मोर्चा जातो. ही खरेदी पटकन होऊ शकते आणि त्याला विशेष डोकं चालवायची गरज पडत नाही असा माझा समज असतो. पण तिथेही सोलींचा अॅलन, फिलीपांचा लुई वगैरे महागडी मंडळी बजेटची वाट लावायला बसलेलीच असतात. कारण बापट ब्रान्डेडच घालतात अशी मौलिक माहिती घेऊनच आम्ही पायरी चढलेलो असतो आणि ‘एकतर काही देऊ नये, आणि दिलं तर ते उत्तमच द्यावं, त्यांनी मागून आपली किंमत करू नये’ हा बाणा असतो. आपण स्वतः मात्र इतरांनी आहेरात दिलेले ५०० च्या आसपासचे इंग्लंडचे पिटर घालून ‘वापरून टाकत’ असतो जे कधीच संपत नसतात. अशा तऱ्हेने यथावकाश प्लेन की डिझाईनवाले, चौकटी की काड्या, बाह्या की लांबबाह्या असं करत-करत एक शर्ट निवडला जातो आणि मग साक्षात्कार होतो की तो ४४ साईझचा आहे आणि बापट फारफार तर १६५ लिटरच्या गोदरेजच्या फ्रीज पेक्षा उंच नाहीत. चाळीस साईझ त्यांना उंचीला येईल पण बटणं लावायला दोन माणसं मदतीला लागतील. मग दुकानातला स्वयंसेवक कसाबसा ४२ वाला नग धुंडाळून आणतो आणि आमची एकदाची बोळवण करतो. आता कळतं ४२ ला चले-जाव का झालं ते.

तर अशा दिव्यातून जात शेवटी आहेरानी सज्ज होऊन आम्ही लग्नाला जायला सिद्ध होतो. धावत-पळत कसा-बसा मुहूर्त गाठत कार्यालयात धडकताच यजमानिण बाई सामोऱ्या येतात आणि आमच्या हातातील खोकी पाहून जवळ-जवळ ओरडतातच,

‘अहो, हे काय? पत्रिकेत लिहिलं होतं ना काही आणायचं नाही म्हणून’ एका फटक्यात जाहीररित्या माझ्या साक्षरतेचे वाभाडे काढले जातात, हो इतकं ठळक छापून कसं वाचत नाहीत लोकं असा एकूण अविर्भाव.

‘असू दे हो, चालायचंच’, मी अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरत ओशाळवाणं हसत पुटपुटतो.

‘चालायचंच काय? बाकीच्यांना नाही का वाटणार, आम्ही त्यांच्याकडून काहीच घेतलं नाही म्हणून?’

‘.....’

‘नाही, नाही. अज्जिबात काही घेणार नाही हां आम्ही, सांगून ठेवते’, इतकं बोलून त्या गर्दीत आल्यापावली गायबच होतात आणि आम्ही मात्र तोंडात मारल्यासारखे एकमेकांकडे पहात राहतो. दोष त्यांचाही नसतो आणि आमचाही नसतो. फरक दर शंभर मैलांवर बदलणाऱ्या रितीभातींचा असतो. जिथून आम्ही पुण्यात येऊन स्थाईक झालेलो असतो त्या आमच्या मूळ गावी नकोचा अर्थ ‘दिलं पाहिजे’ ते ‘आणलं तरी चालेल’ या रेंज मधला असतो तर इकडे बहुधा तो ‘आणलंच आहे तर ठीक आहे’ ते ‘इतकं स्पष्ट लिहून कसं समजत नाही’ या पट्ट्यात मोडतो.

काहीही असो, हा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला काही तिथे जेवण जात नाही. कशाबशा अक्षता टाकून आम्ही उभयता बाहेर पडतो. गाडी काढता काढता बायको मध्येच विचारते, ’४२ चा शर्ट बसेल ना रे तुला? तो रंग निवडताना तूच माझ्या डोळ्यासमोर होतास’ आणि मला मनापासून हसू येतं. चला असा का असेना, यंदा फॉर-अ-चेंज स्वतः खरेदी केलेला ‘सोलींचा अॅलन’ आहे माझ्या नशिबात. त्यानंतर मात्र आम्ही मुद्दाम आहेर-भैरव राग आळवणं बंद केलं. लग्नाला जाणं आणि यथेच्छ पुक्खा झोडणं हे मात्र आवर्जून करतो. समारंभाला जाण्यासाठी काढलेला वेळ आणि जाण्या-येण्याचं पेट्रोल हाच यजमानांनी आहेर समजावा. आजकालच्या काळात हेही नसे थोडके.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा Lol खतरनाक! अचाट आहे हे Happy

>>कुठलं तरी कॉलनीमधलं छोटं दुकान असतं, ज्यात सुदैवानं मला आत शिरायला जागा नसते. मग मी बाहेर गाडीवर घरफोडीतला एक साथीदार उभा असतो तसा ताटकळत थांबतो, इतकंच>><< Rofl Rofl Rofl

मस्त! भन्नाट ! मला तुमचे खुप कौतुक वाटते ...तुमच्या प्रत्येक लिखाणात साधे,नेहमी सगळ्यांच्याच जीवनात घडणारे प्रसंग असतात. पण तुम्ही ते इतके खुमासदारपणे उतरवता कि वाचायला खुप धमाल येते. मस्त आहे तुमची लेखणशैली.

झकासच! Happy

समारंभाला जाण्यासाठी काढलेला वेळ आणि जाण्या-येण्याचं पेट्रोल हाच यजमानांनी आहेर समजावा. आजकालच्या काळात हेही नसे थोडके >>> हे मात्र अगदी पटले.

मस्तच
'आहेर, नाही तर बाहेर'
त्यापेक्षा 'आपला आहेर हीच उपस्थिती' हे कसं वाटेल?

पुर्वी खरच होतं, 'अहेर आणू नका' ह्याचा नक्की अर्थ काय ह्यावरून आई-बाबांची अशीच चर्चा. त्यातलं आईचं वाक्य अगदी नेहमीचं ठरलेलं, अहो बरं दिसत नाही आपण असेच जाणं.. जवळचे पडतो ना आपण.

आणि जोडीनं ते दोघे भांड्याच्या दुकानात जात. .. भांड्यावर नाव कोरणं(जर स्टीलची असतील तर.. प्रकार... ) , भांड्याच्या दुकानात लग्न काळात कायच्या काय गर्दी.. मग साडीच्या व शर्टाच्या.
आमची वरात लहान असताना सगळीकडे उगाचच.

छानै Happy

आमच्या मामांना लग्नात जवळजवळ डझनभर भिंतीवरची घड्याळं आहेर म्हणून पडली होती. तेवढ्या भिंती त्यांच्या घरालापण नव्हत्या. एखादं घड्याळ भिंतीला लावून त्यांनी इतर घड्याळं घड्याळावरचे "अमुक अमुक यांचेकडून सप्रेम भेट" चे कागद काढून इतरांच्या लग्नात वधू-वराला देवून टाकली होती. तेवढाच आहेर खरेदी करण्याचा खर्च वाचला.

Lol Lol Lol

आमच्या मामांना लग्नात जवळजवळ डझनभर भिंतीवरची घड्याळं आहेर म्हणून पडली होती. तेवढ्या भिंती त्यांच्या घरालापण नव्हत्या. एखादं घड्याळ भिंतीला लावून त्यांनी इतर घड्याळं घड्याळावरचे "अमुक अमुक यांचेकडून सप्रेम भेट" चे कागद काढून इतरांच्या लग्नात वधू-वराला देवून टाकली होती. तेवढाच आहेर खरेदी करण्याचा खर्च वाचला.

>> अशी फिरवाफिरवी तर सर्रास चालते. मला मिळालेली एखादी गोष्ट मी वापरेन की नाही असा पुसटसा जरी संशय आला कि साबा बरोब्बर लक्षात ठेऊन घरात कोणी आले कि.."अगं ती पर्स/ साडी/ इतर फारच कॉमन स्टाईलची आहे म्हणाली होतीस ना.. आपण हिला देऊन टाकु. तेवढंच पाकिटात पैसे घालायचे वाचले" असं म्हणून घेऊन जातात. Happy

<<<<कारण ती साडी ढिगातून वर येताच, बाजूला पाठमोऱ्या बसलेल्या एका चौसोपी काकूंचा पदर होता हे जाणवले. मग त्याही गोळे आलेल्या अवस्थेत फलाटावरच्या पांगळ्या भिकाऱ्याच्या चपळाईने जागा बदलून जे सगळ्यात वरच्या फडताळात नजर लावली की, बायकोनं ‘गेली वाघीण, उतर आता मचाणावरून’ अशा अर्थाची खुण केली तेंव्हाच खाली पाहिलं. >>> Rofl

Pages