गौरी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

माझ्या धाकट्या बहिणीने लिहिलेली ही कथा या आधी हितगुजवर प्रसिद्ध केली होती. इथे पुन्हा टाकते आहे.
*************************************************
एक दिवशी भर दुपारी मी स्टेशन वर उतरले. कुठून आले होते आठवत नाही पण उतरले. धक्क्यांमधून सावरत, ट्रेनमधून उतरणार्‍र्या आणि चढणार्‍या गर्दीतून कुठल्या दिशेने चालायला सुरुवात करायची आहे हे ठरवण्यासाठी आधी स्वतःला एका जागेवर उभे केले आणि माझे लक्ष एका आकर्षक व्यक्तीकडे गेले.

...खादीचा लांब कुडता, पांढरी पडलेली निळ्या रंगाची जीन्स, खांद्याला लटकवलेली एक पिशवी की शबनम की असेच काहीतरी लटकत होते ज्यात बरेच जास्तीचे सामान कोंबले होते. कुडत्याला बटनपट्टीपाशी एक गॉगल लटकत होता. डोक्यावरचे केस जवळ जवळ सगळे पांढरे झाले होते आणि लहानपणी घामोळ्या येऊ नयेत म्हणून कापतात तसे बारीक कापले होते. म्हणजे नवरात्रात सहाव्या-सातव्या माळेला गहू जितपत वाढतात तेवढे. मला वाटते ह्या सगळ्यात आधी दिसली ती हातातली सिगरेट. गुरुदत्त स्टाइलमध्ये कपाळावर आठ्या घालून झोकात सिगारेट ओढत ट्रेनची वाट न बघता स्टेशनवर उभं असलेलं ते सुंदर ध्यान मला बघत राहावंसं वाटलं.

मी एकटक बघत आहे हे लक्षात येऊनही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून थंडपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे मी दुर्लक्ष करून निघून जाऊच शकत नव्हते.

आमचे मन तेव्हढ्यात पचकले, "जाऊन बोल तरी नाही तर चल घरी. उगाच आपलं उन्हातान्हात, गर्दीत इथे येड्यासरखं उभं राहायचं." पण काय बोलू ? ओळख नाही, पाळख नाही. बरं ज्यांच्यासमोर मी ट्रेनमधून उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, "कल्याण गेली ?". मी विचारात असतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनिटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोब प्रश्न बाहेर आला, "मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय असं वाटतं आहे, नाव काय आपलं?" ध्यान उत्तरलं, "गौरी देशपांडे". मी डोळे विस्फारून, तोंड बंद करायचं विसरून बघतच राहिले. बॅकग्राऊंड ला बाजूने येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्सची धडाधड धडाधड, एकदम फिल्मी स्टाइल.

तेव्हढ्यात कोणीतरी ट्रेन पकडण्यासाठी धावत आले आणि मला धक्का मारून गेले. त्या धक्क्यासरशी मी जरा शुद्धीवर आले. डोळे नेहमीच्या आकारात आले, तोंडही बंद झाले. बघितले तर आजूबाजूचे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. गर्दीतल्याच एक बाई माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, "बरं वाटत नाहीये का तुला ?" मी नकारार्थी मान हालवून त्यांना म्हटलं, "मी यांच्याशी बोलायला थांबले आहे." ह्या वाक्यावर बाई घाबरल्यासारख्या मागे सरकून निघून गेल्या.

देशपांडे बाई म्हणाल्या, "चल आपण तुझ्या घरी जाता जाता बोलू. एक गोष्ट सांगते तुला." आम्ही रिक्शाने गेलो. बाईंची चालत जाण्याची तयारी होती पण मला चालणं शक्यच नव्हतं. रिक्शात त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. एक दोनदा मी फक्त ऐकता ऐकता 'हं' म्हणाले तर रिक्शावाल्याने चमत्कारिक नजरेने मागे वळून पाहिले. घर येईपर्यंत त्यांची गोष्टही संपली. बाई जरा विचित्र वाटल्या. घरापर्यंत आल्या आणि म्हणे, "आता वर नही येत, उशीर होईल. रात्री प्रियाकडे जेवायला जायचंय".

माझ्या डोक्यात त्यानंतर बराच वेळ फक्त मुंग्या !!!

विषय: 
प्रकार: 

मला ही आधी वाचलेली कथा अधूनमधून आठवायची आणि आजवर असा ग्रह होता की हे बी यांनीच लिहिलं होतं.
(का? काय माहीत!)

भारी लिहिलंय.

हि देशपांडे मंडळी लोकांना वेड लावतात …… आधि गौरी ने आपल्या लेखनाने वेड लावले ……. आता राहुल देशपांडे …च्या गाण्याने वेडं केलंय ....