''गावठी राठोड''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 December, 2012 - 04:33

गावठी राठोड

(पडदा उघडतो, पार्श्वभूमीवर गाणं वाजतंय...)

मौका मिला है प्यार मे राजा
लुट गया शेर बजार मे आजा
बज गया तकदीर का बाजा
गम ना कर आजा.....
बार मे....बेवफा बार मे....

(विंगेतून एक बेवडा झुकांड्या देत स्टेजच्या मध्यभागी येतो... चालत चालत स्टेजच्या एका बाजूला जाऊन पडतो )

(विंगेच्या एका टोकावरून एक मुलगी खांद्यावर बॅग टाकून व कानात मोबाईलचे इअर फोन घालून स्टेजच्या मध्यभागी येते..... एक गुंड जोरात शिट्टी मारत तिच्या मागेमागे चालत येतो.... मुलगी घाईघाईने चालत जाते ... गुंड तिच्या मागे विंगेत जातो. )
बेवडा : स्साला काय जमाना आलाय?? जिकडे तिकडे गुन्हेगारी वाढलीय... कॉलनीच्या कोपर्या वर काल रात्रीच मर्डर झाला.... मर्डर... भीगे होंठ तेरे....प्यासा दिलामेरा... ए तिच्यायला तसला मर्डर नाय काय..... खरोखरचा मर्डर झाला..रात्री... आणि आता दिवसाढवळ्या लोक मुलींची छेड काढू लागलेत... कायदा बियदा काय शिल्लकच राहिला नाय.... कुठे गेले पोलिस....? अरे ए पोलिस.....

पार्श्वभूमीवर गाणं वाजू लागतं...
चिंताता चिता चिता चिंता ताता
चिंताता चिता चिता चिंता ताता
दुनिया चले अगाडी...तो मै चलू पिछाडी
सब खेल जानता हू,मै हू बडा खिलाडी
सुमडी मे ले के जाऊ,और सबको ये बताऊ.... क्या?
चिंताता चिता चिता चिंता ताता
चिंताता चिता चिता चिंता ताता

बेवडा : ए इंस्पेक्टर... अरे उस गुंडे को पकड.... नाचना छोड...नाचना छोड

इंस्पेक्टर : ( अक्षय कुमारच्या स्टाइलमधे मिशी पिळत ) राठोड.... गावठी राठोड
जो मै बोलता हू,वो मै करता नही....और जो मै बोलता नही..वो तो मै डेफिनेटली करता नही...
बेवडा : म्हणजे हे काम तुझ्याच्याने होणार नाही.... अरे कायद्याचा काही धाक बिक आहे की नाही
इंस्पेक्टर : तेच तर म्हणतो मी.... काय द्याचं...ते बोला.... बाकी सब छोड.....क्युंकी अपून है...
गावठी राठोड,,,…. जो मै बोलता हू....
बेवडा : इथे काल रात्री एक मर्डर झाला....परवा चोरी झाली,लुटालूट,मारामारी..काही म्हणता काही विचारू नका..... आणि आता तर दिवसा ढवळ्या एका गुंडाने मुलीला छेडले..पोलिस खातं काय करतंय??

इन्स्पेक्टर : मर्डर,चोरी,लुटालुट याचबरोबर शहरात बेवड्यांची संख्या पण वाढायला लागली आहे...मला जरा या बेवड्यांकडेपण लक्ष द्यावे लगणार आहे....सुरुवात तुझ्याच पासून करतो बोल... कुठून आलास तू? कुठे चाललास? काय करतोस?
बेवडा : (चालत इन्स्पेक्टरच्या छातीजवळ येवून.....) मी इन्स्पेक्टर होतो..... एका बेवड्याला नडलो आणि सस्पेण्डझालो.... तुला पण जर माझ्याशी नडायचं असेल तर बघ बाबा........
ईन्स्पेक्टर : मला घाबरवतोस काय? मेल्याशिवाय जात नाही जित्याची खोड..... और अपुन है..... गावठी राठोड
जो मै बोलता हू,वो मै करता नही....और जो मै बोलता नही..वो तो मै डेफिनेटली करता नही...
बेवडा : डायलॉग मारणं थांबव...... आज काय गावठी बिवठी पिऊन आलास की काय? सारखं गावठी राठोड, गावठी राठोड...
इन्स्पेक्टर : गावठी राठोड गावठी नाही.... इंग्लीश पीतो... आणी ती पण..... ए.. पण तुला का पंचाईत,मी काय पीतो याची?
बेवडा : काही नाही साहेब, माझ्याकडे सोडा आहे,दोन ग्लास आहेत,शेंगदाणे आहेत.... जरा पार्टनर शोधत होतो
इन्स्पेक्टर : दारुशी पार्टनर शीप महागात जाते..
बेवडा : अपुन सस्ते –महंगे की परवाह नही करता साहब...... आपला ब्रॅंड ठरलेला आहे.... भीक मागून पिईन पण महागातली दारुच पिईन... खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी
इन्स्पेक्टर : इथे कुठे चांगलं गावठी तूप मिळतं का रे?
बेवडा : कश्याला?
इन्स्पेक्टर : मिशीचा कडकपणा जरा कमी झाला आहे.... जरा मिशीला गावठी तूप लावेन म्हणतो....
बेवडा : गुन्हेगारांना पकडा आधी..... मिशीला तूप लावताय....
इन्स्पेक्टर : हेच ऐकायचं शिल्लक राहिलं होतं....... एक बेवडा इन्स्पेक्टरला सल्ला देतोय ..गुन्हेगारांना पकडा.
बेवडा : मी भारताचा नागरीक आहे.... नागरी समस्येवर आवाज उठवणं माझं कर्तव्य आहे. मग भले बेवडा असो की केवडा.....( खरा खरा खाजवतोय)
इन्स्पेक्टर : केवढा खरा बोलतोस तू??? आता खरा खरा खाजवणं थांबव, तो पर्यंत मी खर्याक खर्या. गुंडाला पकडून येतो...
(इन्स्पेक्टर ताड ताड चालत विंगेत निघून जातो )
बेवडा :बघा लोक हो.....
जग हे किती विचित्र आहे
जागो जागी चित्र-विचित्र लोक जमलेले आहेत..
तुमच्यातल्या काही जणांनी चित्र-विचित्र पोषाख केलेला आहे.चित्र-विचित्र आवाज काढत लोक एकमेकांशी बोलत आहेत....
हे चित्र-विचित्र आवाजकुणी तोंडातून काढत आहेत... तर कुणी.......

(इतक्यात शु स्शुआ अशी शीळघालत गुंड प्रवेशतो.....)
गुंड : हम्म्म्म.... कॉलेज सुटायची वेळ झाली..... आता नव्या नव्या आयटम येथून येतील.... आपण आपलं दबा धरुन बसावं.
बेवडा : आता बसावं की हसावं? म्हणजे रडावं की हसावं? केस पिकून गळ्यात आलेत आणि हा माणूस मुलींना छेडायला आलाय.... काय म्हणावं या म्हातार्यारला?
गुंड : म्हातारा कुणाला बोलतोस? अभी तो मै जवान हू.
हर जेब मे नई लडकी ले कर घूमता हू
हर पल हसीनाओंको चूमता हू

बेवडा : काही चुकलं तर नाही ना? हर पल हसीनओंके जूतोंको चूमता हू.. असं मला ऐकायला आलं
गुंड : अरे बेवड्या, हसीनके जूतोंको चूमने मे भी जन्नत का मजा होता है....तुम क्या जानो?
गाढवाला गुळाची चव काय?
बेवडा : गाढवाला गुळाची चव काय? नक्की गुळाचीच बोललास ना की गू......
गुंड : हो हो.. गुळाचीच बोललो.... तुला मुद्द्याचं नेमकं ऐकायला येत नाही.
बेवडा : कारण आपण इंग्लीशशिवाय काही घेत नाही.
गुंड :सारख्या दारुच्याच वार्ता .... दारुशिवाय सुद्धा जगात नशा येते..... मित्रा....
रोझी,ज्युली,करीना,कॅटरीना,रानी....मल्लिका....
बेवडा : उनकेपीछे लगा है ये कुत्ता गल्ली का?
गुंड : कुत्ता बोल नाही तर भेडिया बोल.... सुंदर सुंदर पोरींना छेडलं नाही तर ही जवानी काय कामाची? स्त्रीला बनविलंच आहे देवाने पुरुषाच्या सेवेसाठी.....
अनादी काळापासून ‘’स्त्री’’ ही एक भोगवस्तू आहे...स्त्रीच्या नुसत्या उपस्थितीने वातावरणात चैतन्य निर्माण होतं....सगळ्या नजरा तिकडे वळतात...हृदये धाड्धाड वाजू लागतात...तिच्याशी बोलायला मिळावं,तिच्या अंगाला स्पर्श करायला मिळावा म्हणून माणूस काहीही करायला तयार होतो..... बघ नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला....

बेवडा : तुझा काटाच काढायला पाहिजे
तुझ्या मनात स्त्री म्हणजे एक भोग वस्तू आहे.... पण हे विसरू नकोस की माणूस आणि जनावरात संस्कृती/ संस्कारांचा फरक आहे......
तुला जन्म देणारी आई.......एक स्त्रीच आहे
तुझ्या हातावर राखी बांधणारी बहीण...... एक स्त्रीच आहे
तुला शाळेत गमभन शिकवणारी शिक्षिका ......एक स्त्रीच आहे
तुझ्या मुलांना जन्म देणारी तुझी अर्धांगी....... एक स्त्रीच आहे
शिक्षिका,नर्स,डॉक्टर,आई,बहीण.,मुलगी...किती किती सोशिक भूमिकांतून ही स्त्री समोर येते.... पप्पा पप्पा करत बोबडे बोलणारे आपली मुलगी एक स्त्रीच असते .. आणि...

आणि तुझ्यासारखे नराधम.....
10 वर्षाच्या बालिकेपासून 65 वर्षाच्या वृद्धेवर अमानुष अत्याचार करायला कमी करत नाही... तुझ्यासारख्या विचारांच्या माणसांनी हा समाज भरल्यामुळेच आज महिला असुरक्षित आहेत ... शाळा,कॉलेज,स्टेशन,बस-स्टॅंड,रस्ता,कॅंटीन...कुठे-कुठे महिला सुरक्षित नाहीत. सगळीकडे तुझ्यासारखे गिधाड टपून बसलेले असतात.... एकटी दिसली की केलीच शिकार.... पण....पण आता मी तुला सोडणार नाही....तुला जेलमधेच टाकतो.... चल...

( बेवडा गुंडाला घेवून पकडून जायला लागतो )
गुंड: अरे..मी काय केलं?? सोड..सोड..
इन्स्पेक्टर:राठोड...गावठी राठोड........
बेवडा : गावठी राठोड....तुझ्या एरियात छेडछाडीचे एवढे प्रकार घडताहेत आणि तू मिशीला तूप लावत फिरतोस?
इन्स्पेक्टर : माझ्याशी असल्या आवाजात बोलतोस??? आवाज तर ओळखीचा वाटतोय????? बेवड्याच्या तोंडून छम छम ऐवजी दे दना दन???
बेवडा : कारण मी आहे,एसीपी प्रद्युमन....... कमिशनर साहेबांनी मुद्दाम मला या एरियात पाठवलं कारण त्यांना माहीत होतं..... इस एरिया मे कुछ तो गडबड है.....
इन्स्पेक्टर : ए ए ए ए एसीपी प्रद्युमन.....
गावठी राठोड रिपोर्टिंग सर,….
बेवडा : दिवसा ढवळ्या भगिनींना छेडण्याचे प्रकार होताहेत
सुनसान रस्त्यावर गॅंगरेप होताहेत
मुलींनी रस्त्याने चालायची सोय नाही उरली
आणि तू मिशीला तूप लावत फिरतोस? चल... या गुंडाला पकड...पंचनामा,एफआयआर,रीमांड सगळं रीतसरहोवून जावूदे
उद्याच्या पेपरात परत एकदा एसीपी प्रद्युमनचा फोटो यायला पायजे...काय?
इन्स्पेक्टर : हवालदार.... त्या मुलीला बोलवा.... तिची फिर्याद नोंदवून घेतो आणि असे सेक्शन टाकतो की या गुंडाची नांगीच ठेचली गेली पाहिजे.

( मुलगी येते )
बेवडा : मुली हा बघ हाच तो गुंड ज्याने तुला शिट्टी मारून छेडलं होतं...आम्ही याला पकडलंय... याच्या विरुद्ध तक्रार नोंदव.... आम्ही पुढची कारवाई त्वरीत करतो....... आणी लोक हो आपण सुद्धा आज पुढे येवून एकत्रित रीत्या या प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे........

ये मुली .. अशी पुढे ये .. हाच तो गुंड ज्याने तुला शिट्टी मारली होती.
मुलगी : ( कानातले इअरफोन काढून )... शिट्टी मारली? कुणी? कधी?
अहो मी तर काहीच नाही ऐकलं..... मी आपली मोबाईलवर गाणी ऐकत होते....

बेवडा आणि इन्स्पेक्टर धाडकन खाली कोसळतात.... गुंड हसायला लागतो.....

-------- समाप्त ----------

--डॉ.कैलास गायकवाड.

( नवी मुंबई मनपा वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेत सादर केलं जाणारं स्कीट )

हे स्कीट सालाबादप्रमाणे चौथ्यांदा पहिले पारितोषिक देऊन गेलं.

From Drop Box

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. Happy