कल्लोळ
सकाळ .. हो तीच नेहेमीची सकाळ .सूर्य उगवल्यानंतरची. कुण्या मोठ्या माणसाने म्हणून ठेवलंय की.. ""There is nothing like morning, afternoon, night. I agree that we created these conventions for convenience but now they have become nothing but a barrier in our mindset." मोठी माणसं म्हणजे ...बरोबर तीच ती ... समाजमान्य यशस्वी.
विन्सेंट वॅन गॉग मोठा होता का? आणि यशस्वी? कि ठार वेडा होता? वेड्या लोकांवर लेख, पुस्तकं, कथा, कविता लिहीणारे लोक.. ते...? ते वेडे की शहाणे? असो.
अशी किती barriers पक्की ठसलेली आहेत आपल्या मनात आणि डोक्यात नक्की? अगदी काळ्या दगडावरची रेघ म्हणा ना. शहाणा वेडा - चांगलं वाईट - नॉर्मल अॅबनॉर्मल सगळ्या सगळ्याच्या अगदी बंद चौकटीत बसणार्या व्याख्या, कुणी केल्यात ह्या?
आणि मी ? मी काय विचार करतीये आत्ता हा? झट्पट आवरुन ऑफिसला आले ते काही अत्यंत महत्वाची कामं संपवायला हवीत म्हणून. महत्वाच्या ईमेल लिहायला हव्यात.
कामात कधी बुडून गेला आणि संपला दिवस कळलं सुद्धा नाही ! दिवसभर काम असतं म्ह्णून किती बरं असतं ना ? म्हणजे विचार वगैरे करायला वेळ नसला कि एकंदरीत मस्त असतं.
दार उघडून घरात गेल्यावर अगदी रिलॅक्स वाटलं नेहेमीसारखंच. ऑफिसच्या वातावरणाचं, औपचारीकतेचं दडपण... मणामणाचं ओझंच उतरलं.
सोफ्यावर बसून जरा वेळ होतो न होतो तोच..विचार कसे कुठून मनाचा ताबा घेतात कोण जाणे
------------
आत अगदी आत खूप खोलवर दडलेल्या त्या कल्लोळाचा आवाज अगदी आत्ताही स्पष्टपणेच ऐकू येतोय. दोन्ही हात कानावर घट्ट दाबून धरुन पाहीलं. त्याचा काही उपयोग नाहीये. मग हा टीव्ही मोठ्या आवाजात लावून पाहावा. काय लागलंय नक्की?
ती कोण बाई आहे ती त्या दुसर्या लोकांवर बंदूक रोखून का बरं उभी आहे?... बीप...
सलमान खान नाचतोय ढिंकचिका.."जीनेके लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे.. मुस्कुराओ तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे" हे कुठलं गाणं ऐकू येतंय आणि का ते? ...बीप....
खबर दिनभर..दिवसरात्र काहीना काही घडतंय.. हो घडतंय ना.. माझ्या या छोट्याश्या डोक्यात इतकं काय काय घडतंय तर जगभरात केवढं कायतरी घडत असणार. पण मी का ऐकू माझ्या डोक्यातला कल्लोळ ऐकायचा नाहीये म्हणुन ना मी काहीतरी करत होते.. ? बीप.. बंद.
बंद अगदी बंद आजूबाजूचे आवाज बंद झाले आणि डोक्यातला कल्लोळ अजूनच जोरात आदळू लागला. बीप..
"दया दरवाजा तोड दो...." ठीक आहे हा आवाज पडत राहू दे कानावर पण यातलं काहीच ऐकू येत नाहीये हे सुद्धा तितकंच खरंय. मी टीव्हीकडे पहातेय पण काय पहातेय? हा माणूस चालत पलिकडे गेला. तुटलेलं दार. घरातला जीना. असंच काहीतरी दिसतंय. अजूनही घालमेल संपत नाहीच. मग लोकर आणि सुई... हे आठ दहा इंच लांब आणि एक दोन इंच रुंद असं काही तरी तयार झालंय. काय झालंय पण? काही झालंय का खरंच...? काय बरं करायचं होतं आपल्याला ? जे करायचं होतं ते बनतंय का नक्की .. कल्लोळ.. ह्या कल्लोळापुढे कसलाच सुत्रबद्ध विचार करता येत नाहीये. हात उसवलेली लोकर गुंडाळताहेत. ..तिकडे टीव्हीवर एक माणूस पळतोय त्याच्यामागे अजून दोन तीन..
हा कल्लोळ कधीपासून राहतोय माझ्यात? अनेकानेक प्रश्नांचा, सगळ्यासगळ्याविरुद्ध बंड करण्याचा, प्रचंड स्फोटक अशा कशाच्यातरी रागाचा, स्वतःचा आणि सगळ्या सगळ्याचा विनाश करुन घ्यावा वाट्णार्या खूप आतून येणार्या उमाळ्याचा, सगळ्या बंधनांना झुगारुन देण्याचा,,काढून टाका अगदी सगळं सगळं काढून टाका डोक्यातून मी कोण आहे? का आहे? माझं नाव पत्ता सगळं सगळं काढून टाकलंत ना तरी चालेल पण थांबवा हा सगळा कल्लोळ थांबवा.
बीप..
"तुमको देखा तो ये खयाल आया जिंदगी धुप तुम घना साया" चालू द्या..
/*****
बीप..
मस्त हसरं असं घर .. माझं आणि त्याचं. तो अजिबात कुठल्याही सिनेमातल्या हिरोसारखा दिसत नाहीये. अगदीच सदाशिव पेठी ब्राह्मणासारखा, साधा सरळ.. या साधे सरळपणात पण एक गोड प्रेमळपणा दडलाय. त्याची नजर अगदी खोल खोल मनाचा ठाव घेणारी. मी न बोलताचा खूप काय काय कळत असतं त्याला ते मला कळतंय त्याने न सांगतासुद्धा आणि त्याचं बोलणं तेच हळूवार, हसरं कुणालाही दुखावू नये असं
******/
बीप..
"हम जिसे गुनगुना नही सकते वक्त ने ऐसा गीत क्यूं गाया"
असेच जात राहतात दिवस... सगळेच दिवस अर्धे शहाणे आणि अर्धे वेडे असतात. सगळेच दिवस सगळीच माणसं... त्याला हा वेडा वाटतो आणि ह्याला तो. खरं म्हणजे ना, मी कशी आहे ते माहीत नाही पण मी जशी आहे तशीच असायला आणि दिसायला हवीये मी मला. पण ते चालत नाही. का ? यातूनच मग सुरू होतो एक निराळा प्रवास.. आपलं वेगळेपण लपवण्याचा. एखाद्या समूहाचा भाग बनण्याची त्यांच्यासारखंच आपण आहोत हे सिद्ध करण्याची प्रचंड गरजच निर्माण होते. अमकी संस्था तमके बाबा .. किंवा कशावरही श्रद्धा ठेवण्याच्या पलिकडे गेलेला कुणी असेल तर कुणी चक्क मानसोपचार तज्ञाला गाठतो. काय सांगायचं जाऊन डॉक्टरांना
/*****
बीप
डॉक्टर मला काम करता करता ऑफिसमधे मोकळ्या आवाजात मस्त गाणं म्हणावासं वाटतं आणि मी असं गाणं म्हणलं तर बा़की सगळे एकदम विचित्र पद्धतीने बघायला लागतात माझ्याकडे
ओके काही प्रॉब्लेम नाही. या गोळ्या घ्या एकदम बंद होईल तुमचं गाणं म्हणाव असं वाटणं
मला नं मनात येईल तेव्हा मनात येईल ते कपडे घालावेसे वाटतात म्हणजे बघा काठापदराच्या सिल्कच्या साड्या लग्नसमारंभातच का घालायच्या? मी असे छान कपडे घालून आवरुन गेले ना तर सगळे विचारत राहतात दिवसभर "काय आहे आज?" विचित्रच वाटतं एकंदरीत त्यांच्या नजरेतूनही कळतं.
ओके नो प्रॉब्लेम ह्या गोळ्या घ्या तुम्हाला अजिबात काही वेगळं करावसं वाटणार नाही. अगदी कळपातलेच होऊन जाल तुम्ही.
तुमचा वेगळेपणा लपवायचाय? मग आम्हाला भेटा किंवा संपर्क करा ८८३०२९४७९२४८ या क्रमांकावर.. तुमच्यातले सर्व बिघाड दुरुस्त करण्याची १००% हमी.
/*****
एखादं बिघडलेलं यंत्र दुरूस्त करावं ना तशीच कळपापासून वेगळी दिसणारी, वागणारी ही सगळी माणसं आहेत ना त्या सगळ्यांनाच दुरुस्तीला टाकलं पाहीजे. सगळे एकसारखे झाले ना की मग सगळे प्रश्न संपले. एकमेकांना नावं ठेवणं संपलं. आवड नावड संपली. एकमेकांना एकमेकांची वाटणारी भिती संपली. कुणाकुणाला असुरक्षित वाटायला नको.
पण मला माझ्यासारखंच रहायला हवं असेल तर? तर मग ही सगळी घुसमट रोज होत राहणारी. चित्रविचित्र नजरा, प्रश्न अश्या सगळ्याला तोंड देत रहायचं. कुणाकुणाला सहन होणारी आणि कुणाला न सहन होणारी..
-------------
या समुद्राजवळ आल्यावर बरं वाटतंय. किती आपलासा वाटतो हा? याच्यातही कायमचा एक कल्लोळ राहतोय. त्याचा रौद्र आणि घनगंभीर असं मिश्रण असलेला हा आवाज ... एकाच वेळी त्याच्यातल्या कल्लोळाची आणि परिपक्वतेची जाणीव करुन देणारा. समुद्र वेगळा आहे.. अगदी वेगळा त्याला पण त्रास होतोय का त्याच्या वेगळेपणाचा? कि त्याची भव्यता त्याच्या वेगळेपणावर मात करुन जाते?
समोर कल्लोळ आणि एक कल्लोळ माझ्या आतही दोन्ही एकमेकांपासून दूर आणि तरीही मनाने किती तरी जवळ.
कल्लोळ कल्लोळात मिसळून गेला तेव्हा मग एकच रौद्र आणि घनगंभीर आवाज आसमंतात भरुन राहीला होता.
अप्रतिम लिहिलयंत...... खूप
अप्रतिम लिहिलयंत...... खूप आवडलं, खरतर माझ्या मनातलेच विचार कोणी मांडतय की काय असं वाटलं
असेच जात राहतात दिवस... सगळेच दिवस अर्धे शहाणे आणि अर्धे वेडे असतात. सगळेच दिवस सगळीच माणसं... त्याला हा वेडा वाटतो आणि ह्याला >>>>> मस्त!
खरं म्हणजे ना, मी कशी आहे ते माहीत नाही पण मी जशी आहे तशीच असायला आणि दिसायला हवीये मी मला. पण ते चालत नाही. का ?>>>> ये ब्बात!
खूप आवडलं...
मनापासून लिहीलंयस जसंच्या तसं
मनापासून लिहीलंयस जसंच्या तसं म्हणून जास्त आवडलं.
१ नंबर लिहिलय्स..
१ नंबर लिहिलय्स..
प्रतिसाद काय आहे त्याबद्दल
प्रतिसाद काय आहे त्याबद्दल कमी आणि प्रतिसाद दिल्याबद्दल खूप जास्त धन्यवाद.
लिहून झालं तेव्हा वाटलं की हे वाचून लोकांना वाटेल की हे काहीतरी खूप निराशावादी लिहंलंय वेड्यासारखं... किंवा कदाचित विस्कळीत आणि न कळणारं.. असंही वाटलं की का लिहीलंय असं वाटेल .. किंवा बळंच लिहायचं म्हणून लिहीलंय.
लिहीण्यामागचं खरं कारण मनात जे खूप दिवस खूप वेळा येऊन जातं साठून राहतं ते बाहेर काढून टाकायचं होतं. इतर कुणाला असं वाटतं का हे कळावं हा विचारही होताच. अशा लिखाणावर कुणी काही प्रतिक्रीयाच देणार नाही असंही वाटलं होतं.
असो. प्रतिक्रीया वाचून फार बरं वाटलं.
कल्लोळ छान शब्दांकीत केला
कल्लोळ छान शब्दांकीत केला आहेस..
खूप आवडलं गं.
खूप आवडलं गं.
विस्कळीत पण त्यामुळेच कदाचित
विस्कळीत पण त्यामुळेच कदाचित नीट पोचतंय...
एखादं बिघडलेलं यंत्र दुरूस्त
एखादं बिघडलेलं यंत्र दुरूस्त करावं ना तशीच कळपापासून वेगळी दिसणारी, वागणारी ही सगळी माणसं आहेत ना त्या सगळ्यांनाच दुरुस्तीला टाकलं पाहीजे. >>>>> उद्धृत (कोट) करावी अशी खूप वाक्ये आहेत इथे...
पण शेवटचा परिच्छेद एकदम कळसच.....
तगमग अगदी आतून व्यक्त झालीये. सरळ पोचतेच अंतरात.
मीन्वाज्जी, मस्त लिहिलं आहे
मीन्वाज्जी,
मस्त लिहिलं आहे तुम्ही
वाटतं ना बर्याच वेळा वाटतं
वाटतं ना बर्याच वेळा वाटतं
अगदी मस्त उतरलय
खूप प्रामाणिक आणि आतून आलेलं
खूप प्रामाणिक आणि आतून आलेलं लिखाण. पोचलं आणि आवडलं.
सही!
सही!
सुंदर लिहिलंय... अगदी
सुंदर लिहिलंय... अगदी मनापासून
मस्त लिहिलयस मीनू, लिहित
मस्त लिहिलयस मीनू, लिहित रहायला हवयस पण हे असं कधीतरी एखादा लेख, नै चलेगा यार
खूप आतून अन अतिशय सच्चे
खूप आतून अन अतिशय सच्चे लिखाण. खूप आवडलं
खूप छान आणि सच्चं (एकदम 'दिल
खूप छान आणि सच्चं (एकदम 'दिल से' म्हणतात त्या टाईप्स!) वाटलं लिखाण!
कल्लोळ आवडला, पटला, भावला.