तो अश्रूंचा ऋतू होता..

Submitted by भारती.. on 12 December, 2012 - 02:05

तो अश्रूंचा ऋतू होता..
.
तो अश्रूंचा ऋतू होता ती घटिका प्रलयाची होती
रुतला काळाचा फाळ जिथे ती भूमी हृदयाची होती

आभार तुझे आघात नवे तू दिलेस प्रीती राखाया
मी न म्हणाले ''विपरित रीती माझ्या सखयाची होती''

संभाषण-ध्वनी खणखणती कोलाहल नित्याचा नांदे
हरवला हृदयसंवाद ! अशी ती जादू रुपयाची होती

जाळले जिवंतच त्याला मग कार्यालयही पेटवून दिले
अन म्हणे राजदूताला कायम ग्वाही अभयाची होती

थकले शरीर-मन स्नेहाने तेव्हा मदतीचा हात दिला
धनदौलत आयुष्याची सोबत सुहृदा-सदयाची होती

ती होती दासांची शक्ती अन ज्ञानेशांची सुंदरता
साध्या सत्वाची भाषा पण नामदेव-तुकयाची होती

ज्या वेळेला निश्चित झाले की हरले मी सर्वस्वाने
ती वेळा मुक्तीची होती ती वेळा विजयाची होती

आसमंत काजळला होता अंतरंग तळमळले भारती
..उघडले नेत्र तेव्हा क्षितिजावर आभा उदयाची होती

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला आणि विजयाची हे शेर छान.

लयीचा काहीतरी गोंधळ असल्यासारखे वाटले पण. पुन्हा वाचतो.

धन्स विदिपा, चु.भू.द्या.घ्या. :)) तुम्हा सर्वांच्या सहवासाचा परिणाम म्हणून या रचना येताहेत.. गझल ही माझी वृत्ती नाही.लय मला ठीक वाटतेय, मात्रा मोजल्या नाहीत !

तो अश्रूंचा ऋतू होता ती घटिका प्रलयाची होती = ३१
रुतला काळाचा फाळ जिथे ती भूमी हृदयाची होती = ३२

बाकी चेक नाही केले, सहजच चर्चा करतो आहे. चुका काढण्याचा वगैरे उद्देश नाही. कृपया गैरसमज नसावा.

अन्तर्मुख करणारी गझल मीटर खूप आवडले
खयाल + कवाफी~रदीफ , मस्त
वृत्त एकादुसर्‍या मात्रेने पुढेमागे हालत राहते काही जागी पण थोडी जुळवाजुळव केली की जमून जाईल
अभिनन्दन भारतीताई

शब्दकळा अत्यन्त सुन्दर !! ....गझलेत अशी शब्दकळा मी तरी आभावानेच पाहिली आहे ..अभिनंदन व धन्स !!

ती होती दासांची शक्ती अन ज्ञानेशांची सुंदरता
साध्या सत्वाची भाषा पण नामदेव-तुकयाची होती
>>>>>>>या विषयावर आपण एकदा बोललो होतो ते स्मरते आहे तुमचा हा विचार शेर होण्याआधीच माझ्यापर्यंत पोचला होता असे वाटून आनंद होतो आहे

वाह!! खूप अर्थपूर्ण... अनेक ठिकाणी अत्युच्च पातळीचा आशय !

मात्रांची गडबड आहेच मात्र !

मी विचार करतो आहे... किरकोळ बदल केल्यास चपखल बसेल असं वाटतं.

तंत्राबद्दल वरील बहुतेकांशी सहमतच! त्याशिवाय, गझलेच्या भाषेचा बाज हा (हा नियमबियम नाही, पण एक आपला पाळला गेलेला संकेत म्हणता यावा) काहीसा सहज सुलभ, थेट पोचणारा असा असतो असे आढळते. या रचनेतील खयाल सुंदर व नवीन आहेत, मात्र तंत्राबरोबरच ते खयाल अधिक थेट होतील असे काही करता येईल का असे मनात आले.

पण एकुण रचनेतील वैचारीक परिपक्वता नेहमीप्रमाणे स्पष्टपणे पोचलीच. पु ले शु.

-'बेफिकीर'!

विदिपा, गैरसमज अजिबात नाहीत. तुम्हा सातत्याने सुंदर गझल लिहिणार्‍यांचे खूप कौतुक.तुम्हाला अधिकारच आहे.
वैभव, तुम्हाला आवडली म्हणजे नक्कीच बरी लिहिलीय मी.
रसप, सांगा ना किरकोळ बदल.
बेफिकीर, धन्स पुनश्च, खयालांमधली तुम्हाला जाणवलेली अस्पष्टता हा माझा शैलीविशेष असावा.. गुण किंवा दोष, काहीही .कदाचित ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेशी खेळण्याची माझी पद्धत. जाणतेपणी हे बदलता येतील का, बदलणे इष्ट का असे काही प्रयोग करावे लागतील.

संपूर्ण रचनाच सुंदर.
पण
ज्या वेळेला निश्चित झाले की हरले मी सर्वस्वाने
ती वेळा मुक्तीची होती ती वेळा विजयाची होती >>>> हे फार म्हणजे फारच आवडले.