परका (भाग २)

Submitted by चौकट राजा on 4 December, 2012 - 17:17

>>http://www.maayboli.com/node/39477

वरून पुढे चालु
*****************************************************

वा! आज जरा लवकर बाहेर पडता आलं ते बरं झालं. बसला गर्दी पण नाहीये. घरी जरा लवकर पोचेन. संध्याकाळी नेहाला हिंडायला घेऊन जाता येईल. सारखी तक्रार करत असते, लग्नानंतर तुझा सगळा रोमँटिकपणा गायब झालाय म्हणून. आता कसं समजवायचं तिला.. मी काही टाटा बिर्लांचा मुलगा नाही, साधा मध्यमवर्गीय माणूस आहे. लग्नाआधी वेगळं होतं. आता एकट्याच्या पगारात घर चालवताना वाट लागतीये. रोमँटिकपणामधला र पण सुचत नाही.

तशी ती खूप समजूतदार आहे पण मूळची माहेरी श्रीमंती असल्यामुळे सवयी जरा खर्चिकच आहेत बाईंच्या. त्यामुळे अधूनमधून हौशी मौजी कराव्या लागतात, नाहीतर रूसून बसतात मॅडम. तरी लग्ना आधी मी सांगीतलं होतं, कि आम्हाला कुठल्याही गोष्टीची आधी वाट बघावी लागते. दुकानात काहीतरी दिसलं, आवडलं आणि लगेच घेऊन टाकलं असं कधी झालच नाही. आधी किंमत बघायची, मग गरज आहे का असा विचार करायचा आणि नसली गरज तर 'नंतर बघू' म्हणायचं आणि रोज येता जाता शोकेस मधे बघून समाधान मानायचं. मग कधी सेल लागला, बोनस मिळाला कि खरेदीचा मुहुर्त लावायचा. नेहमी हे असचं होत आलं. पण तिचं तसं नाही. मनात आलेलं नेहमी सहज मिळत गेलं... अगदी मी सुद्धा!

आता वाटतं, कसा काय आवडलो मी तिला देव जाणे. तसा कॉलेजात मी काही फेमस वगैरे नव्हतो. माझ्याकडे गावभर फिरवायला बाईक नव्हती आणि येता जाता कँटिनमधे घालवायला पैसे आणि वेळही नव्हता. दिसायलाही मी काही राजबिंडा वगैरे नव्हतो. जरा थोड्याफार कविता करायचो. त्यामुळेच तर आर्ट सर्कलमधे आमची ओळख झाली. तिचा लाघवी स्वभाव मला फार आवडला. मग ओळख वाढत गेली. तिला प्रपोज केलं तेव्हा वचन दिलं होतं मी "तुला कधी काही कमी पडू देणार नाही." तिनीपण वडिलांच्या मर्जी विरुद्ध जाऊन माझ्याशी लग्न केलं.

तेव्हा अंगात रग होती, मनगटात जोर होता, जग जिंकून दाखवायचा आत्मविश्वास होता. पण गेल्या तीन वर्षात बाबांचं आजारपण, मग रिसेशन आणि महागाई ह्यांनी पाय जमीनीवर आणले. नवीन संसार थाटल्यावर 'आटे दाल के भाव' कळाले. जुन्या वाड्याची बिल्डींग करायचा घाट घातला पण बिल्डरचा धंदा बसल्यामुळे तेही रखडलयं. उगाच भाड्याच्या घराचे पैसे द्यावे लागतायत. तसही तो वाडा पडायलाच आला होता. सहा आठ महियात म्युनिसिपालिटी पाडणारच होती. पण आता सगळं नुसतच ठप्प आहे. तीन महिन्याचं घराचं भाडं थकलयं. तो घरमालक रोज जीव खातोय. त्या नालायकाला लीज रिन्यु करायच्या वेळेस किती विनंती केली होती. तरीही त्यानी भाडं वाढवलच. परिस्थितिचा फायदा घेतोय हरामखोर. आणायचे कुठून एवढे पैसे आता?

तरी बरं नेहा घरचं सगळं बघतीये. नाहीतर कोण बघणार म्हणा? आई तर आता खूप थकलीये. तिचे गुढघे एवढे दुखतात कि चार पावलं पण चालवत नाही. तरीही पैसे खर्च होतील म्हणून डॉक्टरकडे जायला तयार नाहीये ती. बाबांच्या आजारपणातही नेहानीच बाबांचं खूप केलं. त्या आजारपणानी घराची पार दुर्दशा केली. तरी मी बाबांना सांगत होतो कि बरं पॅकेज मिळतय तेव्हाच व्हि आर एस घ्या. पण ते अजून चांगल्या पॅकेजसाठी थांबले आणि नोकरी घालवून बसले. कोर्ट कचेर्‍यांनी नुसता खिसा हलका केला. हातात काहिच लागलं नाही. आणि मग आलेलं ते आजारपण त्यांना शेवटपर्यंत पुरलं. मला कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मिळेल ती पहिली नोकरी घ्यावी लागली. पगार बेताचाच आहे पण ह्या रिसेशन मधे नोकरी आहे हे काही कमी नाही. अंत्या, नर्‍या आणि रघ्याला तर नोकरीही नाहिये. पण पगाराचे पैसे काही पुरत नाहीत. मी विकेंडला पार्ट टाईम नोकरी केली तर? परवा देशमाने म्हणत होता त्याला एक व्हेकन्सी माहिती आहे म्हणून. त्याला विचारलं पाहिजे. पण नेहाला सांगितलं तर रुसून बसेल. विकेंडलाच काय तो थोडा वेळ मिळतो आम्हाला एकमेकांबरोबर.

कसं निभावून नेलं असेल तिनी हे सगळं? तिच्या माहेर आणि सासर मधे जमीन अस्मानाचं अंतर आहे. ह्याआधी कधी तिला एवढ्या अ‍ॅडजस्ट्मेंटस करायलाच लागल्या नव्हत्या. हौस मौज करायच्या वयात घरातली आजारपणं, जबाबदर्‍या आणि टेन्शनस घेऊन बसली आहे बिचारी. कधी काही हवंसं वाटलं तर मला नाही तर कोणाला सांगणार ती? आणि केला थोडा हट्ट माझ्याकडे तर काय बिघडलं? मागच्या शनिवारी असच पिक्चरला जाऊ म्हणत होती. आता हल्ली पिक्चरला जायचं म्हण्जे २५० तर नुसते तिकिटांवर जातात. खाण्यापिण्यावर अजून वेगळेच. तिला नाही म्हणताना माझी चिडचिडच झाली जरा. बिचारीला वाटलं मी तिच्यावरच चिडलोय. पण तो वैताग परिस्थितीवरचा होता ग.
बास..देशमानेला त्या पार्ट टाईम जॉब बद्दल विचारलच पाहिजे. तेवढेच दोन तीन हजार...

"अहो कंडक्टर, थांबा.. हा माझा स्टॉप आहे."

"मग माग बसून झोपा काय काढताय? आम्हाला काय स्वप्न पडणार आहे का तुम्हाला इथे उतरायचय म्हणून?" कंडक्टर गुरकावला.

"सॉरी..."

हल्ली हे असं फार होतं माझं. एकाला एक विचार लागत जातो आणि तंद्री लागते. आजुबाजुचं काही भानच रहात नाही. तरी बरं वेळेत लक्षात आलं. नाहीतर पुढच्या स्टॉपवरून उलटं चालत यायला लागलं असतं. तेवढ्यात शेजारी माटे आजी दिसल्या..

"आजी, द्या मी घेतो त्या पिशव्या."

"तुम्ही?..परत आलात?"

"अहो आज जरा लवकर निघायला जमलं म्हणून लवकर आलो."

"अहो पण..."

"द्या हो.. आणि आजी, ह्या पिशव्यांबद्दल दोन श्रीखंडाच्या गोळ्या घेणार बरं का मी. दोन मजले चढवायच्या आहेत त्या!" मी हसत म्हणालो. त्या काहीच बोलल्या नाहीत.

हे माझं आणि आजींचं जुनं डिल आहे. कामांच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळया. आई म्हणते "काय पण लहान मुलांसारखा करतोस." पण मला आवडतात त्या गोळ्या आणि आजींनापण बरं वाटतं मला असलं काहीतरी देऊन.

आम्ही आजींच्या घरी आलो. दरवाजा उघडाच होता. मी पिशव्या आत नेऊन ठेवल्या. आजोबा हॉल मधे पेपर वाचत बसले होते.

"काय आजोबा, ह्या मॅचमधे तरी सचिन करणार का सेंच्युरी?"

आजोबांनी पेपर खाली करून बघितलं आणि त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य पसरलं. आजी पण त्यांच्या शेजारी येऊन उभ्या होत्या.

"तुम्ही परत आलात?"

"म्हणजे? अहो आज जरा लवकर आलोय मी घरी. नेहमी यायला ७.३० होऊन जातात. आज जरा लवकर बाहेर पडलो."

"तुम्ही जरा बसता का इथे?" आजोबांच्या स्वरात एक अनोळखी भाव होता.

"काय झालं आजोबा? काही प्रॉब्लेम आहे का?"

"तुम्ही हे असे परत परत का येता इथे? कृपया हे बंद करा."

मला कळेना ह्यांना काय म्हणायचय ते. मी त्यांच्या घरी येऊ नये असं म्हणत आहे कि काय हे?

"मी समजलो नाही आजोबा. असं का म्हणताय तुम्ही?"

"अहो हे काय चालवलय तुम्ही? मागच्या आठवड्यात एकदा आला होता तेव्हा अचानक बेशुद्ध पडलात. आम्हाला वाटलं मनोरुग्ण आहत आणि चुकून इथे आला असाल म्हणून तुम्हाला हॉस्पिटल मधे सोडून आलो आम्ही. मग तीन दिवसांपुर्वी शेजारच्या घराचं कुलुप उघडायचा प्रयत्न करत होतात. आमचं दार बंद असलं तरी की होल मधून बघितलं मी. आणि आज आता परत आलाय."

"मी कधी बेशुद्ध पडलो होतो? कधीचं बोलताय हे तुम्ही?"

तेवढ्यात आजी त्यांना म्हणाल्या, "अहो, आज ह्यांनी मला पिशव्या वर आणण्यासाठी श्रीखंडाच्या गोळ्या मागितल्या."

आजोबा गंभीरपणे म्हणाले, "हे बघा, तुम्ही सभ्य दिसताय म्हणून तुम्हाला असं शांतपणे सांगतोय. पोलीसात जायची वेळ आणू नका माझ्यावर."

मला काही कळेना.

"हे काय बोलताय तुम्ही आजोबा?"

"तुम्हीच आठवून बघा जरा. या आता."

मला काही म्हणजे काही कळेना. मी त्यांच्याकडून तसाच बाहेर पडलो आणि माझ्या घराशी आलो तर दाराला कुलुप. एवढी चिडचिड झाली माझी. तसाच खाली उतरलो आणि पार्ककडे निघालो. म्हटलं आई असेल तिथे, तिच्याकडून किल्ली घ्यावी आणि सरळ झोपावं. नेहासुद्धा कुठे उधळली आहे नेमकी आज देव जाणे.

चालता चालता पाठीवर हात पडला म्हणून वळालो तर घरमालक! त्याला बघून मस्तकात तिडिकच गेली माझ्या आणि मी सरळ त्याला थोबाडीत ठेवून दिली. तो पण काही शांत बसणार नव्हता. त्यानीपण मला दोन चार फटके लावले. मग तर मी अजूनच पेटलो. चांगला बुकलला त्याला. मग आरडाओरडा झाला, चार लोक धावत आले, आमची मारामारी सोडवताना त्यातल्या एक दोघानी माझ्यावर हात साफ करून घेतले, कोणीतरी मला मागे खेचताना मी खाली पडलो आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला.

जाग आली तेव्हा मी पोलीस स्टेशन मधे कस्टडीत बसलो होतो आणि समोर बाकावर माटे आजोबा त्या घरमालकाबरोबर बसले होते.

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालू आहे, पुढील भाग पटापट येऊ द्या !!>> +१ Happy

माबोवर सगळ्या सगळ्या कथा लेखकांनी गरगरवायचं ठरवलय काय? वर त्यात क्रमश: च शेपूट Proud भाग लवकर लवकर पोस्टा Happy