परका (भाग १)

Submitted by चौकट राजा on 4 December, 2012 - 13:21

मंडळी, मायबोलीवर कथा लेखनाचा पहिलाच प्रयत्न करतोय. सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

*****************************************************

"विक्या, ए विक्या.."
मागून हाक आली तसं मी वळून बघितलं. आता खरं तर माझं नाव विकी वगैरे नाही , पण हाक ऐकल्यावर बघावसं वाटलं म्हणून बघितलं तर एक पंचवीस तीस वर्ष वयाचा तरूण माझ्याकडेच येत होता.

"काय राव, कुठे गायब आहेस? दोन आठवडे आलाच नाहीस? त्या व्हिसीसी च्या बॉलर्सनी वाट लावली यार आपली. लई मिस केला बघ तुला. तु तर असला धुतला असतास न एकेकाला.... ए हिरो.. हॅलो, काय झालं? असा का बघतोयस?"

"माफ करा, पण मी आपल्याला ओळखलं नाही", मी उत्तरलो.

"काय राव मस्करी करतो? दोन आठवडे भेटलो नाही तर ओळखत नाही म्हणे. हॅ हॅ हॅ.." तो हसायला लागला.

"मस्करी नाही हो. खरच तुम्हाला ओळखत नाही मी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला कोणीतरी दुसरा समजताय तुम्ही."

"काय बॉस, कोणी पोरगी बिरगी आहे का बरोबर? काही प्रॉब्लेम नाही राव! मी काही बघितलच नाही, आपण भेटलोच नाही!!.. वहिनींना काही बोलणार नाही रे आपण" तो डोळे मिचकावत हळूच कानाजवळ येऊन म्हणाला.

"काय बोलताय तुम्ही? कोणी मुलगी वगैरे नाहीये माझ्याबरोबर. आणि ते 'आनंद' मधल्या 'मुरारीलाल' सारखं काहीतरी करत असलात तर तसला फालतूपणा मला आवडत नाही. चला, निघा आपल्या कामाला."

माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत तो निघून गेला. आणि मी बसच्या रांगेत उभा राहिलो. हा माझा रोजचा रस्ता. बिबवेवाडीत माझं ऑफिस आहे. स्वारगेटला बस बदलायची आणि ५.३५ च्या 'कोथरूड डेपो'नी घरी जायचं हे गेली ३ वर्ष करतोय मी. आज पहिल्यांदाच असा कोणीतरी भेटला. असेल कोणीतरी वेडा. चला बस आली...

****************************************************

"आई, विवेक आला का हो?" स्मितानी चपला काढत विचारलं.

"नाही अजून. लायब्ररीत जातो म्हणून बाहेर पडलाय मघाशीच. यायला हवा आता. तू हातपाय धूवून ये. मी चहा टाकते."

"८ वाजून गेले हो आई. आत्तापर्यंत यायला हवा होता. फोन करू का मोबाईल वर?"

"किती काळजी करशील गं? येईल तो. कोपर्‍यावरच तर गेलाय. गेला असेल जरा चक्कर मारायला. कंटाळला होता बघ घरात बसून."

"बरं. आज जेवायला काय करूयात?"

"गवार निवडून ठेवलीये. थोड्या पोळ्या करू. भात आहे दुपारचा. थोडं वरण टाकलं कि झालं."

"गवार? म्हणजे आज साहेब कटकट करणार."

"त्याचं काय जातय कटकट करायला? इथे बाजारात नाहीत वेगळ्या भाज्या. करायचं काय नवीन रोज? चमचाभर साखरांबा वाढ भाजीशेजारी. मग कसा खातो बघ गपचूप सगळं."

"आई तुम्हीपण ना.." स्मिता हसत म्हणाली आणि कणीक मळायला लागली.

*************************************************

"कोण पाहिजे आपल्याला?" माटे आजींच्या प्रश्नानी मी थक्क झालो.

"आजी, असं काय विचारताय? आजोबांचा चष्मा घातलात कि काय आज?" मी हसत म्हणालो. त्या प्रश्नार्थक चेहर्‍यानी त्यांच्या घरात गेल्या.

इकडे माझं कुलूप उघडत नाहीये. दुसरीच कुठलीतरी किल्ली लावतोय का मी? हे कुलूप पण जरा वेगळं दिसतयं. एवढ्यात शेजारी चाहूल लागली म्हणून बघितलं तर माटे आजोबा!

"आजोबा, नेहा किल्ली ठेवून गेलीये का हो? कधी येतीये सांगितलं का तिनी काही? कुलूप नेहमीचं दिसत नाहीये. तिनी बदललेलं दिसतयं. तुम्हाला काही म्हणाली का जाताना?"

आजोबा माझ्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिले. एवढ्यात त्यांच्या पलिकडून तो डोकावला.

"कोण पाहिजे रे?......"

आणि अचानक माझ्या डोक्यातून एक प्रचंड कळ आली. सगळं जग गरगर फिरायला लागलं. एखाद्या खोल खोल खड्यात पडतोय असं वाटायला लागलं. माझी शुद्ध हरपते आहे एवढच मला खाली पडताना जाणवत होतं.

*****************************************************

"विवेक उठला होता का हो आई?"

"नाही गं."

"तुम्ही जाउन या घरी. मी बसते आता."

"अगं, रात्रभर जागी होतीस. आणि दोन तासात जाऊन पण आलीस? अजून थोड्या वेळानी आली असतीस तरी चाललं असतं."

"घरी गेले तरी चैन पडेना म्हणून आले परत."

"बर बर, इथेच पड मग जरा. डॉक्टर येतीलच इतक्यात राउंडला. अगोबाई, उठला गं हा.."

विवेकनी डोळे उघडले तेव्हा तो घरात नाही हे त्याला पहिलं जाणवलं.

मान दुसरीकडे वळवली तर स्मिता आणि आई जवळच उभ्या होत्या.

"कसं वाटतयं आता?" स्मिताने प्रेमानी विचारलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं.

"काय झालं? हॉस्पिटलमधे का आहोत आपण?"

"तुला काहिच आठवत नाहिये का रे?" तिच्या स्वरात काळजी होती.

"नाही गं. असा किती वेळ झोपलो होतो मी? मघाशी लायब्ररी मधे वाचता वाचता अगदी पेंग यायला लागली म्हणून जरा डोळे मिटून पडलो होतो. तर काय लोकांनी उचलून मला हॉस्पीटल मधे आणलं? काय चाललयं हे?"

आईंनी हात जोडून हवेत नमस्कार केला आणि पदरानी डोळे पुसले.

"आई, रडायला काय झालं तुला? स्मिता, मला काही सांगशील कि नाही काय झालय ते?"

"अरे, काल रात्री पोळ्या करत होते तेव्हा इथून, हॉस्पिटल मधून, फोन आला. तुला कोणीतरी अ‍ॅडमिट केल्याचं सांगीतलं. तू लायब्ररी मधे गेल्याला आता २४ तास होऊन गेलेत. तिथून तू कुठे गेला होतास? कोणाबरोबर होतास? बेशुद्ध कसा पडलास? काहिच आठवत नाही का रे तुला?"

"नाही गं. सांगीतलं ना? लायब्ररी मधे वाचता वाचता कंटाळा आला म्हणून जरा डोळे मिटून पडलो होतो. डोळे उघडले तर या इथे आहे."

"गुड इव्हिनिंग मि. देसाई. कसे आहात आता?" डॉक्टर राव खोलीत येत म्हणाले. विवेकच्या चेहर्‍यावर नुसतेच प्रश्नचिन्ह होते.

"फ्रेश दिसताय कि एकदम. गुड गुड. मिसेस देसाई, ह्यांच्या एक दोन टेस्ट करायच्या आहेत. मी सिस्टरला पाठवतो. ती घेऊन जाईल ह्यांना. ह्यांनी काही खाल्लं आहेत का उठल्यापसून?"

"डॉक्टर, का आणलयं मला इथे? काय झालयं मला? कसल्या टेस्ट करताय माझ्या?"

"हम्म.. काल कुठे गेला होतात, काय केलत, काही आठवतय का तुम्हाला?"

"ते आठवत असतं तर तुम्हाला हे विचारलं असतं का मी? आणि जे आठवतय त्याचा आणि आत्ताचा काही संदर्भ लागत नाहिये." आता मात्र विवेक वैतागला होता.

"ओके. सांगतो. काल रात्री तुम्हाला बेशुद्धावस्थेत कोणीतरी इमर्जन्सी मधी आणून सोडलं. कोणी सोडलं, माहिती नाही. कारण ते लगेच निघून गेले. तुमच्या खिशातल्या पाकिटातून तुमचा लायसेन्स मिळाला. त्यावरच्या पत्त्याचा फोन नं. शोधून आम्ही फोन केला आणि तुमच्या मिसेस ना बोलावून घेतलं. तशी काळजी करायचं काही कारण नाही. तुम्हाला कुठे काही लागलेलं नाही आणि सगळे व्हाईटलस पण नॉर्मल आहेत. पण आपण एक दोन टेस्ट करून घेऊ. म्हणजे तुमच्या बेशुद्ध पडण्यामागचं कारण कळेल. मला सांगा, काल काही खाल्याचं आठवतय का? म्हणजे कोणी काही दिलं का तुम्हाला?"

"नाही."

"बर, मग दिवसभर काही न खाता उन्हात फिरत होतात का?"

"नाही"

"मग कुठे डोकं आपटलं, धक्का लागून पडलात वगैरे?"

"नाही हो. घरून लायब्ररीत गेलो, तिथे पुस्तक वाचत होतो आणि आता इथे आहे एवढच आठवतय मला."

"हम्म... कधी कधी होतं असं. शरीर बरेच दिवस ताण तणाव सहन करत असतं आणि एक दिवस अचानक संप पुकारतं. आपण ज्या टेस्ट करणार आहोत त्यात कळेलच असं काही असलं तर. पण काळजी करू नका. काही सिरियस असतं तर आपण असे बोलत नसतो. बर, येतो मी. टेस्टस चे रेपोर्टस आले कि बघू. तोपर्यंत तुम्ही आराम करा." आणि ते निघून गेले.

"स्मिता, जरा खायला काहितरी आणतेस का? भूक लागलीये खूप."

स्मिता आणि आई डबा आणायला गेल्या. आणि विवेक पडल्या पडल्या आठवायचा प्रयत्न करु लागला. काय झालं नक्कि काल?

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे सुरुवात.

फक्त कोणाच्या माध्यमातून घटना घडताहेत हे नक्की असू द्या.

<<<आता मी वैतागलो होतो.>>> आणि <<<आणि विवेक पडल्या पडल्या आठवायचा प्रयत्न करु लागला>>>

सर्व प्रतिसादकांचे आभार. पुढचे भाग लवकरात लवकर टाकेन.

माधव - चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आवश्यक तो बदल केला आहे.