कसे सजावे ? कुठे निघावे ?

Submitted by भारती.. on 4 December, 2012 - 08:48

कसे सजावे ? कुठे निघावे ?

तू अरे विचित्रा परमस्वार्थ ना माझा
की उद्ध्वस्तीची जुनी अनाहत ओढ
तू लळे पुरविसी मम ओठातून अपुले
की आत्मछळाची मला लागली खोड

मी प्रखर रोखली सर्वस्वाची ऊर्जा
अन वैराणातून तुला घातली साद
मी सख्य कल्पिले तुझे कधी शत्रुत्व
तुज समीप समजून स्वतःशीच संवाद

बघ समोर पुस्तक अर्धे उघडे पडले
ओळींतून अस्फुट जरी गवसले काही
ही भाषा माझ्या श्वासांची रहदारी
हृदयाचे स्पंदन रक्ताची लय नाही .

तम भरे भोवती आणिक अंतर्यामी
व्यामिश्र तुझा नक्षत्रव्यूह नि:संग
अणुअणू पालवे फसव्या पर्यायांनी
मी कसे सजावे ? कुठे निघावे? सांग.

भारती बिर्जे डिग्गीकर

('मध्यान्ह' मधून.)

असे काहीसे म्हणायचेय-

ही कविता माझे परमेश्वराशी असलेले तत्कालीन love hate नाते चितारते..
तो कोण आहे ?माझा परमस्वार्थ (परमार्थ कुठला माहीत असतो आपल्याला ) की माझ्या आत्मपीडनाचं एक रूप ? तो माझ्याकडून स्वतःचे लाड करून घेतोय की मी स्वतःला उद्ध्वस्त करतेय त्याच्या अफवेशी झुंजत?
मी माझे सर्वस्व एकवटून त्याला घातलेली साद माझ्या वैराण एकांतात का विरून जाते ?मग मी त्याचे कधी सख्य धरते, कधी शत्रुत्व,परम उत़्कटतेने,त्याला काहीच फरक पडत नाही..त्याला जवळ कल्पून माझे हे असे स्वतःशी संवादणे ..
ही पुस्तके, हे धर्मग्रंथ, शास्त्रे पुराणे मला अंधुकसे काही सांगतात पण ती मला माझ्या अस्तिवाची भाषा वाटत नाही..माझ्या जित्याजागत्या चेतनांना ते शब्द पुरे पडत नाहीत.
भोवताली अन अंतर्यामी काळोख आहे तुला शोधताना दाटलेला अन आकाशात तुझी नि:संग गूढ (व्यामिश्र- आकलनास कठीण ) नक्षत्रलिपी एखाद्या अभेद्य व्यूहासारखी फक्त तुझे अस्तित्व सूचित करतेय.
अणुअणू गजबजलाय तुझ्या फसव्या पर्यायांनी.
मी कसे सजू तुझ्यासाठी ? काय करू म्हणजे तू मिळशील ?
कुठे निघू ? कुठून कुठे असतो हा आत्मशोधाचा प्रवास ?
सांगशील ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या सर्व दु:खांचं निदान फक्त ईश्वर आहे आणि तो तर हाती येत नाही या जाणिवेतून केलेली >>> ह्या तुझ्या वाक्याचा धागा धरुन पुन्हा वाचली तर कळायला सोपी गेली, तू लिहिलेल्या रसग्रहणाकडे न बघताच Happy

Pages