एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे

Submitted by सांजसंध्या on 29 November, 2012 - 12:21

आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे
एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे

शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा
गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे

ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते
विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे

देहात जागणा-या, वणव्यात आग आहे
इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे

ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी
नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे

आशा जरी न होती, ना नांदते निराशा
आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे

संध्या
२९.११.२०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गझल आवडली
मी तुमची गझल आज प्रथमच वाचतोय
तज्ञ लोक काय अजून हवे होते ते सान्गतीलच
तुमच्यातली कवियत्री मात्र जागोजागी दिसते आहे हे खूप आवडले
(कवियत्री अन गझलकारेत काविता अन गझल इतकाच फरक असतो असे मला वाटते)

सांजसंध्या,

गझल चांगली आहे. एव्हढं लांब अंत्ययमक पहिल्यांदा पाहतोय. मी काही गझलेतला दर्दी वगैरे नाहीये बरंका. एक सूचना. शेवटी नोव्हेंबर महिना करा. चुकून डिसेंबर पडलेला दिसतोय.

आ.न.,
-गा.पै.

एव्हढं लांब अंत्ययमक पहिल्यांदा पाहतोय.<<<

तिलकधारींच्या एका गझलेत एकच शब्द काफिया आणि पुढचे पाच शब्द रदीफ होते.

वारले ते!

>>>शेवटी नोव्हेंबर महिना करा. चुकून डिसेंबर पडलेला दिसतोय.<<<

ही आगामी गझल असणार गा मा, डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणार असणार.

सांसं,

नमस्कार, अनेक दिवसांनी आपली गझल वाचली.

'शोधू किती बहाणे' ह्या आकर्षक रदीफेचा मोह किती व्हावा हे सोदाहरण स्पष्ट करणारी गझल वाटली.

कोणता एक शेर कोट करता येत नाहीये
सगळीच गझल अप्रतिम
मला संपुर्ण गझल आवडली अस कधी तरीच होतं
ही मात्र संपुर्ण आवडली

बेफिकीर,

>>>
तिलकधारींच्या एका गझलेत एकच शब्द काफिया आणि पुढचे पाच शब्द रदीफ होते.

वारले ते! <<<

कोण वारले...?
शब्द, काफिया की रदीफ..? Lol

अनामिक गझलवेडा>>> तुम्ही स्वतःचा एक धागा का काढत नाहीत? तिथे हव्या त्या गझलेचे असे चिंतन करा कोणीही काही म्हणणार नाही पण कृपा करून मागचे पाढे पुढे नको. गझल सहजासहजी होत नाही, कितीतरी वेळ आणि बुद्धी खर्च होते, हे आपणही मान्य कराल. मग ज्याने हे केले आहे त्याच्या रचनांखाली हे शब्दछळ करणे आपल्याला का भावते आहे?... तुम्हाला सांगुन उपयोग नाहीच आहे तरीही अंधूक आशा बाळगतो.

..................................................शाम

शामजींशी सहमत

असो
आजची पर्यायी गझल मूळ गझलेपेक्ष नक्कीच छान झाली आहे मला खूप अवड्ली
अभिनंदन देवसर

पुनश्च .....शामजींशी सहमत

मूळ गझलेत असलेली नजाकत, शब्दकळा आणि ध्वनित होणारा एकच एक आशय आणि चिखल तुडवावा तसा दिलेला पर्याय यांची तुलना करण्याच्या भानगडीत पडत नाही. इतकं म्हणून शकेन कि पर्यायीवाल्यांना हा पर्याय असेल तर मूळ पर्यायीवाल्यांनीही इतका भिकार पर्याय दिला नसता Lol

इतरत्र विशेष टिप्पणी होईलच. Wink

माझ्या रचना कशाही असोत त्यावर पर्यायी रचना त्याच धाग्यावर प्लीजच नको. तसेच मूळ रचनेवर प्रतिसाद द्यायचा नसल्यास आग्रह नाही, पण मूळ रचनेची जाणूबुजून उपेक्षा करत पर्यायीवर चर्चा, विशेष टिप्पणी किंवा वादविवादांच दळण माझ्या धाग्यावर नकोच. त्यासाठी वेगळा धागा उघडावा ही नम्र विनंती.

Pages