दुर्दशा माझी बघाया लोटली गर्दी!

Submitted by सतीश देवपूरकर on 29 November, 2012 - 07:51

गझल
दुर्दशा माझी बघाया लोटली गर्दी!
हाक मी देताच सारी पांगली गर्दी!!

थांबले नाही कुणी, मी फोडला टाहो....
प्रेत माझे चालले अन् थांबली गर्दी!

काय थोडे लोक होते प्रेतयात्रेला?
ती पहा रस्त्यात जमली चांगली गर्दी!

मी असे काही खुबीने ढाळले अश्रू.....
हासरा मी वाटलो अन् हासली गर्दी!

मोकळी आहे हवा, ये, बागडू प्रेमा!
संशयाची एकदाची संपली गर्दी!!

मोकळा होईल आता तो पिण्यासाठी.....
भोवतीच्या बेवड्यांची संपली गर्दी!

मैफिलीला शायरांनी लावली वर्णी!
त्यामुळे का होइना पण, भासली गर्दी!!

वाचुनी आपापल्या गझला सटकले ते.....
मैफिलीमधली अखेरी विरळली गर्दी!

तो न घाबरता कुणालाही शिव्या देतो!
त्यामुळे हटकून तेथे दाटली गर्दी!!

बोलताना जोश असतो...होशही असतो!
त्यामुळे त्याने सभेला खेचली गर्दी!!

तो स्वत: गाण्यात इतका रंगला होता!
ऐकताना गीत त्याचे झिंगली गर्दी!!

कोण सरकवणार माघारी प्रथम गाडी?
या अहंकाराच पोटी तुंबली गर्दी!

तो मुसंडी मारणारा एकटा होता!
आज मागोमाग त्याच्या चालली गर्दी!!

आसवांची ओल झिरपू लागली नेत्री!
पापण्यांच्या कुंपणांनी कोंडली गर्दी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा.... सुंदर गझल.

मतला गझलेच्या तुलनेत फारच निष्प्रभ वाटला.

बाकीचे शेर छान.

मी असे काही खुबीने ढाळले अश्रू.....
हासरा मी वाटलो अन् हासली गर्दी!.... क्या बात है..

>>>मोकळी आहे हवा, ये, बागडू प्रेमा!<<
हे असले काहीबाही लिहिता म्हणून त्या देवपूरकरमामी खवळतात.

हाक देता सौख्य माझे पांगली गर्दी.. किंवा ( मम सुखाने हाक देता पांगली गर्दी )
दुर्दशा माझी बघाया,जाहली गर्दी

सतीशजी,
मतल्यासकट
१,२,३,८,९,१० विशेष मजा आली नाही..

आसवांची ओल झिरपू लागली नेत्री!
पापण्यांच्या कुंपणांनी कोंडली गर्दी!!
हा शेर आवडला.

तो मुसंडी मारणारा एकटा होता!
आज मागोमाग त्याच्या चालली गर्दी!!
हा शेरही ताकदवान नाही वाटणार. या शेरात "त्याच्या मागोमाग गर्दी का चालली आहे?" याचा संदर्भ शेरात नाही. "प्रेत" अशा अर्थाने घेतले तरच शेर चांगला वाटेल.

खवटुन्निसाजी!
हे असले काहीबाही देवपूरकर मामींपासून आम्ही चतुरपणे दडवतो! जर त्यांनी असे काही बघितले वा जरा जरी संशय आला तर किमान १/२ दिवस त्यांच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू रहातो व आम्हास तोफेच्या तोंडी जावे लागते.
अतिशय निवडक व अविवाद्य तेच आम्ही त्यांच्या काकदृष्टीस पडू शकेल याची चतुरपणे काळजी घेतो!

>>>

मी असे काही खुबीने ढाळले अश्रू.....
हासरा मी वाटलो अन् हासली गर्दी!

मोकळी आहे हवा, ये, बागडू प्रेमा!
संशयाची एकदाची संपली गर्दी!!

तो मुसंडी मारणारा एकटा होता!
आज मागोमाग त्याच्या चालली गर्दी!!

आसवांची ओल झिरपू लागली नेत्री!
पापण्यांच्या कुंपणांनी कोंडली गर्दी!!

<<<

शेर आवडले.

जोशीजी!
तो मुसंडी मारणारा एकटा होता!
आज मागोमाग त्याच्या चालली गर्दी!!
हा शेरही ताकदवान नाही वाटणार. या शेरात "त्याच्या मागोमाग गर्दी का चालली आहे?" याचा संदर्भ शेरात नाही.
<<<<<<<
मुसंडी मारणे म्हणजे गर्दीतून शिताफीने वाट निर्माण करून पुढे जाणे.
इथे गर्दी कोणत्याही कारणासाठी झालेली असेल! गर्दीतून किंवा गर्दी असून पुढे शिताफीने जावून एखादी गोष्ट साध्य करणे हे मुसंडी मारणे या शब्दातून सूचीत होते.
उदाहरणार्थ इतर समकालीन तथाकथित प्रस्थापित कवींच्या गर्दीतून मुसंडी मारून सुरेश भट व त्यांची गझल ही प्रथितयश झालीच जिला अनेक अनुयायी मिळाले, व आज त्यांनी दाखविलेल्या मार्गावर अनेक मराठी शायर व त्यांची गझल वाटचाल करते आहे.
असा काहीसा अर्थ आम्हास अभिप्रेत आहे या शेरात!
हे एक उदाहरण दिले.
इतर अनेक संदर्भातही हा शेर लागू पडू शकतो.
टीप: न आवडलेल्या शेरांस सुयोग्य पर्यायी शेर द्यावेत, वाचायला आवडतील!

प्रोफेसर साहेब, तुमच्या त्या मुसंडी शेरासारखा माझाही एक शेर आहे जुना.

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली जिथून गेलो मी

छानपैकी जगून गेलो मी या गझलेतील (रिक्षा) Proud

भूषणराव, मुसंडी मारणे याचे आम्ही केलेले विवेचन पटते आहे ना?<<<

नाही पटत!

मुसंडी मारणे म्हणजे गर्दीतून शिताफीने वाट निर्माण करून पुढे जाणे.<<<

ती वाट शिताफीने निर्माण केलेली नसून धडक पद्धतीने निर्माण केलेली असल्यास आम्ही त्यास मुसंडी मानतो.

भूषणराव, धडक पद्धतीने वाट निर्माण करण्यासही शिताफी लागत नाही काय?
अवघड परिस्थितीत, विरोध असूनही, प्रतिकूल परिस्थितीतही धिटाईने कलात्मकरित्या जो वाट निर्माण करतो त्याला आम्ही तो मुसंडी मारतो असे म्हणतो.

भूषणराव आमचे असेही शेर आहेत.......

वाट कोणी देत नसतो, वाट व्हावे लागते!
गाठण्यासाठी किनारा लाट व्हावे लागते!!

आडवाटा, चोरवाटा लोपती वाटेमधे!
गाठ शिखरांशी पडाया घाट व्हावे लागते!!

मी असे काही खुबीने ढाळले अश्रू.....
हासरा मी वाटलो अन् हासली गर्दी! << हा प्रचंड आवडला.

आसवांची ओल झिरपू लागली नेत्री!
पापण्यांच्या कुंपणांनी कोंडली गर्दी!!

<< क्या बात !

कैलासराव, सुखाने मला हाक देणे व गर्दी पांगणे यांचे काय नाते ते कळले नाही.

अगदी तसेच दुर्दशा होणे आणि गर्दी पांगणे यांचे नाते नाहीच आहे. असो.

मी पर्यायी दिलेल्या शेराचा अर्थ आहे...... मी सुखी असल्यावर कुणीच येत नाही मात्र माझी दुर्दशा पहायला गर्दी जमते.

सौख्य आणि दुर्दशा हा पॅराडॉक्स घेतला आहे व दोन्ही मिसर्‍यात संबंध आणला आहे.

आपल्या मतल्यातले दोन्ही मिसरे स्वतंत्ररित्या सुंदर आहेत मात्र ''राबता '' नाही आहे.

कैलासराव, आमच्या मतल्याचा गद्य अर्थ असा.........
जेव्हा माझी दुर्दशा झाली होती, तेव्हा मला बघायला गर्दी लोटली! (बघ्यांची गर्दी)
(मात्र) मी (मदतीसाठी) हाक दिली, तेव्हा मात्र कोणीच थांबले नाही, म्हणजेच ती बघ्यांची गर्दी पांगली.
इथे जगात लोक नुसती बघ्याचीच भूमिका घेतात, मदतीला मात्र मागेमागेच राहतात ही वस्तुस्थिती मांडली आहे!

कैलासराव!
मतल्याच्या पहिल्या ओळीत माझी दुर्दशा झाली असे आले आहे. या पार्श्वभूमीवर दुस-या ओळीतील हाक ही मदतीसाठीची हाक आहे हे सूचीत होते, असे आम्हास वाटते. पण लोटलेली गर्दी ही फक्त बघ्यांची गर्दी होती, मदत करायची म्हटल्यावर सगळ्यांनी काढता पाय घेतला व गर्दी पांगली असे दुस-या ओळीत येते!

जगातील ह्या बघ्या लोकांच्या प्रवृत्तीवर बोट ठेवण्याचा आमचा या मतल्यात प्रयत्न होता!

तुम्ही सांगीतल्यानंतर अर्थ लक्षात येतोय. पण हा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे संप्रेषित होत नाही.