ये ना ये ना ये ना...

Submitted by मुग्धमानसी on 22 November, 2012 - 01:38

दिवस संपला रोजसारखा सांज उगवली पुन्हा
नकळत पाऊल कापु लागले घरचा रस्ता जुना
वाट तीच, तीच मीही अन् त्याच रोजच्या खुणा
तरिही काही नवथर माझ्या मनात हलते पुन्हा...

तु मागुन पुन्हा येउन मजला हात धरुन थांबव ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

मी रोज पहाटे उठते सारी कर्तव्ये उरकते
बडबडते, गुणगुणते काही, हसते अन् हसवते
रमते मी माणसांत सगळ्या सर्वांशी बोलते
पण संध्याकाळी अशी एकटी मीच मला सापडते
मन पुन्हा हटुन बसते म्हणते तुझियापाशी ने ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

गुलमोहराचा लाल बहर अन् फांदीमागिल चंद्र
पहिला पाऊस गंध मातीचा हुळहुळणारा धुंद
हवेतला गारवा गुलाबी झुळूक रेशमी मंद
आणि तुझा तो हळुच मजला न्याहाळण्याचा छंद
सगळे सगळे माझे मज तु पुन्हा आणुन दे ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

संसाराचा अवजड गाडा ओढुन मी थकताना
संस्कारांचे ओझे जड मानेवर वागवताना
चेहर्‍यावरती एका अनेक चेहरे रंगवताना
स्पर्श तुझा आठवतो रात्री पाठ हि टेकवताना
’माझा’ चेहरा पुन्हा एकदा तुझ्या ओंजळीत घे ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

कुणी टांगला चंद्र देखणा माझ्या अवकाशात
कुणी डकवल्या अशा चांदण्या माझ्या आकाशात
कुणी सुर्य चोरला मला ही दिली चांदरात
कधी कुणी का बघितलेही नाही माझ्या आत
माझ्या आतुन मला पळवुनी दूर दूर तु ने ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कुणी का बघितलेही नाही माझ्या आत
माझ्या आतुन मला पळवुनी दूर दूर तु ने ना<<<

या ओळी आवडल्या.

बाकी फटाक्यांची माळ आहे.

काव्य छान आहे तुमच्या अन्गी .;पण ...........
..............बरीच्शी जुनाट वळणाची अभिव्यक्ती अन तेच्ते इतरत्र वर्षानुवर्षे वाचलेले मुद्दे कल्पना इत्यादी जरा जास्त आहेत ,शिवाय कल्पनाविस्तार करताना जरा जास्तच वाहावत गेल्यासारखी ..पाल्हाळ लावत बसल्यागत वाटते तुमची कविता बर्‍याचदा

माफ करा काहीच परिचय नसताना अगदीच रोखठोकपणे बोललो .........पण हो ss.......ही माझी वैयक्तिक मते अहेत बरका सार्वत्रिक नाहीत त्यामुळे न पटल्यास फारसे वाईट वाटून घेवू नयेत ही विनन्ती

आपला नम्र
वैवकु

लिहित राहा ,कविता आवडली .अशी कविता लिहतांना शब्दात नाचतांना खूप मज्जा येते .मला तरी नक्की आली .

प्रामाणिक मतप्रदर्शनाबद्दल धन्यवाद वैवकु/ बेफिकीर!!! तुमचे मुद्दे नक्की उपयोगी पडतील माझ्या.
धन्यवाद विक्रांत. Happy

Happy