अखेरचा जय महाराष्ट्र

Submitted by गामा_पैलवान on 20 November, 2012 - 05:39

सण होता बळीपाडवा ॥ संगे दिवाळीचा गोडवा ॥ तव वार्तासंचार कडवा ॥ कानी आला अकस्मात ॥०१॥
घास अडके घशात ॥ चित्त न रमे कशात ॥ बाळासाहेबांचे मिषात ॥ भिरभिरी फिरे ॥०२॥
काटूनी लांबशी सडक ॥ गाठले 'मातोश्री' तडक ॥ जाळीतसे दाह कडक ॥ वाघक्षेम चिंतेचा ॥०३॥
भीष्म पडे शरपंजी ॥ की रामराजाची चंजी(*१) ॥ मांडली झगडाझुंजी ॥ साक्षात मृत्यूशी ॥०४॥
जीव होई इवलासा ॥ जरी ऐकुनी खुलासा ॥ दिलास लाभे दिलासा ॥ कसाबसा थोडा ॥०५॥
भाऊबीजेचा पै दिन ॥ दीन मन राहे खिन्न ॥ बेचव लागे मिष्टान्न ॥ सकल बंधुरायां ॥०६॥
दुसरे दिनी उत्साहक ॥ बातमी आणती वाहक (*२) ॥ वाटले चिंतेत नाहक ॥ पडलो असो की ॥०७॥
परि वार्ता येई भयाण ॥ साहेब करिती प्रयाण ॥ सूर्यास लागले गिराण (*३) ॥ कायमचे बा ॥०८॥
मेरूदंड जो मर्‍हाष्टी ॥ दृढ नेता दूरदृष्टी ॥ कोट्यावधी होती कष्टी ॥ चिरवियोगे ॥०९॥
लेखणी आणि कुंचली ॥ अर्पिती मूक श्रद्धांजली ॥ म्हणती सदाची वंचली ॥ दिव्यसंगती ती ॥१०॥
पुढील दिन जो उजाडे ॥ उजाड होती चित्तकवाडे ॥ तिळतिळ काळीज तोडे ॥ आर्त अंत्यदर्शनीचे ॥११॥
विशाल जनधनाचा मेवा ॥ पाहोन कुबेर करी हेवा ॥ अमुच्या जिवाभावाचा ठेवा ॥ रथारूढ जाहला ॥१२॥
अखेरची यात्रा निघे ॥ हरेक शोकाकुले बघे ॥ कोण कैसा सावरून घे ॥ एकमेकांते ॥१३॥
सूर्य विस्मयाते हबके ॥ गती अकस्मात थबके ॥ व्याघ्रवदनाची रूपके ॥ स्ववर्णनाते योजी ॥१४॥
रथ मुक्कामी पोचता ॥ सुबक पाहिली चिता ॥ शव चितारूढ होता ॥ शोक अनावर होई ॥१५॥
संपता शासकीय वंदना ॥ सोडविले तिरंगा बंधना ॥ मग रचिले काष्ठचंदना ॥ ठायी ठायी त्या ॥१६॥
ज्वलकांडे होई सिद्ध ॥ उद्धव तो चित्तविद्ध ॥ ऐसा वाघ चिताबद्ध ॥ पाहवेना साहवेना ॥१७॥
उचंबळे शोकसिंधु ॥ पसरता अग्नीबिंदु ॥ अदृष्ट होता मुखेंदु ॥ अग्नीशलाकेत ॥१८॥
सांडूनी देह निष्प्राण ॥ देवीवाहने(*४) केले प्रयाण ॥ चढे सम्यक सोपान ॥ देवीचरणीचा ॥१९॥
हळवा झालो बाळापरि ॥ तो 'बाळ' वसे मनांतरी ॥ खूण पटताचि उभारी ॥ आली जगदंबकृपे ॥२०॥
जातस्य हि ध्रुवो मृत्यु ॥ हे इहलोकीचे सत्यु ॥ आवरले शोककृत्यु ॥ ऐशा सांत्वने ॥२१॥
धैर्यधरांचा जो शैलवान(*५) ॥ मल्लांचा गामा पैलवान ॥ शब्दरूपी सचैल स्नान ॥ भावे अर्पितो तया ॥२२॥

--------------------------------------------
*१. रामराजाची चंजी : राजाराम महाराज चंजी (जिंजी) येथे अडकले होते तशी लढाई.
*२. वाहक : समाचार वाहिन्या
*३. गिराण : ग्रहण
*४. देवीवाहन : वाघ
*५. शैलवान : हिमालय
--------------------------------------------

वाचकहो, एका सामान्य शिवसैनिकाने अनुभवलेला शोकप्रसंग मनात कल्पून मांडला आहे. चुकलेमाकले असले तर कृपया उदार मनाने क्षमा करावी! अंतरीचा भाव आपल्या चरणी ठेवला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैवकु,

प्रतिसादाबद्दल आभार. ओवी रचायची म्हंटलं की माउलीच सगळं काम करतात. जमेल तसा प्रयत्न करेन कविता करण्याचा. सारं काही माउलींच्या हाती.

आ.न.,
-गा.पै.

nityya, रोहित ..एक मावळा, आपल्यापर्यंत कविता पोहोचली याचा आनंद वाटतो. प्रतिसादाबद्दल आभार.

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद बागेश्री!
आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद केदार! पोवाडा लिहिण्यासाठी वीररस वापरावा लागतो. याउलट प्रस्तुत प्रसंग शोकपूर्ण आहे. करुण आणि वीर रसाची सांगड घालणे कर्मकठीण असते! निदान माझ्यासाठी तरी! परंतु आपल्या विनंतीनुसार पुढे कधीतरी पोवाडा लिहिण्याचा प्रयत्न करेन.
आ.न.,
-गा.पै.

अप्रतिम गामा ... पुन्हा १३ ते १८ नोव्हे. चा काळ आठवून भावूक झालो. काव्य...? तांत्रिक दृष्ट्या तज्ञ सांगतीलच पण आशय रांगड्या शिवसैनिकाला निश्चितच हळवा करणारा आहे.

पहिल्यान्दाच प्रतिसाद दिला तेन्व्हा लिहिणार होतो विषयान्तर टाळले

साहेब गेले........... काही दिवस मन विषण्ण झाले होते........... पण साहेबानीच दिलासा दिला ! स्वर्गात गेल्यावर सर्वात आधी यमाला सान्गून कसाबाचे जहन्नुम चे टीकीट फाडले !!

<<<<<<<<<<<दिलास लाभे दिलासा ॥ कसाबसा थोडा !!!!!!!>>>>>>>>>

धन्यवाद !!

बापरे वैवकु, तुम्ही आता माझ्या काव्यातून भाकीतार्थ काढू लागलात की काय! Happy
आ.न.,
-गा.पै.

सुंदर

Pages