जुनी कहाणी

Submitted by मिरिंडा on 19 November, 2012 - 12:11

जुनं झालय सगळं
अगदी पोतेरं.....
जुने घर, जुनी झाडे,
जुनीच फुले
जुन्या वासांची

वस्त्रांची सळसळ
जुन्यात जुनी
दागिन्यांनी लडलेले
जुनेच चेहेरे
नुसते सपाट
ओळख असून अनोळखी झालेले

मनातल्या विचारांचे कपटे
गोळा करता करता
वाकणारी जुनी पाठ
आता म्हणत नाही
"मोडेन पण वाकणार नाही"

नवीन कागद विकत घेणं
आताशा जमत नाही
पेन्शन मध्ये ते बसत नाही
नवीन कपटे तयार होत नाहीत
मग राहातं फक्त स्वच्छतेचं नाटक

समाजकार्य केल्याचं समाधान मिळतं
जमेल तेवढी कंबर
ताठ करीत
तोंडाचं बोळकं हालवीत
उद्गारतो
"समाजाची उन्नती हेच माझं कार्य"

टाळ्या वाजतात
कारण वाजवणाऱ्यांना
भाषण बंद पाडायचं असतं म्हणून
मी हरखून जातो
जगण्याची उमेद धरतो
मरणाला वाकुल्या दाखवीत
आणि सुकलेल्या मिशा पिळीत
जगायला सुरुवात करतो.

(पूर्व प्रकाशनः मीमराठीं. नेट /नोड /६८६८)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदर्भ लागत नाहिये...! त्यामुळे काही ओळी पटल्या नाहीत.

>>>
जमेल तेवढी कंबर
ताठ करीत
तोंडाचं बोळकं हालवीत
उद्गारतो
"समाजाची उन्नती हेच माझं कार्य"
<<<

हे कोणासाठी..? पेन्शनचा उल्लेख तुम्ही केलेला असल्याने, हे राजकारण्यांवर नसणार हे नक्की. मग पेन्शन घेणार्‍या सर्वसामान्यावर वरील ओळी लिहिल्या आहेत असे समजायचे का?

ता.क. : तुम्ही स्वतःवर लिहिले असेल तर प्रश्नच मिटला.... Happy

शेवटचे दोन भाग नीट उलगडले नाहित
बाकी मस्त वाटली

>>मनातल्या विचारांचे कपटे
गोळा करता करता
वाकणारी जुनी पाठ
आता म्हणत नाही
"मोडेन पण वाकणार नाही">>

हे मस्तच