अवकाश..

Submitted by हर्पेन on 19 November, 2012 - 10:15

अवकाश.. ब्रह्मांड!

समुद्राकडे तासनतास बघत बसताना, तो जसा, सतत नवनवीन रुपडं घेउन मंत्रमुग्ध करुन टाकतो; इथे मात्र तसेच होते आकाशाकडे बघतानाही.

शुन्यातून निर्माण झाले असे म्हणतात ते ब्रह्मांड, ते शून्य, ती पोकळी, ते काहीच नसणे अन् सर्व काही तेच असणे... हे सर्व प्रत्ययकारी होतं इथले आकाश समुद्राकाठी बसून बघताना!

हात थोडा लांब केला तर हाताला पांढरं काहीतरी लागेल असे वाटायला लावणारे ढग....

स्वप्न अन् सत्य, भास अन् आभास, बिंब अन् प्रतिबिंब ह्यातल्या सीमारेषा एकदम पुसट झालेल्या....
खरोखरच जिचे वर्णन करायला शब्दसामर्थ्य अपुरे पडेल अशी अत्यंत तरल, सुक्ष्म, काव्यमय अशी अनुभुती देतात इथले समुद्रकिनारे...

मागे सरत्या पावसाळ्यात अशाच एका कड्यावरुन पाहताना एका दरीने असंच वेड लावले होते. धुकं, ढग, ऊन आणि त्या उन्हामुळे क्षणाक्षणाला बदलणारा अन् हिरव्याच्या असंख्य छटा दाखवणारा-लपवणारा डोंगर! पण ते वेड म्हणजे ह्या आत्ताच्या वेडाची फक्त एक झलक होती असंच म्हणावे लागेल!

इथे तर डांबरी रस्त्यावरनं चालता चालता, सहज म्हणून पण नजर जरा वर गेली की संपलेच सगळे.. भर दिवसादेखील उनपावसाच्या खेळाकडे बघितले तरी क्षणात आपण होत्याचे नव्हते होऊन जातो, अज्ञाताच्या ओढीने मन व्याकुळ होतं, मनाला पिसं लागतं अन् ते एकदम पिसासारखे हलके होऊन जातं, निर्विकार निर्गुण भावनांचा कल्लोळ होतो! अद्वैतभावना जागृत होतात! वाटते मीच हे आकाश आहे अन् मीच हा समुद्र! मीच माझ्याकडे बघतोय, नित्यनुतन हरघडीला होणारे बदल टिपतोय!

ही भर दिवसाची गत तर रात्रीची गंमतच न्यारी!

चांदण्या/तारे तर असेही लुकलुकून, होत्या / नव्ह्त्याचा खेळ खेळतात, त्यात हा चांदण्याचा ढगातून पाझरणारा प्रकाश... खरंतर प्रकाश पण नाही, नुसती आभा-दीप्ती... एक अलगद थर मंद अशा रंगा-उजेडाचा! अल्वार तर इतका की श्वास सुद्धा जपूनच सोडावा, न जाणो हे सर्व विसकटून जायचे हे सर्व!

'हे देवाघरचे देणे' किंवा 'निव्वळ पारलौकिक' असाच हा अनुभव, मिळेल तुम्हालाही मॉरिशस-द्विपी!

DSC04954.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users