ज्याला जसे हवे ते बोलून मोकळा झाला!

Submitted by सतीश देवपूरकर on 17 November, 2012 - 03:14

गझल
ज्याला जसे हवे ते बोलून मोकळा झाला!
लचका हळूच माझा तोडून मोकळा झाला!!

धरणी तहानलेली, अद्याप शोधते त्याला;
तो एक मेघ होता.....बरसून मोकळा झाला!

स्वप्नात दंग होतो, मी निवांत निजलो होतो!
इतक्यात सूर्य मजला उठवून मोकळा झाला!!

मी कोण? पाहिले ना, बेफिकीर तो इतका की;
मी यार! अन् मला तो फसवून मोकळा झाला!

जखमांस धावदोरे घातले धांदलीमध्ये....
अन् काळ, त्याच जखमा उसवून मोकळा झाला!

लवलेश वास्तवाचा त्या वार्तेमध्ये नव्हता....
अफवेस तो बिचारा मिरवून मोकळा झाला!

घोटीव कागदासम, मज कातरलेही त्याने;
आरास उत्सवाची सजवून मोकळा झाला!

टाळूवरील लोणी मेलेल्याचे वाचेना;
मी कोण? तो मलाही, घुसळून मोकळा झाला!

मारू नये कधीही मेलेल्याला जग म्हणते.....
जो भेटला मला तो डिवचून मोकळा झाला!

होतो भिडस्त जात्या, ना म्हणता येतच नव्हते....
प्रत्येक सोयरा मज भरडून मोकळा झाला!

धरली अरे उभारी, मी कशीबशी खेळाया;
अन् डाव लीलया तो उधळून मोकळा झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवलेश वास्तवाचा त्या वार्तेमध्ये नव्हता....
अफवेस तो बिचारा मिरवून मोकळा झाला!

मारू नये कधीही मेलेल्याला जग म्हणते.....
जो भेटला मला तो डिवचून मोकळा झाला! >> हे शेर जास्त आवडले

आनंदयात्रीजी!
जखमांस धावदोरे घातले धांदलीमध्ये....<<<<<<
वृत्त कुठे गडबडले आहे?
प्रत्येक मिस-यातील पहिला अर्धचरण अक्षरगणवृत्तात, तर दुसरा अर्धचरण मात्रावृत्तात आहे!
एकूण मिसरा जर मात्रावृत्त समजला, तर प्रत्येक मिस-यात १२+१४=२६मात्रा आहेत.
कुठेही मात्रांचा हिशेब चुकलेला वाटत नाही.
कुठेही लयभंगही नाही!
सर्व मिस-यांत तीच वृत्तशैली आहे!
............प्रा.सतीश देवपूरकर
टीप: शेरांबद्दल बोलला नाहीत काही, आनंदयात्रीजी?

माझ्या माहितीनुसार मतल्यामध्ये जमीन कळते.

गागालगा लगागा | गागालगा लगागा गा

हा पॅटर्न जर मतल्यामध्ये असेल, तर तो सगळीकडे सांभाळला गेला पाहिजे. बरोबर ना?

आनंदयात्रीजी!
मतल्याकडे आपण अक्षरगणवृत्ताच्या दृष्टीने पहात आहात, आम्ही ते मात्रावृत्त धरून गझल लिहिली आहे.
प्रत्येक मिस-यात १४+१२=२६ मात्रा हे पाळलेले आहे. मात्रावृत्त गृहीत धरणे यात चूक आहे का?
मात्रावृत्तातही काही शब्दयोजनेत अक्षरगणवृत्त अंशत: डोकावू शकत नाही काय?

मात्रावृत्त गृहीत धरणे यात चूक आहे का?
मात्रावृत्तातही काही शब्दयोजनेत अक्षरगणवृत्त अंशत: डोकावू शकत नाही काय?

पस्तीस वर्षांच्या गझलसाधनेनंतर आपल्याकडून हे असले प्रश्न अपेक्षित नाहीत, सतीशजी!! आपण लिहिलं आहे ते गझलेच्या नियमात बसत आहे ही खात्री असेल तर तसे म्हणा, अनवधानाने आपली चूक झाली असेल तर चूक कबूल करावीत.

आपण मात्रावृत्त (मनात) धरून लिहिली आहे आणि योगायोगाने मतल्यात अक्षरगणवृत्तातील मात्रांचे गणित दोन्ही ओळीत सारखे येत आहे यावरून माझ्या मते तेच पुढे कंटिन्यू करायला हवे. गझलेमध्ये म्हणूनच मतला महत्त्वाचा असतो ना? गझल मात्रावृत्तामध्येच समजली जावी असे गझलकाराला वाटत असेल तर ती तजवीज त्याने मतल्यामध्येच करावी आणि एक स्पष्ट जमीन तयार करावी, हे माझे मत आहे.

आपल्या तुलनेत आम्ही नवखे आणि शिकाऊ आहोत, हे पुन्हा सांगायला नकोच! तरी स्पष्ट, थेट आणि नेमक्या प्रश्नाला तशीच उत्तरे द्यावीत ही विनंती!

आपण मात्रावृत्त (मनात) धरून लिहिली आहे आणि योगायोगाने मतल्यात अक्षरगणवृत्तातील मात्रांचे गणित दोन्ही ओळीत सारखे येत आहे यावरून माझ्या मते तेच पुढे कंटिन्यू करायला हवे. गझलेमध्ये म्हणूनच मतला महत्त्वाचा असतो ना? गझल मात्रावृत्तामध्येच समजली जावी असे गझलकाराला वाटत असेल तर ती तजवीज त्याने मतल्यामध्येच करावी आणि एक स्पष्ट जमीन तयार करावी, हे माझे मत आहे<<<

याच्याशी सहमत आहे, पण इतके परफेक्ट असावे अशी अपेक्षा असली तर 'तशी तजवीज' (मात्रावृत्तच मानले जावे अशी तजवीज) देवपूरकरांच्या मतल्यात केली गेलेली आहे हे 'लचका' या शब्दावरून लक्षात येईल.

अक्षरगणवृत्तात एका गुरूचे दोन लघु (किंवा उलटे) केले जात नाही. आपण लोक हल्ली सर्रास गझलेत तसे करतो, पण अक्षरगणवृत्तात त्याला मान्यता नाही. (उदाहरणार्थः देवप्रिया हे अक्षरगणवृत्त तर कालगंगा हे मात्रावृत्त असे म्हणतात).

आता देवपूरकरांच्या मतल्यात काय झाले आहे पाहू:

ज्याला जसे हवे ते बोलून मोकळा झाला!

(गागा लगा लगा गा गागाल गालगा गागा)

लचका हळूच माझा तोडून मोकळा झाला!!

(ललगा लगाल गागा गागाल गालगा गागा)

यावरून स्पष्ट होते की मतल्यात मुळातच अक्षरगणवृत्त पाळले गेलेले नाही. त्यामुळे ते आपोआप मात्रावृत्त होत आहे.

या व्यतिरिक्तः

समजा अक्षरगणवृत्तातील मतल्याला स्वतः कवी मात्रावृत्त असे संबोधत असेल (संभाव्य कारण - पुढील ओळी मात्रावृत्तात बसवण्याची तरतूद करता यावी म्हणून) तर त्याला ते स्वातंत्र्य असावे की नाही हा चर्चेचा भाग वाटतो.

धन्यवाद भूषणराव आपण केलेल्या प्रांजळ व परखड मार्गदर्शनाबद्दल!
आमची एक basic शंका आहे.

आम्हास असे शिकवले गेले की, गझल कोणत्याही वृत्तात (अक्षरवृत्ते सोडून) लिहिता येते. अट फक्त एकच, की एकदा एक वृत्त ठरले की, संपूर्ण गझल त्याच वृत्तात लिहिली जायला हवी,
आता आपण स्वत:चेही वृत्त तयार करू शकतो.
गझलचे म्हणून असे काही विशिष्ट वृत्त नसते.
एखाद्या मिस-याचे वृत्त कोणते समजायचे, अक्षरगणवृत्त की मात्रावृत्त?
दोन्ही वृत्तात मात्रांची संख्या ही सारखीच असते.
एखादा म्हणेल हे अक्षरगणवृत्त नसून मात्रावृत्त आहे तर त्यात काही चूक आहे का?
अर्ध्या मिस-यात अक्षरगणवृत्त व अर्ध्या चरणात मात्रावृत्त व असे करून एकूण चरणाची मात्रासंख्या सारखीच ठेवली प्रत्येक मिस-यात तर चालते का?
मात्रा वृत्तात लगावली बघत नाहीत. तरीही जर कुठे कुठे लगावली पण एकसारखी आली तर काही चूक आहे का?
आमच्या कल्पनेप्रमाणे मात्रांचा हिशेब व लय साधत असेल तर काहीही बिघडत नाही.
एखाद्या मिस-यास कोणत्या वृत्ताच्या दृष्टीकोनातून पहावे हे व्यक्तीसापेक्ष आहे का?
शिवाय कितीजण अक्षरगणवृत्तात एकही सूट न घेता काटेकोरपणे गझल लिहितात हाही एक आभ्यासाचा विषय व्हावा. असो.
आनंदयात्रींनी जो मुद्दा काढला आहे, तो आम्हासही पटतो आहे. पण तरीही वृत्त कोणते समजायचे, अक्षरगण, की मात्रावृत्त हा प्रश्न उरतोच. स्वत: शायर जर मात्रावृत्त म्हणत असेल तर त्यास काय हरकत असावी?
पुढील शेरांत जर जाणवत असेल, की शायराने फक्त मात्रासंख्यांचे बंधन व लय पाळली आहे, तर त्याच्या गझलेस मात्रावृत्तातील गझल मानण्यात काय अडचण आहे?
प्रत्येक अक्षरगणवृत्तात मात्रांची संख्याही सारखीच असते!
अवांतर: भूषणराव शाळा सोडल्यास ४०/४२वर्षे झालीत. वृत्तांची नावेही आता आठवत नाहीत. आम्ही लिहिताना आमच्या गुणगुणण्यास व लयीस महत्व देतो. कानास काही खटकत नाही ना ते पहातो. अर्थात वृत्तांचा सखोल आभ्यास हा करायलाच हवा हे खरे आहे, पण अजून तरी आम्हास तो साधला नाही. पाहू या, एकदा वृत्तांवरही तुटून पडू!
आमचा मतला असा होता.....
ज्याला जसे हवे ते बोलून मोकळा झाला!
लचका हळूच माझा तोडून मोकळा झाला!!
आनंदयात्रींनी जो कायदा सांगितला तो पाळण्यासाठी असा बदल करू का भूषणराव मतल्यात?
जसे हवे ज्याला ते बोलून मोकळा झाला!
लचका हळूच माझा तोडून मोकळा झाला!!
मतल्यातच हे सर्व करायला हवेच का?
कृपया मार्गदर्शन करावे.
प्रा.सतीश देवपूरकर
आनंदयात्रीजी: आम्ही अजूनही गझल शिकत आहोत, भले कितीही काळ जरी लेखन करत असलो तरी!
........................................................................

एखाद्या मिस-याचे वृत्त कोणते समजायचे, अक्षरगणवृत्त की मात्रावृत्त?
एखादा म्हणेल हे अक्षरगणवृत्त नसून मात्रावृत्त आहे तर त्यात काही चूक आहे का?<<<

येथे आनंदयात्री म्हणतात तेच मीही म्हणतो. मतल्यात गणवृत्त प्रस्थापित झाल्यास पुढेही गणवृत्तच पाळले जायला हवे. (तुमच्या या विशिष्ट गझलेत 'लचका' या शब्दामुळे अक्षरगणवृत्त भंगले आहे. पण असे गृहीत धरले की तुम्ही एका गुरू अक्षराजागी दोन लघु अक्षरे ही सूट घेतली आहेत, तर यात्रींचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे की मतला अक्षरगणवृत्तात प्रस्थापित झालेला आहे.) मतल्यातील वृत्तच पुढे पाळले जायला हवे आणि त्यात (तुम्ही घेतलेली 'लचका' या शब्दाप्रमाणे असलेली सूट सोडली तर - अर्थात, एखाद्यास तशी सूट घ्यायची असल्यासच) कोणते वृत्त यायला हवे, कोणते वृत्त आले आहे आणि कोणते वृत्त 'समजायचे' हे प्रश्नच निघू नयेत.

मात्र तुमचा दुसरा प्रश्न 'एखादा म्हणेल हे मात्रावृत्त आहे तर त्यात काही चूक आहे का' हा (प्रश्न) मला योग्य वाटत नाही. अक्षरगणवृत्ताची अट सुस्पष्टपणे ठरलेली आहे ती म्हणजे लगावली क्रम व अक्षरसंख्या! (यामुळे मात्रा आपोआप सर्व ओळींत समान येणारच). एकदा तुम्ही या अटीनुसार मतला रचलात ('लचका' या शब्दातील कळत - नकळतपणे घेतली गेलेली सूट हा विषय सध्या बाजूला) तर तुम्ही त्याला अक्षरगणवृत्ताऐवजी मात्रावृत्त म्हणालात तरी इतरांना तुमच्या मताने काहीच फरक पडणार नाही. इन फॅक्ट, मतला गुणगुणूण झाला की वाचकाची जीभ पुढच्या शेरातील उला मिसरा वाचायला त्याच गणवृत्तानुसार वळेल. ती ओळ मात्रावृत्तात असली तर जीभ अडखळणारच. (गझलकाराबरोबरच गझलवाचक व गझलरसिकांचीही तश्शीच तयारी होत जाते व त्यामुळे अश्या पळवाटा कवी काढू शकत नाही हे वास्तव आहे, यात पळवाटा हा शब्द तुम्हाला किंवा कोणालाच दुखावण्यासाठी नसून केवळ पर्यायी संयत शब्द न सुचल्यामुळे वापरला आहे).

यात्रींचे आणखी एक म्हणणे पटते की तिसर्‍या चौथ्या प्रतिसादात जरी तुम्ही स्वतःला आजन्म विद्यार्थी असे संबोधत असलात व तसे अनेकदा दिसून येत असले तरी तुमची अश्या स्वरुपाच्या मुद्यांवरील प्रथम नैसर्गीक प्रतिक्रिया ही 'माझे मुळीच चुकलेले नाही' या टोनची असते. या टोनबाबत माणसे तोवर काही म्हणणार नाहीत जोवर कवी नवखा आहे. म्हणूनच यात्रींनी तुमच्या साडे तीन दशकांच्या कारकीर्दीचा उल्लेख केलेला आहे की इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा मुद्दा तुमच्याकडून चर्चेला येऊच नये. अर्थात, तो विषय या चर्चेशी निगडीत असला तरीही दुर्लक्षित ठेवला तर निव्वळ मुद्दा हा उरतो की अक्षरगणवृत्ताच्या सर्व अटी सर्वस्वी पाळल्यानंतर त्याला स्वसोयीसाठी मात्रावृत्त म्हणण्याचे स्वातंत्र्य कवीला असावे की नसावे?

माझे अगदी प्रामाणिक उत्तर हे आहे की गझलेच्या आकृतीबंधानुसार व त्यासंदर्भातील कायद्यांनुसार जरी ते स्वातंत्र्य कवीला मिळू नये हे खरे असले तरी अत्युत्कृष्ट शेर होत असेल तर कवीने जबाबदारीची जाणीव ठेवून तसे केल्यास रसिक एका चांगल्या शेराला मुकणार तरी नाही. पण येथे कवीची भूमिका अशी असावी की 'मला जाणीव आहे की मी सूट घेतलेली आहे, पण शेराच्या आशयाच्या मोहाने मी मुद्दाम तसे केले आहे व हे काहीसे नियमबाह्य असल्याची मला जाणीव आहे'. (पूर्वी मी काही सूट घेतली तर गझलेखाली तशी टीप द्यायचो, नंतर ते बंद केले कारण त्या टीप देण्यानेही रसभंग होऊ शकतो असे वाटले. पण एखाद्या कवीने तसे केल्यास, टीप दिल्यास गैर काहीच नाही.)

====================

एवढे सगळे झाल्यानंतरही:

शेर उत्तम असला तर कोणी एवढा सूक्ष्म विचारही न करता वाहवाची पावती देतील यात शंका नाही. त्यामुळे नियमांना झुगारूनही लेखन करता येईलच, पण आपण 'तितके' सकस लिहितो आहोत हे इतरांचेही मत असायला हवे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अक्षरगणवृत्तात एका गुरूचे दोन लघु (किंवा उलटे) केले जात नाही. आपण लोक हल्ली सर्रास गझलेत तसे करतो, पण अक्षरगणवृत्तात त्याला मान्यता नाही.
हे महत्त्वाचे वाक्य आहे. या एकाच वाक्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
या कसोटीवर तपासायचे झाल्यास माझ्या स्वतःच्याही अनेक गझलांच्या मतल्यांमध्ये अशी तजवीज झाली नसण्याची शक्यता आहे. कारण दोन लघु = एक गुरू अशी सोय अधिकृतपणे असते हा माझा समज होता. आता गझल लिहिताना अधिक बंधने वाढली आहेत (बंधने पाळायची हे ठरवले तर)!

आता मुद्दा आहे सतीशजींनी इथे काय मानून गझल अशीच ठेवतील (मात्रावृत्त की अक्षरगणवृत्तामध्ये सूट) अथवा बदलतील हा! पण मला तंत्रामध्ये एक नवीन गोष्ट समजल्यामुळे तो मुद्दा माझ्यासाठी सध्यातरी गौण आहे.

पुढची चर्चा वाचतो आता.

धन्यवाद!

आनंदयात्रीजी! आपण सांगितलेला मुद्दा आम्हास पटला आहे. आमच्या या मतल्यात अनावधानाने अक्षरगणवृत्त प्रस्थापित झाले आहे.आम्हास मात्रावृत्त अपेक्षित होते. असो.
आपल्या म्हणण्यानुसार जर मतल्यात मात्रावृत्त प्रस्थापित करायचे असल्यास असा बदल मतल्यात करू काय?
कसा वाटेल हा बदल?
जसे हवे ज्याला ते बोलून मोकळा झाला!
लचका हळूच माझा तोडून मोकळा झाला!!

भूषणराव, मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. मात्रावृत्त मतल्यात प्रस्थापित करण्यासाठी आम्ही करू पहातो तो बदल ठीक आहे का? बदल वरील आमच्या प्रतिसादात दिलेला आहे. कृपया लगेच वदलात तर तात्काळ मतला संपादता येईल.

नाही बेफिकीर...

*** मी लाईनवरच आहे. (सर्वार्थाने)

>>> की सलाईन तुमच्यावर आहे? <<<<
तो अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त असेल... Happy

एखाद्या साध्या गोष्टीवर किती चर्चा...?

भूषणराव, मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. मात्रावृत्त मतल्यात प्रस्थापित करण्यासाठी आम्ही करू पहातो तो बदल ठीक आहे का? बदल वरील आमच्या प्रतिसादात दिलेला आहे. कृपया लगेच वदलात तर तात्काळ मतला संपादता येईल.>>>>>>>> दिड वर्षात असे काय झाले प्रोफेसर की तुम्ही सर्वांना फाट्यावर मारायला लागलात.

माझ्या तमाम गझला ओळीने वाचल्यास हे ताबडतोब लक्षात यावे!
पूर्ण आलेखच बदलणा-या प्रतिसादांचा व बदलणा-या गझलगुणवत्तेचाही डोळ्यांपुढे उभा राहील!
कालच्यापेक्षा आज जरा बरे लेखन आपल्या हातून व्हावे अशी माझी आस व प्रयत्न असतो!
आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल आभारी आहे!
माझे नाइलाजाने घ्यावे लागलेले आयडी खालीलप्रमाणे
सतीश देवपूरकर
अनामिक गझलवेडा
गझलप्रेमी
कर्दनकाळ
profspd
एखाद दुसरे नाव विसरलो असल्यास क्षमस्व!
प्राचार्य सतीश देवपूरकर

वाईट याचे वाटते की, लोक गझलकार कोण आहे हे पहातात, गझलेकडे नाही मग प्रतिसाद ठरवतात

वाईट याचे वाटते की, लोक गझलकार कोण आहे हे पहातात, गझलेकडे नाही मग प्रतिसाद ठरवतात<<<<

खरे आहे हे !! पण मला वाटते की अशी अवस्था पदरी पडू नये म्हणून वागण्याबोलण्यात शायरानेच काही यमनियम पाळावेत म्हणजे शायरालाच ते पाळावे लागणार असावेत

Pages