तुझा आभासही आता मनाला वाटतो दावा!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 November, 2012 - 04:15

गझल
तुझा आभासही आता मनाला वाटतो दावा!
तुझ्यामध्ये अहोरात्री किती हा जीव गुंतावा?

तुझी दिसते खुबी मजला इथे दृश्यात एकेका....
मला हे ओळखू आले....न हा नुसताच देखावा!

रगाड्यातून कामाच्या कुठे मज वेळ वाचाया?
मला प्रत्येक क्षण येतो नवा घेवून सांगावा!

विसर पडतोच देवाचा, परंतू दु:ख आले की,
न चुकता त्याच देवाचा सुरू करतात ते धावा!

पहा कोणासही त्याच्या दिसे हातात मोबाइल!
जवळ हे विश्व आलेले, हरवला मात्र ओलावा!!

किती छोटे, किती साधे, असो घर आपले असते!
स्वत:चे खोपटे सुद्धा, अरे, प्रासाद मानावा!!

न लागे वेळ तोडाया, कधीही कोणते नाते....
उभे आयुष्यही लागो, परी माणूस जोडावा!

सतत रोमांचते काया, सुरांनी मारव्याच्या या;
कळेना कोण वाजवतो? असा श्वासांमधे पावा!

असे नाही न चुकतो मी, चुका होतात माझ्याही!
न चुकता मात्र मी घेतो चुकांचा रोज आढावा!!

पचवली हार की, कळते खरी जिंकायची गोडी!
पडो पदरात काहीही, नव्याने डाव मांडावा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूषणराव! शुभदीपावली!
दिवाळीचे काही नवीन?
अरे वा वा.......सर्व शेरांना उद्देशून आहे का?
अवांतर: आपण आजारी होतात असे समजते, काय झाले होते? आता कशी आहे तब्येत?
प्रा.सतीश देवपूरकर

भूषणराव! शुभदीपावली! <<<

आपल्यालाही शुभ दीपावली प्रोफेसर साहेब.

दिवाळीचे काही नवीन?<<<

एका अंकात एक गझल आणि एका अंकात कृष्णविवरे या विषयावर एक लेख छापून आला. लेखाचे मानधन मिळाले. आय एन आर हा रक्तातील घटक ऐन दिवाळीत हव्या त्या रेंजमध्ये आला. बायकोला पाडव्याची ओवाळणी कमी दिली. वाचन चालू आहे.

अरे वा वा.......सर्व शेरांना उद्देशून आहे का?<<<

नाही, ते फक्त वृत्तात आहे.

अवांतर: आपण आजारी होतात असे समजते, काय झाले होते? आता कशी आहे तब्येत?<<<

अजूनही आजारीच आहे. पण आधीपेक्षा जरा बरा आहे.

============================================

किती छोटे, किती साधे, असो घर आपले असते!
स्वत:चे खोपटे सुद्धा, अरे, प्रासाद मानावा!!

न लागे वेळ तोडाया, कधीही कोणते नाते....
उभे आयुष्यही लागो, परी माणूस जोडावा!

<<< हे शेर आवडले.

धन्यवाद भूषणराव!
वृत्तहाताळणी खटकली नाही ना?
आय एन आर म्हणजे काय? कशाने तो कमी होतो?
कामावर रजा चालू आहे का?
कोणत्या मासिकात गझल व लेख आले आहेत? इ-मासिके का?
टीप: या गझलेचा मतला कसा वाटला?
..........प्रा.सतीश देवपूरकर

मतल्याची दुसरी ओळ फार आवडली, पहिल्या ओळीतील दावा या शब्दाचे प्रयोजन लक्षात आले नाही. दावा हा शब्द कोर्टातील दावा अथवा एखाद्याने खात्रीपूर्वक काही विधान करावे या अर्थाने असतो ना? (किंवा दाखवा या अर्थी दावा, पण त्या अर्थी तो योजिलेला नसणार हे माहीत आहे).

तुझा आभासही आता मनाला वाटतो दावा!<<<<<<<
म्हणजे तुझा आभास जरी झाला तरी मन मात्र त्या आभासासही खरेच मानू लागले आहे. जणू तुझा आभास हा आभास नसून ते सत्यच आहे, म्हणजेच ती तूच आहेस असा दावा मन करीत आहे, निक्षून सांगत आहे.
भूषणराव, हा अर्थ पोचतो का पहिल्या ओळीत? नसल्यास काय पर्याय देता येईल?
.........प्रा.सतीश देवपूरकर
अवांतर: इतर प्रश्नांवर काही वदला नाहीत.....

असे नाही न चुकतो मी, चुका होतात माझ्याही!
न चुकता मात्र मी घेतो चुकांचा रोज आढावा!!

छान..!!

दावा च्याऐवजी र्‍हावा चालेल काय?
प्राची ला गच्ची असे यमक सुचवणार्‍या रावसाहेबाच्या शैलीतला हा प्रश्न आहे. Happy

असे नाही न चुकतो मी, चुका होतात माझ्याही!
न चुकता मात्र मी घेतो चुकांचा रोज आढावा!!

या ओळी आवड्ल्या.