माझ्यात तू..

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 November, 2012 - 12:40

माझ्या आभाळाच्या माथी
हासे तुझी चंद्रकोर
मोट चांदण्याची छोटी
घट्ट वेढी स्वप्नदोर

माझ्या सागरात नांदे
तुझा मोकळा तराफा
गाज होऊन निनादे
अंतरंगातल्या वाफा

माझ्या वेलीवर झुले
तुझ्या फुलांचे ताटवे
मुक मनाचा देव्हारा
गंध गाभारी पालवे

माझ्या रांगड्या ओंजळी
तुझ्या पापणीचे मोती
झिरपता ते देहात
त्याची सुखावली माती

माझी बावळी कविता
तुझ्या अक्षरांची माया
शब्दांच्या इमल्याला
तुझ्या काळजाचा पाया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुकराव तुमचा फोन नम्बर हवा होता विपूतून कळवाल का ?

-वैवकु
_______________________

कविता खूप आवडली खयाल खूप मस्त आहेत

शब्दांच्या इमल्याला>>> एक अक्षर कमी

माझ्या वेलीवर झुले
तुझ्या फुलांचे ताटवे>>>> व्याकरणानुसार 'झुले' ला 'ताटवे' फिट बासत नाही

माझ्या सागरात नांदे
तुझा मोकळा तराफा
गाज होऊन निनादे
अंतरंगातला वाफा
वाफा..म्हणजे फुलझाडांचा किंवा पालेभाज्यांचा वगैरे असतो तोच ना? (की उष्णतेमुळे येणार्‍या वाफा?)
अंतरंगातला वाफा म्हणजे काय? त्याचा आणि गाजेचा काय परस्पर संबंध?

माझ्या रांगड्या ओंजळी
तुझ्या पापणीचे मोती
झिरपता ते देहात
त्याची सुखावली माती
त्याची माती म्हणजे? मोत्यांचा संबंध मातीशी?
माफ कर कौतुकशेठ,तुझ्या कवीकल्पना काही झेपल्या नाहीत..जरा उलगडा करशील का?

>> माझ्या सागरात नांदे
तुझा मोकळा तराफा
गाज होऊन निनादे
अंतरंगातला वाफा>>
हा प्रमोदजींचा आक्षेप मात्र बरोबर आहे..'मोकळा तराफा' या सुंदर प्रतिमेनंतर गाज येणे क्रमप्राप्त, पण वाफा इथे रसभंग करतोय..
गाजेतून निनादती
अंतरंगातल्या हाका
असा एक पर्याय ? किंवा दुसरे काही अधिक छान..

वैवकु, मी मीटरमधे बसवण्याच विचारच केला नाही. मनात आलं, लिहीलं. झुले आणि ताटवे व्याकरणात बसत नस्तील. पण मनात बसतात. Happy
प्रमोदकाका, टायपो होता. दुरुस्त केलाय. सागराच्या अंतरंगात उष्ण प्रवाह असतात तसाच मनातला उचंबळ. किंवा सुर्याच्या उष्णतेने पाण्याच्या वाफा होतात तसाच तुझ्यामुळे मनातल्या गोष्टी बाहेर येतात. दुसर्‍या कडव्यात त्याची म्हणजे देहाची.
आता परतलो आहेच कवितेवर तर सगळ्या प्रतिसादकांचे आभार. Happy

मस्त कविता.
शेवटची दोन कडवी विशेष आवडली. Happy

मीटरमधे बसवण्याच विचारच केला नाही. मनात आलं, लिहीलं. झुले आणि ताटवे व्याकरणात बसत नस्तील. पण मनात बसतात. >> मस्तच!

कविता मस्तच! पण वैवकुं ना खालील मुद्द्यांसाठी अनुमोदन!

शब्दांच्या इमल्याला>>> एक अक्षर कमी

माझ्या वेलीवर झुले
तुझ्या फुलांचे ताटवे>>>> व्याकरणानुसार 'झुले' ला 'ताटवे' फिट बासत नाही

माझ्या वेलीवर झुले
तुझ्या फुलांचा ताटवा .... असे चालेल. (पण मग यमकासाठी पुढच्या ओळीतही बदल करावा लागेल!) ताटवा एकवचनी असल्याने 'झुले' हे क्रियापदही एकवचनीच हवे ना. कवितेचा आस्वाद घेताना बाधा येते, अशा चुकांमुळे असे माझे मत.

माझ्या वेलीवर झुले
तुझ्या फुलांचा ताटवा
मुक मनाच्या गाभारी (किंवा देव्हारी)
गंध त्याचा पसरावा

असा एक बदल सुचला. मनाचा गाभारा व देव्हारा ही पुनरोक्ती अनावश्यक वाटली मला. 'आशा पालवणे' असा वाक्प्रचार ऐकला आहे. 'गंध पालवणे' कधी ऐकले नाही. म्हणून मग 'पसरावा' हा शब्द योजला. Happy

मुक मनाचा देव्हारा >>>
'मूक' असा लिहितात ना हा शब्द?? 'मु' दीर्घ हवाय की र्‍हस्व. की माझा गोंधळ होतोय?

कवितेचा अर्थ आणि त्यातल्या कवी कल्पना बेहद सुरेख वाटल्या. Happy

शब्दांच्या इमल्याला>>> एक अक्षर कमी >>>

माझी बावळी कविता
तुझ्या अक्षरांची माया
माझे शब्द हे इमले
तुझ्या काळजाचा पाया

Happy

आवडली Happy