सविताची वेदना

Submitted by सौ. वंदना बर्वे on 6 November, 2012 - 13:27

आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात. फक्त माणसच भेटतात असं नाही तर त्यांचे अनुभवही भेटतात. तो अनुभव आपल्या अनुभवांशी, विचारांशी पडताळून पाहण्याचा मोह आवरू म्हणता आवरत नाही. माझ्या सारख्या स्त्रिया टिव्ही मालिका बघतात तेंव्हा नेमकं काय बघतात? अनेक पुरुषांचं टिपिकल उत्तर असेल भरजरी साड्या व भरजरी भानगडी. स्त्री ही मुळातच संवेदनशील असल्याने, ती त्या मालिकेमधल्या पात्रांशी समरस होते. त्यांचे प्रोब्लेम्स तिला आपले वाटतात. समरस व्हायला संवेदनाच असून भागत नाही, वेदनाही असावी लागते.

माझ्या छोटीला हेडगेवारमध्ये पोहोचवायला जाते तेंव्हा बसमध्ये अनेक अनुभव ऐकायला मिळतात. तिला शाळेत सोडली की मग मोकळा वेळ असतो तेवढ्यात आम्हा मैत्रिणींचे गप्पांचे फड रंगतात. त्यातून अनुभवांचं वेचण आणि माझ्या मनाला पडलेले ओरखडे मी आपणासोबत शेअर करणार आहे. ह्या सर्व गप्पात बहुतांशी अनुभव हे "स" वर्गातले असतात. म्हणजे सासू, नणंद, जाऊबाई वगैरे, वगैरे. साधारणत: एकत्र कुटुंबातले. मला मनाला भिडतात ते अनुभव मात्र ज्याच्यासाठी आपण सर्वस्व वेचतो त्या आपल्या सौभाग्याचे.

परवा अश्याच गप्पा रंगात आल्या होत्या. पण सविताचं काही लक्ष नव्हतं. हल्ली बऱ्याचदा ती हरवलेलीच असते. आमच्यापैकी कुणीतरी तिला हटकलं व ती भानावर आली.

"किदें गो किदे जाले?" निलम
"कांय ना"
निलमने मला कोपरखळी मारली. ह्यातल्या कांय शब्दामधलं "कां" आणि "य" अंतर जितकं मोठं तितका प्रॉब्लेम मोठा, हे आमच्या निलमचं लॉजिक.
"हास गो पापया. शितलान जोक सांग्ला"
"हय, हांवे आयकूंक ना"
"खंय पाविल्ले?"
मग एकदम अचानक तिच्या शेजारीणीला आठवण झाली. तिनं सगळा भांडाफोड केला. बिचाऱ्या सविताचा चेहरा बघवेनासा झाला.
"आगो तिचो घो फक्त फेसबूकार पडिल्लो आस्ता".

झालं. सगळ्याजणी फेसबूकवर चर्चा अगदी तोंडाला फेस येइपर्यंत करू लागल्या. सविताचं दु:ख तिथच उरलं.

सविताचा प्रेमविवाह. पाच सहा वर्षे झाली लग्नाला. तो तिच्यासाठी खूप जीव टाकायचा. घरच्यांचादेखिल प्रेमाला विरोध वगैरे नसल्याने लग्न सुरळीत पार पडलं. पहिली दोन वर्षे अगदी स्वप्नातल्या सारखी गेली. सविताच्या पदरी एक मुलगी आली. इथुन पुढे हळूहळू अडचणींना सुरूवात झाली. मुलीच्या संगोपनाकरिता असलेली नोकरी तिने सोडली. घरच्यांचं, मुलीचं करण्यात दिवस कसा जात असे तिलाच कळायचं नाही.

त्याच्यात बदल होवू लागला. तो कमालीचा विचित्र वागू लागला. घरात पाउल टाकल्या टाकल्या कंप्युटरच्या पुढ्यात जावून बसू लागला. चहा, रात्रीचं जेवण तिथेच. दिवसभरातल्या घरच्या कामामुळे, दगदगीमुळे सविता पडल्यापडल्या झोपायची. तो कधी येवून झोपायचा तिला कळायचही नाही. सकाळी उठून पुन्हा रहाटगाडगं सुरूच. हा बदल घडत असताना सुरूवाती सुरूवातीला वाद व्हायचे, नंतर तेही बंद झाले. वाद संपले आणि संवादही.

सविताच्या मोठ्या अपेक्षा नाहीत. परवा त्याला आवडतो म्हणून तिने मुद्दाम शिरा केला होता. वर काजू, पिस्ता बदामही सजवले होते. अत्यंत रूक्षपणे त्याने तो खाल्ला आणि ऑफिसला निघून गेला. शिऱ्याबरोबर आयुष्यातला गोडवाही नाहिसा झाला. आधी शिरा केला की कौतुकाचे वर्षाव व्हायचे. माझी आवड किती जपतेस असं सविताला म्हणत तो खूपच हळवा व्हायचा. लहान मुलासारखा सविताच्या कुशीत शिरून रडायचा.

तिला फक्त कौतुकाचे दोन शब्द हवे होते. ज्यांना ती पारखी झाली होती. सहजीवनामध्ये स्त्रीला दहा सहस्र हत्तींचं बळ यायला नवऱ्याचे कौतुकाचे दोन तीन शब्दही पुरतात. "किती राबतेस सर्वांसाठी" कौतुकाचे एवढेस्से तीन शब्द तिचे सगळे श्रम सार्थकी लावतात. तक्रार त्रासाबद्दल नाही, त्या त्रासांचं त्याला काही पडलेलं नाही ह्याचाच प्रचंड त्रास होतो. ज्यांनी जन्म दिला त्यांना सोडून ज्याच्यासाठी यावं, त्यालाच आपल्या वेदनांची जाणीवही नसावी याउपर दु:ख ते काय? त्याहीपुढे जावून आपल्या सुखातही त्याला सुख वाटू नये हे दु:ख तर मनस्वी स्त्रीला जिवंतपणी जाळतं. सविताची वेदना नेमकी हिच आहे.

सौ. वंदना बर्वे
barve.vp@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सविताला शिर्याचा फोटो काढून फेबुवर अप्लोड करायला सांगा. पहिला लाईक नवर्याकडूनच येईल.
काळ बदललाय. आजकाल नवराबायको मुलांचं कौतुकही फेसबुकावर एकमेकाम्शी शेअर करतात म्हणे.
बाकी का य नाय गॅप बद्दल चं निरिक्षण मस्तच.
कोंकणी संवाद वाचायला मजा आली.

फक्त माणसच भेटतात असं नाही तर त्यांचे अनुभवही भेटतात
>>> +१०
शिऱ्याबरोबर आयुष्यातला गोडवाही नाहिसा झाला.
>>> मस्त वाक्य आहे
त्याहीपुढे जावून आपल्या सुखातही त्याला सुख वाटू नये हे दु:ख तर मनस्वी स्त्रीला जिवंतपणी जाळतं.
>>
विपु चे एक वाक्य आहे त्याची आठवण आली. एकटेपणाचे दुखः मोठे, पण पार्ट्नर असुनही त्याला आपले मन कळु नये हे दुखः त्याहुन मोठे कि असच काहितरी.

अतिशय साध्या सुटसुटीत भाषेतला लेख आवडला... पुलेशु

दु:खी कष्टी होण्यापेक्षा स्वैपाक, काम करणं बंद करा, स्वतःही फेबुवर पडीक व्हा २-४ दिवस..
घर घाण दिसलं, जेवायला मिळालं नाही की आपोआप किम्मत कळेल.

नाक दाबलं की तोंड उघडतं हा मंत्र लक्षात ठेवा म्हणाव सविताला. Happy

तक्रार त्रासाबद्दल नाही, त्या त्रासांचं त्याला काही पडलेलं नाही ह्याचाच प्रचंड त्रास होतो. >> + १
माझ्या ओळखीतल्या २ स्त्रियांचे अनुभव - दोघीही नोकरी करत नाहीत. पहिली अति अल्पसंतुष्ट ,सतत न बोलता घरासाठी राबणारी . फक्त केलेल्याला केलं म्हणावं एवढीच माफक अपेक्षा (तीही पूर्ण होत नाही.) . तर दुसरी अती आग्रही. हे असंच व्हायला हवं,अमुकच पाहिजे, अमुकच नको, मला असलं खपत नाही या कॅटगरीतली ( काम यथातथाच पण ठाशीव बोलणे सतत) . घरातले सर्व तिच्या कलाने,मताने चालतात. तिला ज्या गोष्टी चालणार नाही तर त्या गोष्टी घरात होत नाहीत. हल्लीच्या मार्केटिंग च्या जमान्यात ठामपणाने आपल्या अपेक्षा मांडता याव्यात . (तसंही पुरुष या प्राण्याला न सांगता स्त्रियांच्या अपेक्षा कळत नाहीत . काही अपवाद असतीलही आणि त्यांच्याबद्द्ल पूर्ण आदर आहे.)

दोघानाही एक्मेकाना काय हवे आहे ते नेमके कळत नाही आणि एकमेकांना सांगतही नाहीत. एक्मेकांच्या गरजा काय आहेत हे नीट बोलुन समजावून घ्यावे.

हल्लीच्या मार्केटिंग च्या जमान्यात ठामपणाने आपल्या अपेक्षा मांडता याव्यात .>>=+११११११
पण सगळ्याना जमेलच अस नाही...:(

खरच... चिखल्याला मोदक..साध्या भाषेत सहज विचार मांडलेत. प्रश्नं आहेत हे खरच...
उत्तरं खरच आपली आपण शोधायची असतात. ज्याला आपण सविताचा प्रश्नं म्हणतोय त्यामागे तिच्या नवर्‍याचाही काही प्रश्नंच आहे... समस्या असेल.
थोबाडपुस्तक ही समस्या नाहीये... तिचा नवरा अन तिच्यातला संपलेला संवाद ही समस्या आहे.
तू माझ्यासाठी किती राबतेस... हेच हवं असतं का स्त्रीला?
आज ऑफिसात इतका पकलो, गं. खरच थकलोय ह्या रोजच्या कटकटींना... हे जरी नवर्‍यानं बोलून दाखवलं ना, तरी स्त्रीला कळत रहातं की दोर गळून पडलेला नाही.
संवाद हा एकमेकांची स्तुती ह्यापुरताच नसतो... नसावाच. मनातली शल्यं, अगदी क्षुल्लक बोच बोलून दाखवण्यानंही आपण जवळचे रहातो.
हा... आता ह्या सविताचा नवरा हा फेसबुकड्याच झालाय... हे नक्की असेल तर मग माझ्या ह्या पोस्टला काही अर्थच नाही.

सविताला मायबोली वर यायला सांगा. घरात एकच कॉप्युटर असेल तर नवर्‍याच्या आधीच स्वतः लॉगीन करून बसा. सर्व ठिक होइल.
घरात दुसरा कप्युटर असलाच तर स्क्रीन फोडून ठेवा चुकीने. Proud
फेसबूक पेक्षा मायबोली जालिम उपाय आहे असल्या अडचणीवर( फेसबूक सारख्या...).
नवरा घरी आला तरी ढूंकून न बघता मायबोलीवर पोस्टी टाकत रहा, लॅपटॉप कडे बघून हसत रहा, नवराच चक्रावून जाईल व शिरा, स्वंयपाक बनवायला लागेल. (हे पाहिलेय मी.. हां. ). Proud

सिमन्तिनी,

मनस्वी म्हणजे स्वत:च्या इच्छेने जगणारी. मनापासून घरदार संभाळणारी गृहीणी

एच.एच., साती, चिखल्या, नानबा, माशा, सुसुकू, अनासपुरे, दाद, झंपी सिमन्तिनी आपला प्रतिसाद आवडला.

सर्वांना धन्यवाद.

सवीता हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात नवरा बायकोचा कमी होत चाललेला संवाद, उपलब्ध वेळेत दुसरीकडे वळविलेले लक्ष हे सामंजस्याने सोडवून सुटण्यासारखे लहान प्रश्न आहेत. वाद टाळायचे म्हणून बोलायचच नाही असं म्हणून संवाद हरवलाय. यात चूक कोणाची हा प्रश्न महत्वाचा नसून त्याबद्दलची आस्था संपतेय हे दु:खदायक आहे. नानबांचा आणि झंपींचा उपाय मजेशीर वाटला. माशांनी म्हटल्याप्रमाणे आपलं मत व्यवस्थित न मांडता येणं हा स्वभावदोषही कारणीभूत असू शकतो.

आपल्या प्रतिसादांनी हुरूप आला. ही लेखमाला, गोव्यातील "दैनिक हेराल्ड" ह्या मराठी दैनिकात दर शनिवारी सुरू आहे. मायबोलीवर शेअर करावसं वाटलं म्हणून केलं. आणखी नवीन काही सुचलं तर अवश्य लिहीन.

सौ. वंदना बर्वे

वंदनाजी, प्रतिसाद बद्दल तुमचा अभिप्राय कळवलात धन्यवाद.
पन मला मनस्वी चा अर्थ विरोधाभास वाटला.

स्वतःच्या इच्छेने जगणारी असेल तर मग असे प्रश्ण नाही ना पडणार? की घरातच रमणारी ही एक इच्छा असणारी..

-खूप तोकडे ज्ञान आहे मला. तेव्हा राग नसावा.

छान लिहिलय. कोकणी येत नाही त्यामुळे ते संवाद फक्त कळले नाहीत, पण त्यानी काही फरक पडला नाही.
>> तसंही पुरुष या प्राण्याला न सांगता स्त्रियांच्या अपेक्षा कळत नाहीत
न सांगता कोणालाच कोणाच्या अपेक्षा कळत नसतात...

'स्पाउज' - शोभा डे च्या पुस्तकात एक वाक्य वाचलं होतं आणि ते इतकं मनापासुन पटलं, ते इथे लिहायची आवश्यकता वाटते आहे. शोभा डे ने लिहिलं होतं कि नवरा म्हणजे काही देव नाही कि तुमच्या मनातली गोष्ट त्याला अंतर्ज्ञानाने समजेल. जे हवं आहे, जे चुकतं आहे, जे आवडतं किंवा टोचतं आहे ते तोंड उघडुन सांगा ना. माझ्या मनातलं त्याला कळत नाही, भावना समजत नाहीत हे म्हणुन दु:खी होणं किती मुर्खपणा. प्रत्येक गोष्ट सांगायला कशाला हवी, त्याने समजुन घ्यावं ना -ही इच्छा म्हणजे बिचार्‍या नवर्‍यावर अन्यायच की. Happy

सविताच्या शिर्‍याला त्याने कॉम्प्लीमेंट दिली नाही तर ती विचारु शकते कि ' चांगला झाला आहे कि नाही'. तेव्हा तर तो छान झाला होता म्हणेल. अगदीच माझ्यासारखी आगावु असेल तर दुसर्‍याच शब्दात म्हणु शकते कि ' चांगला दोन प्लेट्स शिरा हापसलाच म्हणजे नक्कीच चांगला झाला होता. हो ना?' तो बिचारा हो नाही म्हणेलच कि. Wink

स्वतःच्या इच्छेने जगणारी असेल तर मग असे प्रश्ण नाही ना पडणार? की घरातच रमणारी ही एक इच्छा असणारी..

-खूप तोकडे ज्ञान आहे मला. तेव्हा राग नसावा. >> +१००

तुमच्या लिखाणातला साधेपणा आवडला.
बाकी बरेचसे पटले नाही. विशेषत: त्यागमूर्ती गृहिणीचे अवास्तव उदात्तीकरण. पण ते असो.
मनस्वी या शब्दाचा अर्थ पटण्यासारखा नाही.

नानबांचा आणि झंपींचा उपाय मजेशीर वाटला.<<
का बुवा?
म्हणजे प्रथमदर्शनी उपाय मजेशीर वाटला तरी नवर्‍याला त्याच्या स्वतःच्या औषधाची चव मिळाली की येईल की सुतासारखा सरळ...

सहजीवनामध्ये स्त्रीला दहा सहस्र हत्तींचं बळ यायला नवऱ्याचे कौतुकाचे दोन तीन शब्दही पुरतात. "किती राबतेस सर्वांसाठी" कौतुकाचे एवढेस्से तीन शब्द तिचे सगळे श्रम सार्थकी लावतात.

>> बापरे.. लोक अजून कुठल्या काळात जगताहेत..
('हि एक अफवा आहे' असं लिहिण्याचा मोह आवरतेय मोठ्या मुश्किलीने)
त्या फेसबुक्ड्या नवर्याने रोज हे वाक्य न चुकता म्हटलं आणि परत फेसबुकिंग केलं तर तुमच्या सविताला पुरणार आहे तेवढेच??

फेसबूक हे छंद नसून व्यसनासारखेच आहे... त्यामुळे घातकच आहे..
बाकी नवर्‍याला आपली स्वताची स्पेस ही हवीच..
पण जर त्यानादात बायकोकडे दुर्लक्ष होत असेल आणि ते त्याला सांगूनही कळत नसेल किंवा कळूनही वळत नसेल तर मात्र जशास तसे..
त्याच्याकडेही दुर्लक्ष करायला सुरूवात करा, ते ही तसेच एखादा छंद जोपासतेय असे दाखवून..
जेव्हा त्याचे फेसबूक चालू असेल तेव्हा तो विचार करेल की बरे आहे ती तिच्या छंदात आणि मी माझ्या छंदात बिजी.. मात्र जेव्हा तो तिथून लॉगआऊट होईल तेव्हा त्याला नक्कीच बायकोची गरज भासणार..
पाच मिनिटे चहा उशीरा मिळाली तरी त्याला चिडचिड होईल, बस हाच तो क्षण, हीच ती वेळ... वाद न घालता त्याच्यामुळे आपलेही असेच होते याची जाणीव करून देणे उत्तम.. Happy

स्पाउज' - शोभा डे च्या पुस्तकात एक वाक्य वाचलं होतं आणि ते इतकं मनापासुन पटलं, ते इथे लिहायची आवश्यकता वाटते आहे. शोभा डे ने लिहिलं होतं कि नवरा म्हणजे काही देव नाही कि तुमच्या मनातली गोष्ट त्याला अंतर्ज्ञानाने समजेल. जे हवं आहे, जे चुकतं आहे, जे आवडतं किंवा टोचतं आहे ते तोंड उघडुन सांगा ना. माझ्या मनातलं त्याला कळत नाही, भावना समजत नाहीत हे म्हणुन दु:खी होणं किती मुर्खपणा. प्रत्येक गोष्ट सांगायला कशाला हवी, त्याने समजुन घ्यावं ना -ही इच्छा म्हणजे बिचार्‍या नवर्‍यावर अन्यायच की. )+१

माझा नवराही स्वतः हून कधी पदार्थ आवडला असं सांगणार नाही. पण माझी अपेक्षा तर असते जी कधी पूर्ण होत नाही .
शेवटी, त्यावरून वाद घालण्यापेक्षा आणि वाईट वाटून घेण्यापेक्षा, पदार्थ पुन्हा मागून घेतला म्हणजे आवडला असं मीच समजून घ्यायला सुरुवात केली.

नीधप, पियुपरी +१

मी सामान्य व्यक्ती आहे, माझ्यात दहा सहस्र काय एका हत्तीचंही बळ नाही आणि ते मिळवावं अशी महत्वाकांक्षाही नाही. Proud

प्रत्येक संसारात काही कामाची वाटणी असते. ती करतानाच शक्यतोवर समानता आणावी असं माझं मत आहे. आणि एकदा ठरल्यावर मी जी काही रोज माझी कामं करत असेन, त्यात काहीही कष्ट होत असतील तरी मला कुणाचंही आंजारूनगोंजारून कौतुक नकोच असणार. घरसंसार दोघांचा आहे. तो चालवताना मिळून जोडीने निर्णय होताहेत, परस्पर सामंजस्य आहे असं असलं तर मला चार शब्द कौतुकाचे रोज ऐकवलेच पाहिजेत असं काही नाहीये ना. कितीही जवळचे मित्र्/मैत्रिणी असतील, आईवडिल असतील तर काय प्रत्येक वेळी त्यांच्या प्रत्येक गोष्टीची तारीफच करतो का आपण? न बोलूनही जाणीव असतेच की कोण कुणासाठी किती आणी काय करतंय ते....

प्रश्न आहे संवाद संपण्याचा - त्याचं कारण फेसबुक नव्हे तर त्याचा परिणाम म्हणून नवरा फेसबुकिंग करतोय असं मला वाटतं. संवाद संपायचं कारण इतकं फुटकळ असू शकत नाही हे कुणीही संसारी व्यक्ती मान्य करेल. त्या मागे निश्चितच आणखीही काही कारणपरंपरा असणार....

आजच्या धकाधकीच्या जीवनात नवरा बायकोचा कमी होत चाललेला संवाद>>> आधिच्या काळात तर संवादच नव्हता. नवरा-बायको घरच्या थोरा-मोठ्यांच्या पुढे एकमेकाकडे बघायचे सुद्धा नाही. हे संवादाचं उलटं गणित कुठून ऐकलं तुम्ही? कि तुमचा स्वत:चा तसा अनूभव आहे?

एम, ' आमच्यावेळी नव्हतं हो असं, एवढी तीन पोरे झाली पण मी यांच्याशी कधी एक वाक्यही बोलले नव्हते' या सुप्रसिद्ध डायलॉगचि किंवा 'त्यांनी म्हटलं कोण ते , मी म्हटलं मी ते' या गाण्याची आठवण झाली.
Happy

हो, बहुदा हादग्याचं का अस्लच कायसं गाणं आहे.
लग्नानंतर नवरा आपल्याशी बोलला याचं त्या नववधूला इतकं अप्रूप वाटत असतं की ती मैत्रिणीला कौतुकाने सांगत असते ' आज काय गंमत झाली माझा आवाज ऐकून हे म्हणाले कोण ते? आणि मी म्हणाले मी ते. सगळ्याना चुकवुन चक्क बोललो एकमेकांशी दोन भली मोठ्ठी वाक्ये! Wink
तुला पूर्ण गाणं हवं असेल तर आईला विचारून बघते तिच्या लक्षात आहे का ते.

Pages