कळेना लागला माझ्या जिवाला ध्यास कोणाचा?

Submitted by सतीश देवपूरकर on 3 November, 2012 - 23:10

गझल
कळेना लागला माझ्या जिवाला ध्यास कोणाचा?
जिथे जातो तिथे होतो मला आभास कोणाचा?

खळाळू लागले गात्री सुगंधी पाट रुधिराचे......
मला गंधाळणारा हा गुलाबी श्वास कोणाचा?

घरी आपापल्या गेले ऋतू असतील एव्हाना;
इथे रानात एकाकी झुरे मधुमास कोणाचा?

कधी ऎसे कधी तैसे, मिळाले सर्व नजराणे!
फुलांचा हार कोणाचा, कधी गळफास कोणाचा!!

कसे हे सोडवू कोडे? कसे हे चेहरे वाचू?
मला ना बांधता आला कधी अदमास कोणाचा!

पुन्हा मी मोकळा झालो, पुन्हा दे शाप एखादा....
नव्याने सांग मी भोगू अरे, वनवास कोणाचा?

तुला मी सोबतीसाठी किती हाका दिल्या होत्या;
कुणाला साद द्यावी अन् मिळे सहवास कोणाचा!

तुला जो भेटला, ज्याला तुझा दृष्टान्तही झाला;
कधी वाटेल का त्याला असा दुसवास कोणाचा?

मला आता न माझाही भरोसा राहिला जेथे;
करावा सांग मी तेथे कसा विश्वास कोणाचा?

उपाशी राहिलो का मी, कळाले आज पहिल्यांदा!
कधी बळकावला नाही असा मी घास कोणाचा!!

न देता आहुती होतो पुरा का होम कोणाचा?
यशस्वी यज्ञ का होतो विनासायास कोणाचा?

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला आवडला.

दुसरा शेरही छान पण रक्ताचे पाट ही प्रतिमा चपखल वाटली नाही तिथे.

बाकीचे शेर तितके भिडले नाहीत.

विजतयराव! धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
खळाळू लागले गात्री सुगंधी पाट रक्ताचे....
मला गंधाळणारा हा गुलाबी श्वास कोणाचा?<<<<<<

इथे आम्ही म्हणतो रक्ताचे सुगंधी पाट माझ्या गात्रांमधून खळाळू लागले, असा कुणाचा गुलाबी/सुंदर/सुगंधीत श्वास मला गंधाळून टाकतो आहे?
पाट या शब्दाचा अर्थ बागेतील/शेतातील झाडे/पिके यांसाठी नदीचे किंवा विहिरीचे पाणी खेळवणा्याकरता केलेला लहान कालवा असा घेतला किंवा लहान कालव्यातून वाहणारे पाणी असा घेतला. म्हणून ही प्रतिमा आम्हास इथे योजावी वाटली.
गात्ररूपी शेतातील खळाळणारे रक्त म्हणजे जणू कुणी सुगंधी रक्ताचे पाटच आहेत जे आमच्यासाठी खळाळत आहेत, वहात आहेत. ते का सुगंधी झालेत तर कुणाचा तरी सुगंधी श्वास आम्हास सुगंधित करत आहेत!
...........प्रा.सतीश देवपूरकर

 

रक्ताचे पाट वाहणे हा शब्दप्रयोग आजवर बव्हन्शी तीव्र हिंसा झाली आहे असे सुचावण्यासाठी वापरला गेला आहे. या इथे त्यामुळेच तो जरा कसनुसा वाटतो इतके मात्र खरे व असे वाटणे साहजिकही आहेच म्हणा !!
असो ..

माझ्या कवितेतील काही ओळी आठवल्या ....................

येत्याच समरकाली त्या कोरड्या 'आखाती'
गवतास गर्द 'हिरव्या' फुटतील रक्त पाती
रक्ताळल्या नद्यांचे अन वाहतील पाट
होईल लाल जलधी येईल 'लाल' लाट

(कविता : नाँस्त्रदमस आणि मान्सून)

वैभवा!
रक्ताचे सुगंधी पाट असे म्हटले आहे.
इथे तीव्र हिंसा असा अर्थ कसा होईल?
परत सानी मिस-यात मला गंधाळणारा हा गुलाबी श्वास कोणाचा असे म्हटले आहे ज्यावरून हे रक्ताचे गात्रांतून खळाळणारे सुगंधित पाट म्हणजे कुठल्याही हिंसेचा निर्देश करत नाहीत!
वरील ठळ्क शब्द प्रेम भावनेचा निर्देश करतात!
.........प्रा.सतीश देवपूरकर

मी सुगंधी बद्दल काही म्हणत नाहीये सर रक्ताचे पाट बद्दल जनरल मुद्दे सान्गत होतो

अता पाट रक्ताचे आहेत ..मग नैसर्गिकरित्या जरा भीषण वाटते की नै ? ...मग शयराने ही प्रतिमा वापरली आहेच वर शेर तर रूमानी करायचा ठरला असेल त्याचा..... मग त्या पाटाला सुगंधी म्हणावेच लागणार ही शायराची मजबूरी सूज्ञ वाचक समजून घेतात !!

असूद्या असे होते कधी कधी आम्ही तुम्हाला दोष नाही लावत आहोत सर !!

मी फारफारतर एक क्लुप्ती सुचवूका? रक्ताचे हा शब्द जरा भयावह वाटतो ..रक्त पाहूनच अनेकाना भोवळ येते कि नै तसे कहीसे...एक आयडिया करा रक्ताचे ला "रुधिराचे" करा हा शब्द जरा प्रसादिक आहे त्यामुळे रक्ताचे पाट मुळे जो फील येतो तो नाहीसा होईल ......हा पहा असा

खळाळू लागले गात्री सुगंधी पाट रुधिराचे
मला गंधाळणारा हा गुलाबी श्वास कोणाचा?

अपला नम्र
वैभवा !!

वैभवा!
चांगला बदल आहे. पटला व भावला सुद्धा!
धन्यवाद योग्य बदल सुचवल्याबद्दल!
शेरात बदल करतो आहे.
..........प्रा.सतीश देवपूरकर