सल

Submitted by आशूडी on 3 October, 2008 - 10:08

आज घरामधे वातावरण खूप कोंदट होतं. एका नकोशा शांततेचे.. पाऊस सुरू व्हायच्या आधी आभाळ भरून आलं की धड उजेड नाही धड वारा नाही अशी परिस्थिती असते ना तसं. खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं.. कधी एकदाचा पाऊस पडून आपलं नेहमीचं नितळ निळंभोर आभाळ आपल्याला दिसतंय असं होऊन गेलं होतं..

गेले दोन दिवस आज्जीला अजिबात बरं वाटत नव्हतं.. वय वर्षं ८८! सबंध आयुष्य अपार कष्ट करण्यात गेलेले.. तिच्या आयुष्यभर केलेल्या देवाधर्माचे सात्विक तेज तिच्या चेहर्‍यावर सतत झळकत असे.. दिसायला आजही अतिशय सुंदर.. गोरापान वर्ण.निळे डोळे.. नवर्‍याचा तुटपुंजा पगार अन नोकरीची धरसोड वृत्ती या सार्‍याशी तडजोड करत छोटे मोठे उद्योग करत तीन मुलं आणि एक मुलगी यांना हिमतीने मोठं केलं.. त्यातला मधला मुलगा सदू थोडासा बुध्दीने कमी... त्यामुळे कायम घरीच..त्याची आजन्म काळजी त्या माऊलीच्या वाट्याला "घेतला वसा टाकू नये" सारखी पाचवीला पुजलेली. बाकी दोन्ही मुलं बँकेत नोकरीस लागली.. यथावकाश लग्नं झाली..त्यांचे संसार सुरू झाले.. मुलीचाही नोकरी संसाराचा पाठशिवणीचा खेळ सुरू
झाला.. आता राहता राहिली काळजी फक्त सदूची.. सगळे मार्गाला लागले.. आता याचं कसं होणार!!

सदूला व्यवहार अजिबात कळायचा नाही. कुणीही त्याला फसवू शकत असे. त्याच्या भावांनी त्याला स्वत:च्या पायावर उभं करायचे खूप प्रयत्न केले.. कुठं उदबत्तीचे पुडे विक.. दुकानात मदतनीसाचं काम कर्..पण यश आलं नाही.. एकतर सदू हा माल कुणाला तरी अतिशय स्वस्तात विकून यायचा आणि तोटा व्हायचा. त्याला कष्टाचे काम करू द्यायला आजी तयार नसायची.. त्याला त्रास होतो.. खूप काम पडतं तिथं असं म्हणून त्याला पाठीशी घालायची.. साहजिकच तिची आईची माया हे बोलत असली तरी नुकसान सदूच्या आयुष्याचे होत होते. हे दोन्ही सुनांना कळत होते.. मुलांना कळत होते.. पण आईच्या मायेपुढे सारे हतबल होत होते. बरं, एका माणसाला सांभाळणे कुणालाच जड नव्हते..अशा रितीने सदू घरीच राहू लागला..

पण कालांतराने 'बाकी दोघांना काय त्यांची बायकामुलं आहेत काळजी घ्यायला...आपल्या सदूला कुणी नाही आपल्या नंतर ' ही जाणीव आजीच्या मनात घट्ट मूळ धरू लागली.. त्यातून तिच्याही नकळत ती बाकीच्यांपेक्षा त्याची जास्त काळजी करू लागली. घरातले सगळे नोकरीसाथी बाहेर गेल्यावर मुद्दाम त्याच्यासाठी वेगळे पदार्थ करणे.. सगळ्यांच्या बरोबरीने त्याला काम करू न देणे असे प्रकार सुरू झाले.. तिची माया दिवसेंदिवस आंधळी होत होती. आजोबा वारंवार असांगत असत, की आपण त्याला आयुष्याला पुरणार आहोत का? त्याला त्याच्या पायवर उभं राहू दे.. शेवटी आपली मुलं आणि सुनाच त्याला बघणार आहेत. तू त्यांच्यावर असा अविश्वास दाखवत जाऊ नको. पण तेव्हा आजीने त्यांचे ऐकले नाही. कारण तेव्हा ती स्वतः सगळं करू शकत होती. त्याच्यावर घरातली दोनच कामे असायची - पूजा करणे आणि पाणी भरणे. पण तीही करायला आता तो अळंटळं करू लागला. हे स्वाभाविकच कुणालाही पटण्यासारखे नव्हते. या ना त्या कारणावरून घरात वाद होऊ लागले..आणि गोकुळासारखं नांदणारं ते घर विभक्त झालं! धाकट्या सुनेला घरात मदतीची गरज असल्याने तिने सदूला सांभाळायचे तर मोठ्या मुलाला दोन्ही मुलीच असल्याने आजीने त्यांच्याजवळ राहणे पसंत केले. आजोबांना जाऊन तोपर्यंत वर्ष होऊन गेले होते.

..आजीचं आता वय झालेलं होतं जवळपास ८५.. गेल्या पाच वर्षात तिला प्रचंड डायबेटिसमुळे एकाच पायाला २-३ वेळा काही कारणाने फ्रॅक्चर झालेलं होतं.. एका पायाचा अंगठा गँग्रीन मुळे काढावा लागला.. त्यातच तीनदा हार्ट ऍटॅक येऊन गेले. तिसर्‍यांदा झालेल्या फ्रॅक्चरमुळे तिच्या नडगीचे हाड थोडे वाकडे झाले होते. त्यामुळे तिला आता कधीच उभे राहता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. कारण त्यासाठी करावे लागणारे ऑपरेशन तिला या वयात झेपणार नाही अन त्याचा फारसा उपयोगही होणार नाही असे त्यांचे मत होते.

एवढे सगळे असूनही तिची सदुबद्दलची काळजी काही कमी होत नव्हती. उलट आता तर ती जास्तच वाढली होती. कारण आता ती थकली होती. ती स्वतः काही करू शकत नव्हती. त्यामुळे आता उठता बसता तो जेवला का ,बरा आहे ना याची चौकशी ती सगळ्यांकडे करत असायची. सुरुवातीला दोन्ही सुनांना लोकांसमोर अतिशय कानकोंडे वाटायचे.. की आम्ही त्याला आयुष्यभर सांभाळत असून आमच्या बरोबरीने वागणूक देत असूनही ह्यांचा आपल्यावर विश्वास नाही याचे त्यांना तीव्र दु:ख व्हायचे.. कधी कधी संतापही यायचा. पण आजीचे वय, तिची नाजूक परिस्थिती पाहून त्या गप्प बसायच्या.आता तर शेजार्‍यापाजार्‍यांनाही कळून चुकले होते की सुना अतिशय नीट वागत असूनही आजीची वेडी मायाच तिला असे प्रश्न सतत विचारायला लावते आहे.

..पण अशी माया काय उपयोगाची जी आपल्या मुलाला निष्क्रीय करून सोडते? नुसती काळजी करून जर प्रश्न सुटत असते तर जगरहाटी केव्हाच बदलून गेली असती.. आता तिची तब्येत इतकी खालावली होती की तिला अंथरूणातून उठून बसणे शक्य होत नव्हते. आता खरे तिने सुखा समाधानाने डोळे मिटण्याचे दिवस.. भरले घर्..मुलांचे हसते नांदते संसार.. नातवंडच काय पण पतवंड बघायचं सुख देवानं तिच्या पदरात टाकलेलं.. पणतू झाला तेव्हा मुलाने मोठ्या कौतुकाने तिच्यावर सोन्याची फुलं उधळून तिचा पणतूदर्शन सोहळा सर्व नातेवाइकांना मुद्दाम आमंत्रण करुन केलेला..

... पण तिची जीवनेच्छा संपत नव्हती. सदूच्या काळजीने तिला भ्रमिष्ट करून सोडले होते. कोणत्याही उपायाने सांगून तिला पटत नव्हते की सदूची काळजी घ्यायला बाकी सारे आहेत..जोपर्यंत तुला शक्य होते तोवर तू केलेस्..आता बाकी मुलं सुना पाहतील..तू निश्चिंत रहा..पण म्हणतात ना तुमची इच्छाशक्ती तुम्हाला जगायला भाग पाडते...तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणू शकते..त्याच जोरावर आजीने इतकी आजारपणे झेलली होती.. पण आता तिचे हाल कुणाला बघवत नव्हते..तिने आजतागायत देवाचे धर्माचे इतके करूनही देव तिला ही कशाची शिक्षा देतो आहे असे वाटावे इतपत.. आपलं आयुष्य नको होईपर्यंत असणं हे पण क्लेशदायकच नाही का? पण देवही म्हणतो ना, जोवर भक्त मला 'आपला' मानून मला हाक मारत नाही तोवर मला त्याच्यापर्यंत पोचता येत नाही. जर तुम्ही आजही संसारपाशात गुरफटला असाल तर मी तुम्हाला मुक्तीकडे नेऊ कसा? आजीचं नेमकं हेच होत होतं. तिचा सारा जीव सदूमधे गुंतला होता. ती त्याचे पाश सोडवू शकत नव्हती. जिवाच्या आकांताने जगण्याची धडपड करत होती. तिची ही धडपड आता असह्य होत होती.

..नेहमी हवीहवीशी असणारी आजी आता यातून सुटली तर बरं असं आपल्या अंतर्मनाला का वाटतंय याचा सल प्रत्येकाच्या मनात होता.तिच्याशी असलेले नात्यांचे बंध जो तो आपापल्या परीने सोडवून घेत होता..घशात येणारे हुंदक्यांचे कढ घशातच दाबत.. पण तिच्या मनाच्या खोलवर गुंतलेला तो एक चिवट धागा मात्र तिला यातून सोडता येत नव्हता...आपली माणसं कुणाला नको असतात?? पण जर त्यांचे होणारे हाल त्यांच्या सहन शक्ती पलीकडचे असतील तर "देवा , यातून सोडव, या यातना संपव.." असे दान मागण्यापलीकडे आपण काय करू शकतो? ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्याच मृत्यूचे दान त्याच विधात्याकडे मागण्याचे दुर्भाग्य नशिबी आलेले कपाळकरंटे आपणच! आज घरात प्रत्येकाच्या मनात हेच भाव होते. धड ना पाऊस पडत होता... ना ऊन पडत होते.. नितळ निळ्या आभाळासारखी आपल्या मायेचं छत सार्‍यांवर धरणारी आजी आज अत्यवस्थ होती..

गुलमोहर: 

मी हे हल्लीचं अनुभवलयं. त्यामूळे कथा सहज आली. हे असं "मर्सी किलींग" मनात त्याच्याच येतं ज्याला ते दु:ख जाणवतं. कथा आवडली मला.

आशू, छान लिहिली आहेस कथा...... माझ्या आजीचं आयुष्य जवळ जवळ ह्याच स्टोरी लाईनने गेलं... म्हणून ही कथा जास्त भावली. पण सुदैवाने तिचे प्रश्न देवाने लवकर सोडवले आणि तिचं स्वतःचं असं आयुष्य तिला १५ वर्ष तरी जगायला मिळालं.....

आशु, चांगली आहे ग कथा.. अश्या आई-आजी पाहिल्या आहेत त्या आठवल्या..

आशु,
आत्ता वाचली तुझी कथा आणि मला माझे आजोबा आठवले. त्यांना ही माझ्या एका काकाची अशीच काळजी लागून राहीली होती. शेवटच्या काळात ते कुण्णालाही ओळखत नव्हते, फक्त त्याला ओळखत होते. अर्थात त्यांच्या आजारपणात त्याने अजोबांची सर्वात जास्त काळजी घेतली होती.

छानंच लिहीली आहेस कथा, आणि भाषेचा ओघ एकदम सहज. Happy

पुढिल लिखाणासाठी खूप शुभेच्छा! Happy

कौतुक, मंजू, ऍनामीरा, आणि दक्षिणा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद!
जरा वेगळा विषय सुचला म्हणून लिहायला घेतली इथेच एकदम! मला वाटतं अजून एक दोन वेळा रफ्-फेअर करत बसले असते तर अजून छान करता आली असती. पण पुन्हा पहिल्या झटक्यात जे जमतं त्याची सर येणार नाही म्हणून तशीच ठेवली... Happy
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

मस्त विषय आणि कथा ! रफफेअर नाही केलस तेच जास्त छान झालं नाहीतर यातला सहजभाव जडजड शब्दांखाली दडपला असता.
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

आशु , खुप छान आहे कथा. एकदम कस सहज आणि सरळ शब्दात मांडल आहे तुम्ही.

आशू, सुरेख लिहिलयस. आणि सहज ओघवतं आहे.

आशू, थोडे अधिक परिच्छेद करता आले तर बघ ना.
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

दाद : हो गं .. बरोबर आहे तुझं.. परिच्छेद करायला हवेत.. पण मी तीन चार वेळा प्रयत्न केला तरी ते नुसतंच नवीन ओळीवर येतंय.. सुरुवातीची थोडी रिकामी जागा येतच नाहीये.. Sad
असो. चाफा, सुप्रभात, दाद तुमचे प्रतिसाद वाचून खरंच खूप छान वाटलं.. Happy
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

आपण कट्ट्यावर गप्पा मारत बसलो आहोत असं वाटतंय मला तरी.
अगदी सहज ओघवतं Happy
सही है, लिखते रहो Happy

दाद ला मोदक Happy

आशू, छान लिहिली आहेस कथा. शैली मनापासून आवडली.

आशू ,
प्रत्येकाच्या आजोबा आजीची कथा थोडया फार फरकाने अशीच असते.आजोबा आजी असणं
हे सुदॅव परंतु त्यांचा मृत्यू हा क्लेशदायकच असतो.तुझी कथा वास्तवतेमुळे विशेष आवडली .

छानच लिहिलं आहेस...

आशु,
छान लिहिलं आहेस---
भावना पोहचवल्या आहेस--त्यांना धक्का न लावता.
अनघा
----------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

राज्या, आयटी, बी,सरिविना, ज्यो, अनघा.. खूप खूप धन्यवाद! तुम्ही सारे जण इतकं प्रोत्साहन देता ना की पुढचं लिहायला अजून हुरुप येतो..पण नुसतंच कौतुक नको.. काही चुकलं असेल ..खटकलं तरी सांगा.. Happy
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

ओघवतं आणि सोपं...
छान लिहितेस तू...
असंच छान साहित्य येऊ दे...
दाद ला अनुमोदन.
शुभेच्छा... Happy

धन्स महेशदा..
अरे, सगळे दाद ला अनुमोदन देताय्..पण मी पुढे जी शंका लिहिली आहे त्याचे उत्तर द्या ना..
पण मी तीन चार वेळा प्रयत्न केला तरी ते नुसतंच नवीन ओळीवर येतंय.. सुरुवातीची थोडी रिकामी जागा येतच नाहीये.. >> कसे करू परिच्छेद? Uhoh
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

(मोदकांनी पोट भरलं अगदी... Happy )

परिच्छेद म्हणजे एक ओळ मधे सोडलीस तरी चालेल गं. सुरूवातीला जागा किंवा सोडता येत नाहीयेत नाही?
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया

धन्यवाद दाद! Happy
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

आशुडे... किती सुरेख लिहिलंस गं! जणुकाही कोणीतरी जवळ बसुन मनातलं स्वगत बोलतंय आणि आपण कधी त्या अनुभवामधे ऐकता ऐकता तल्लीन होऊन जातो कळतचं नाही. अनुभव करुण होता... पण लिखाण सुखावह वाटले. छान लिहितेस... अजुन येऊ देत लवकर लवकर.

**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

आशु,

छान आहे कथा. असेच सुन्दर लिहित राहा.

छान ! साधी आणि सरळ कथा! असं होतचं नाही का? शेवटी आईची माया!