शामल आपटेंना काय झालं?

Submitted by pradyumnasantu on 24 October, 2012 - 20:46

झाडून काढूया सर्व कोपरेकोने
वर्षभर जरी ते भरून गेले धुळीने
करू स्नान, लावूनी सुगंधी सुंदर उटणे
साजरा करू दसरा आनंदाने
*

दे केशर वेल्ची जायफळाला कुटुन
मी घेते पटकन चक्क्याला या घोटून
पुरी तळेन मी पण कुणीतरी द्या लाटुन
खुश होईल ईश्वर चविष्ट नैवेद्याने
साजरा करू दसरा आनंदाने
*

व्हा शुचिर्भूत अन पूजा गजवदनाला
बंटी बबलीना नवीन कपडे घाला
नटवा दीपांनी या आपल्या सदनाला
इतिहास सांगतो लुटून घ्या हो सोने
साजरा करू दसरा आनंदाने
*

खंडेनवमीस मी पुजुन घेतली शस्त्रे
शमीवरून निघाली खाली पांडव अस्त्रे
चढवली आपली वीरोचीत ती वस्त्रे
आठवू आपण तो विजय क्षणाक्षणाने
साजरा करू दसरा आनंदाने
*

पण या समयाला कोण रडत ते आहे
हुंदका कशाला कानावर पडताहे?
या, या तर आमच्या शामल आपटे ताई
का उभ्या अंगणी दु:खी तुम्ही बाई?
घ्या पुसून डोळे प्रसन्न व्हा वदनाने
साजरा करू दसरा आनंदाने
*

पण शामल आपटे रडतच मला म्हणाल्या
त्या कुऱ्हाड कात्री बघून वेदना झाल्या
तुमचे सोने ते माझी जीवन-पाने
सहन मी कशी करू ओरबडून ती घेणे
दर वर्षी जातो जीवानिशी आम्ही आपटे
दुर्योधन होता बरा मनाला वाटे
करी दया आम्हावर द्यावी तरी जीवदाने
साजरा करू दसरा आनंदाने
*

इतक्यात कुठूनसा सुपुत्र माझा आला
मज हाती दिधला त्याने छोटा प्याला
सोनेरी माती होती त्या प्याल्यात
अन एक रोपटे आपट्याचे ते हसत
तो हसून म्हणाला लूट आई हे सोने
अभिषेक रोज कर याच्यावर पाण्याने
*

उर भरून आला माझा अभिमानाने
शामल आपटेंचीही सळसळली पाने
शिळ घालून हसली आसपासची राने
मग दसराही न्हाला आनंदाने
**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users