अरेंज्ड कम लव्ह मॅरेज

Submitted by गणेश भुते on 2 October, 2008 - 12:16

rose.jpg
'व्हॅलेंटाइन डे'ला रात्रि ९.३० वाजता गंधारचा मोबाईल वाजला. तो वाईचा नंबर होता. गंधारच्या मनात आले,'स्मितलचा तर फोन नसेल?'. फोन स्मितलचाच होता. दोन महिन्यानंतर तिचा फोन आला होता. मागच्या वेळी झालेल्या फोननंतर, आयुष्यात कधी तिचा फोन येइल असे त्याला वाटले नव्हते. मागच्या वेळी फोनवर बोलताना 'आपण आता इथेच थांबुया' असे ती रडत असताना गंधारने तिला मन घट्ट करुन सांगितले होते. आज स्मितलचा आवाज ऐकल्यावर तो अस्वस्थ झाला. त्याचा स्वर थरथरत होता.
'हॅलो'
'हॅलो, स्मितल बोलतेय'
'बोल'
'कसे आहात?'
'ठिक आहे, तु कशी आहेस?'
'ठिक आहे, व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा द्यायसाठी फोन केला'
'तुझं लग्नं ठरलं ?'
'नाही, तुमचं ठरलं ?'
'जवळ जवळ ठरत आलय'
'......'
गंधारचं लग्नं ठरलं हे कळल्यावर स्मितलला रडू कोसळलं होतं. गंधारलाही खुप वाईट वाटत होतं. त्याने तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती रडतच होती.
त्याला काय बोलावे कळेना. थोड्या वेळाने तिने फोन ठेवला. गंधारला रात्रि काही केल्या झोप लागेना. त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी पहिल्यांदा त्याने स्मितलला पाहिले होते.

महाबळेश्वर -पुणे बस 'महाबळेश्वर'स्टँडवरुन निघाल्यानंतर लगेच दोन प्रवाशी घेण्यासाठी थांबली. स्मितल लगबगीने चढली मागोमाग तीचे बाबा चढले. गंधार स्मितलला पहिल्यांदाच बघत होता. मध्यम बांधा, गहु वर्ण, उभट चेहरा, थोडेसे घारे डोळे, वागण्यातले साधेपण हे सर्व त्याला आवडले. स्मितल देखणी आणि साधी मुलगी होती. क्षणभर त्या दोघांची नजरानजर झाली. गंधारची नजर स्मितलच्या वडिलांच्या बॅगेवरील त्यांच्या नावावर गेली. ते नाव त्याचा लक्षात राहिले कारण स्मितल त्याला आवडली होती. स्मितल आणि तिचे वडिल वाईला चालले होते.

गंधारचे आईवडील त्याच्यासाठी स्थळाच्या शोधात होते. गंधार खुप चोखंदळ असल्यामुळे त्याला अजुन एकही मुलगी पसंत पडली नव्हती. स्मितलचे वडिलही तिच्यासाठी स्थळाच्या शोधात होते. ते गेली तिन वर्षे स्मितलसाठी स्थळ शोधत होते. त्यांना लठठ पगाराचाच जावई हवा होता. बरीच मुले स्मितलला बघुन गेली पण तिच्या लग्नाचे योग येत नव्हते. स्मितल स्वभावाने खुप साधी होती. तिच्या फार अपेक्षा नव्हत्या. लग्नाबद्दल वडिलांनी घेतलेला निर्णय तिला मान्य असणार होता.
स्मितलच्या वडिलांचा स्वभाव चंचल आणि हट्टी होता. ते कधीकधी मध्यम पगाराच्या स्थळांना सुध्दा संपर्क करायचे.

योगायोगाने स्मितलच्या वडिलांना 'वर-सुची'मध्ये गंधारचे स्थळ बरे वाटले. त्यांनी फोन करुन मुलगी बघण्यासाठी गंधारला निमंत्रण दिले. गंधारला खुप आनंद झाला. स्मितलचे शिक्षण गंधारच्या अपेक्षेप्रमाणे होते. तिची आणि गंधारची पत्रिका सुध्दा जुळत होती. गंधारचे आईवडिल इंदोरला रहात असत. तिथे त्यांचे घर होते. त्याचे वडिल तिथे नोकरी करत. त्याची नोकरी पुण्यात असल्याने तो पुण्यात रहायचा. वडिलांच्या मदतीने त्याने पुण्यात फ्लॅट विकत घेतला होता. गंधारच्या आईवडिलांना सारखे पुण्यात येणे शक्य नसायचे त्यामुळे तो एखाद्या जवळच्या मित्राला बरोबर घेऊन मुलगी बघायला जात असे.

यावेळी सुध्दा तो एक दिवस ठरवुन शामबरोबर स्मितलला बघायला वाईला गेला.
स्मितलचे घर अगदी साधे होते. घरातली माणसेही साधी होती. जेवायला वाढताना स्मितल आग्रह करुन वाढत होती. तिचे गुलाबी साडीत वावरणे, आग्रह करुन वाढणे गंधारला आवडले. प्रश्नोत्तराच्या वेळी गंधारचे स्वतःबद्दल सांगणे, स्मितलला तिच्या अपेक्षा, तिची आवड विचारणे आणि स्वतःबद्दल काहिही विचारण्याची संधी देणे हे तिला खुप भावले. एक व्यक्ती म्हणुन सन्मान देणारा गंधार तिच्या मनात भरला होता.

गंधारने पुण्याला परतल्यावर वडिलांशी चर्चा करुन एक शुभ दिवस बघुन स्मितलच्या घरी होकाराचा फोन केला. स्मितलच्या आई फोनवर खुप आनंदी होत्या. त्या म्हणाल्या,'तुम्ही सुध्दा सगळ्यांना पसंत आहात. स्मितलचे वडिल तुम्हाला फोन करतीलच'. गंधारला खुप आनंद झाला.

पण स्मितलच्या वडिलांनी गंधारला अथवा त्याच्या वडिलांना फोन केलाच नाही. कोल्हापुरच्या एका श्रीमंत स्थळासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. कोल्हापुरची मंडळी काहीतरी कारण सांगुन त्यांना टोलवत होती, स्पष्टपणे नकार मात्र देत नव्हती. त्यामुळे स्मितलच्या वडिलांना अजुनही आशा होती.

स्मितलच्या आईचे, स्मितलचे, वडिलांनी गंधारला होकार कळवावा असे मत होते. पण ते काही केल्या मान्य होत नव्हते. गंधारचा गैरसमज होऊ नये म्हणुन स्मितलने तिच्या मावशीने गंधारला फोन करावा असे सुचवले. मावशीने गंधारला फोन केला.
'हॅलो, गंधार जोशी आहेत का?
'बोलतोय'
'स्मितलची मावशी बोलतेय, कर्‍हाडवरुन'
'बोला'
'स्मितलच्या वडिलांचा निर्णय होत नाहिये, आम्हि त्यांच्या पुढाकार घेउन तुम्हा दोघांचे लग्न लावुन दिले तर तुम्हाला चालेल का?'
'माझ्या आईबाबांना ते आवडणार नाही'
'ठिक आहे, आम्ही सगळे त्यांचे मन वळवायचा प्रयत्न करू'
'स्मितलला मला फोन करायला सांगाल का,येत्या आठवड्यात तिच्या वाढदिवसाच्या दिवशी, मला तिला शुभेच्छा द्यायला आवडेल'
'...(हसुन) सांगते'

गंधारला अजुनही स्मितलचे वडिल हो म्हणतील अशी आशा होती.
स्मितलच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने फोन केला.
'हॅलो, स्मितल बोलतेय'
'वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा'
'थँक्यू'
'माझी आठवण येते का?'
'हा काय प्रश्न आहे?'
'तुझे वडिल काय म्हणताहेत आपल्या लग्नाबद्दल?'
'ते काही बोलत नाहीत'
'तू त्यांना कन्व्हिन्स कर ना'
'प्रयत्न करते'
'ऑल दी बेस्ट'
'थँक्यू'
'परत कधी फोन करशील?'
'बघते, नक्की करेन'
नंतर त्या दोघांचे कधी दोन आठवड्यांनी कधी तीन आठवड्यांनी फोन होऊ लागले. फोनवर बोलता बोलता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा महिने लोटले तरी, स्मितलचे वडिल गप्पच होते. अशातच एकदा स्मितलचा फोन आला.
ती फोनवर रडत होती. गंधारला काय झाले असेल याची कल्पना आली तरीही त्याने विचारले.
'काय झालं? का रडतेस स्मितू ?'
'......'
'सांगशील का, काय झालं ते?'
'कोल्हापुरच्या स्थळाचा होकार आला'
'.....'
'आता काय करायचं ?'
'काय करणार, तुझ्या वडिलांच्या इच्छेविरुध्द आपलं लग्न कसं होणार? माझे आईवडिल सुध्दा परवानगी देणार नाहीत'
'.....'
'आपलं नशीब समजायचं '
'हं..'
'आपण आता इथेच थांबुया'

गंधार खुप निराश झाला. पण या परिस्थितीसाठी त्याने मनाची तयारी करुन ठेवली होती. तो स्मितलला विसरू मात्र शकला नाही.

नंतर बरेच दिवस तिचा फोन आला नाही.

आज 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी तिचा फोन म्हणजे त्याला धक्काच होता. बरीच रात्र झाली होती पण गंधारच्या मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते.
त्याने एका आठवड्यापुर्वीच प्रणिताच्या वडिलांना होकाराचा फोन केला होता. ते त्याला घरी येउन भेटले होते आणी येत्या आठवड्यात त्याच्या आईबाबांना भेटायला इंदोरला जाणार होते.प्रणिता गंधारला विशेष आवडली नव्हती पण त्याने काँप्रमाइज करायचे ठरवुन तिला होकार दिला होता.
त्याने दुसर्‍या दिवशी स्मितलला फोन करायचा निश्चय केला. खुप उशीरा त्याला झोप लागली.
त्याने स्मितलला फोन लावला.
'स्मितल, गंधार बोलतोय'
'बोला'
'तुला माझ्याशी लग्न करायचे आहे का?'
'..... आता कसं शक्य आहे ते?'
'तू उद्या पुण्यात ये, आपण रजिस्टर्ड लग्न करू'
'.....'
'आग्रह नाहीये, तू विचार करुन ठरव'
'काही दिवसानंतर केलं तर'
'प्रणिताचे वडिल माझ्या आईबाबांना भेटले तर नंतर मी तुझ्याशी लग्न करु शकणार नाही, तु विचार करुन मला संध्याकाळपर्यंत फोन कर'
'ठिक आहे....'

स्मितलला फोन करण्यापुर्वी गंधार त्याच्या आईबाबांशी फोनवर बोलला होता. गंधार त्याच्या मनाविरुध्द प्रणिताशी लग्न करायला तयार झालाय हे त्याच्या आईबाबांना माहीती होते त्यामुळे बाबांनी त्याला स्मितलशी रजिस्टर्ड लग्न करायची परवानगी दिली. आईच्या मनात गंधारचे धुमधडाक्यात लग्न करायचे स्वप्न होते त्यामुळे ती अबोल होती. तिने 'तुला योग्य वाटेल ते कर' असे सांगितले.

दुसर्‍या दिवशी स्मितलची आज्जी तिला घेऊन पुण्यात आली.
पैसे घेउन वैदीक आणि रजिस्टर्ड पध्दतीने लग्नाची व्यवस्था करणारी पुण्यातली एक संस्था गंधारला माहिती होती. त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये अग्नीचे सात फेरे घेऊन,मंगलाष्टकांच्या घोषात त्यांचा विवाह संपन्न झाला. लग्नाला गंधारचा धाकटा भाऊ, गंधारचे काही मित्र, स्मितलचे मावस काका,काकु,मावस बहिण आणि तिची जीवलग मैत्रीण हे सगळे जण उपस्थित होते. त्या दोघांनी भटजींचे, आज्जीचे, काकाकाकुंचे व इतर उपस्थीत मान्यवरांचे आशिर्वाद घेतले.

गंधारने प्रणिताच्या वडिलांना फोन करुन सगळी वस्तुस्थिती सांगितली. पण त्यांनी गंधारला समजुन घेतले नाही. त्यांना त्याचा राग आला, पण गंधारचा नाइलाज होता. त्याने त्यांची मनापासुन माफी मागितली. प्रणिताशी तो 'मुलगी बघण्याच्या कार्यक्रमा'नंतर कधी बोललाच नव्हता त्यामुळे तिच्याशी याबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

स्मितलच्या वडिलांना तिच्या मावस काकांनी लग्न झाल्याचे कळवले. त्यांना खुप राग आला. त्यांच्या आईनेच पुढाकार घेऊन त्यांना न सांगता स्मितलला लग्नासाठी नेल्याने त्यांनी काही दिवस त्यांच्या आईशी अबोला धरला. सर्व नातेवाईकांनी त्यांची समजुत काढली. नंतर त्यांनाही पश्चाताप झाला. 'मीच लग्न लावुन दिले असते तर बरे झाले असते' असे ते म्हणाले.

लग्नानंतर गंधार व स्मितल लगेच इंदोरला गेले. गंधारच्या आईबाबांनी तेथे रिसेप्शन दिले. स्मितलचे आईवडिल काही नातेवाईकांसह दोघांना आशिर्वाद देण्यासाठी इंदोरला गेले, रिसेप्शनमध्ये हजर राहिले. कदाचित स्मितलच्या वडिलांना मनाविरुध्द ते करावे लागले असावे.
गंधारने पुण्यात त्याच्या मित्रांना, ऑफिसमधील सहकार्‍यांना व शेजार्‍यांना रिसेप्शन दिले. स्मितलच्या वडिलांनीसुध्दा वाईला रिसेप्शन दिले.

गंधार-स्मितलचा संसार छान चालू झाला.

तर असे गंधार आणि स्मितलचे 'अरेंज्ड कम लव्ह मॅरेज' झाले

--गणेश भुते
०२.१०.२००८

गुलमोहर: 

गणूभाऊ ही कथा की सत्यकथा ???
काहीही असो. अंत गोड तर सारे गोड.

कथा चान्गली आहे. अन्डाकार शब्द जरा खटकला. उभट चेहरा असा शब्द वापरला असता तरी चालले असते.

चला, मनात भरलेल्या व्यक्तिशी झलं न लग्न? भरुन पवलं सारं.

छान आहे गोष्ट. लिहिली पण चांगली
----------------------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

एक गडबड झाली आहे...
सातारा-पुणे मार्गावर वाई पडत नाही...पाचवडला वेगळा फाटा पडतो वाईसाठी.
बाकी कथा छान आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....

शुभमंगल. गंधार आणि स्मितलचा संसार सुखाचा होओ.

मस्तचं लिहीलयं
हे वचुन मला माझे लग्न अठवले.
माझ्या लग्नची गोष्ट पण काहिशी अशीच आहे.

अगदी बरोबर प्राची....
वाचताना लक्षात येते ती चुक लगेच.... मुख्यतः त्या भागातल्या वाचकांच्या!

"अंडाकार" मला पण खटकला....
>>स्मितलच्या वडिलांचा स्वभाव चंचल होता <<
इथे चंचल ऐवजी दुसरा कुठला शब्द बसतोय का बघा... चंचल तितकासा सुट होत नाही वडीलांच्या बाबतीत.

>>जेवायला वाढताना स्मितल आग्रह करुन वाढत होती.
मुलगी बघायच्या कार्यक्रमात "जेवण" वगैरे प्रकार असतो का? म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे "पोहे" किंवा तत्सम काही आणि चहा वगैरे असतो.

>>नंतर त्या दोघांचे कधी दोन आठवड्यांनी कधी तीन आठवड्यांनी गंधारला फोन होऊ लागले.
त्या दोघांचे गंधारला फोन..... काही चुकतय का? म्हणजे तिचा गंधारला फोन किंवा त्या दोघांचे एकमेकांना फोन असे पाहिजेल बहुतेक!

>>त्यांनी काही दिवस आईशी अबोला धरला. सर्व नातेवाईकांनी त्यांची समजुत काढली. नंतर त्यांनाही पश्चाताप झाला. <<
>>लग्नानंतर गंधार व स्मितल लगेच इंदोरला गेले. गंधारच्या आईबाबांनी तेथे रिसेप्शन दिले. स्मितलचे आईवडिल काही नातेवाईकांसह दोघांना आशिर्वाद देण्यासाठी इंदोरला गेले, रिसेप्शनमध्ये हजर राहिले.<<
स्मितलच्या वडीलांचा तिच्या आईशी काही दिवस अबोला आणि मग नातेवाइकांनी त्यांची समजूत काढणे यात काही दिवस नक्कीच गेले असतील ना मग स्मितलचे वडील हे लग्नानंतर लगेच झालेल्या रिसेप्शन ला आशिर्वाद द्यायला जाणे कसे काय शक्य?

गणेश, हे सगळे लिहण्यात चुका वगैरे दाखवण्याचा नक्कीच हेतु नाहिये पण वाचताना एक सर्वसामान्य वाचक म्हणुन जे जे काही खटकले ते ते मोकळेपणाने लिहलय.
तुमच्या पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा! Happy

थोडक्यात आणि छान घेतलेय कथा, आवडली Happy

बाकी ते सातारा पुणे गाडीने वाईला जायचा मी पण दोनदा वाचल. म्हटले माझ वाचताना काही चुकतय की काय. बाकी चांगली जमलेय कथा!

छान घेतलेय कथा, आवडली . थोड्या चुका सोडल्या तर छान.

स्मितलच्या बाबांना लग्नाचा खर्च वाचवायचा होता का? कारण आजकाल असे कधी होत नाही.

बाकी काही म्हणा गंधार आणि स्मितलच्या धाडसाचे अभिनंदन!!!!