तू-तारी मग मी तारी

Submitted by उमेश वैद्य on 18 October, 2012 - 12:39

तू-तारी मग मी तारी

तुतारी बितारी कशास हवी मला?
आणि प्राणपणाने फ़ुंकण्याचे
आहे कुठे बळ आता?
म्हणे तिच्यातून निघेल दिर्घ किंकाळी
सगळी गगने भेदायची म्हणजे
पापड का मोडायचाय!
की निवडून याचचे आहे..
कसले काय होऽऽ कसले काय
तू-तारी मग मी तारी

निती, न्याय, चाड यांची धुसर स्वप्ने
आठवतात या स्त्रैण्य निद्रेत
पूर्वी पडलेली, पाहिलेली कधितरी.
पण त्यांचा काय संबंध येथे?
आताशा अशा स्वप्नांना
मज्जाव आहे संपूर्ण
स्वप्ने कुठे वास्तव असतात
कसले काय होऽऽ कसले काय
तू-तारी मग मी तारी

आता अनोखी स्वप्ने पडतात. वास्तवी.
लाखो कोटिंच्या परीमाणाची
बळीराच्या आत्महत्यांची
न बांधलेल्य़ा बंधा-यांची
अडकलेल्या बिलांची
हडपलेल्या जमिनींची.
बुडवायच्या कर्जांची. कित्तीतरी
कसले काय होऽऽ कसले काय
तू-तारी मग मी तारी

अहो ‘ओज’ बिज कसल मिरवायच!
नाही...म्हणजे आम्हीही मिरवतोना..
अलिशान मोटारींमधे स्वत:ला
किंवा नटांच्या पोरट्यांच्या लग्नात
त्यांच्या आईबापावर केलेल्या उपकारांना
पण लौकरच निघतो हं तिथून
मिडिया बिडिया येउन गेली की
कसले काय होऽऽ कसले काय
तू-तारी मग मी तारी

कुठल्याशा ऐंजिओ च्या आपल्याच
अनाथ मुलांच्या आश्रमाच्या उद्घाटनात
बोलतो असले शब्द जेंव्हा.. धर्म. बाणा सेवा वगैरे..
टाळ्या टाळ्या म्हणजे कितीऽऽ हो
तुमच्या अवकाशातल्या ओसाडीत
आहे का असली मजा
कसले काय होऽऽ कसले काय
तू-तारी मग मी तारी

दानव बिनव आता कुठले?
ते तर पुराणातले पिठले. चिंचगुळाचे
‘दानव’ म्हणजे निवडणुका आल्या
की विरोधि पक्षाला ठेवायचे नाव.
ते मात्र ठेवतो आम्ही. असावी ना पुढची बेगमी
ते ही मानव आम्हीही मानव. आहे कुठे दानव?
कसले काय होऽऽ कसले काय
तू-तारी मग मी तारी

आता मजला एकच ठावे
तुम्ही देखील एकच गावे
तू तारी, मी तारी.
तू तारी, मी तारी.

उ. म वैद्य. २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users